कळंगुट प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

जखमी अब्दुलवर गोमेकॉत उपचार

|
17th May 2022, 12:31 Hrs
कळंगुट प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुट येथे अब्दुल सौदागर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अशिष पालकर व सीतेश केरकर या संशयितांना अटक केली. मुख्य संशयित साईश पालकर हा फरारी आहे.
ही घटना दि. ८ रोजी रात्री १ च्या सुमारास ‘नवतारा’ हॉटेलजवळ घडली होती. संशयित सीतेश केरकर याचा फास्टफूडचा गाळा आहे. घटनेदिवशी जखमी अब्दुल सौदागर व त्याचे भाऊ हसन आणि हुसेन हे त्या गाड्याजवळ आले होते. ते तेथे कुणाशीतरी वादावादी करत होते. त्यामुळे संशयित केरकर याने त्यांना तेथून हाकलून लावले होते. यावरून त्यांच्यात वाद होऊन एकमेकांवर त्यांनी हल्ला केला. जखमी अब्दुल यास संशयित साईश पालकर याने क्रिकेट बॅटच्या सहाय्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला, तर त्याच्या दोन्ही भावंडांना किरकोळ जखम झाली.
कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी संशयितांविरुद्ध भा. दं.सं.च्या ३०७ कलमाखाली प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याखाली नंतर पोलिसांनी अशिष पालकर व सीतेश केरकर यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, जखमी अब्दुल सौदागर याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पुढील तपोस पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षकर विराज नाईक करत आहेत.