वानखेडेवर चेन्नई किंग्जची ‘बत्ती गुल’

मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून विजय : गोलंदाजीत डॅनियल सॅम्सकडून १६ धावांत ३ बळी


12th May 2022, 11:50 pm
वानखेडेवर चेन्नई किंग्जची ‘बत्ती गुल’

मुंबई : आयपीएल १५ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. मुंबईने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला आहे. मुंबईने चेन्नईवर ५ विकेट्सने मात केली. 

९८ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईने ५ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. तत्पूर्वी, मुंबईच्या संघाने चेन्नईला अवघ्या ९७ धावांत गुंडाळले होते. या सामन्यात मुंबईच्या विजयाचा नायक ठरला तो डॅनियल सॅम्स ज्याने अवघ्या १६ धावांत तीन महत्त्वाचे बळी घेतले. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले आहे.

मुंबईकडून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग

तत्पूर्वी, ९८ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही फारशी खास झाली नाही. संघाचा सलामीवीर इशान किशन केवळ ६ धावा करून बाद झाला. यानंतर रोहित शर्माने धावसंख्या पुढे नेली आणि १८ धावा केल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सॅम्सही १ धावा काढून बाद झाला.

त्याचवेळी आजच्या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करणारा ट्रिस्टन स्टब्सही खाते न उघडता बाद झाला. तो बाद झाल्यानंतर हृतिक आणि तिलक वर्मा यांनी ४८ धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, हृतिकला त्याचा डाव पुढे नेता आला नाही आणि तो १८ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर टीम डेव्हिड आणि तिलक यांनी संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून मुकेश चौधरीने २३ धावांत ३ बळी घेतले.

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. चेन्नईचा संघ केवळ ९७ धावांवर बाद झाला. मुंबई इंडियन्सचा नायक डॅनियल सॅम्स होता. त्याने चार षटकांत १६ धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. त्याच्याशिवाय मेरेडिथने २७ धावांत २ तर कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ बळी घेतले. याशिवाय बुमराह आणि रमणदीपलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्याचवेळी चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक धावा केल्या. तो ३६ धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईचे फलंदाज ठरले अपयशी

चेन्नईची सुरुवात खराब झाली. संघाचा सलामी कॉनवे फार काही करू शकला नाही आणि खाते न उघडता बाद झाला. त्याला सॅम्सने आपला बळी बनवले. तो बाद झाल्यानंतर मोईन अलीही खाते न उघडता बाद झाला. तो बाद झाल्यानंतर चेन्नईची धावसंख्या दोन बाद २ अशी झाली. तो बाद झाल्यानंतर उथप्पाही १ धावा काढून बुमराहचा बळी ठरला.

अवघ्या ५ धावांत ३ विकेट्स गमावल्यानंतर चाहत्यांना गायकवाडकडून मोठ्या आशा होत्या. पण तोही ७ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर रायुडू १० आणि शिवम दुबेही १० धावा करून बाद झाले.

धोनीने सांभाळली संघाची धुरा

६ विकेट्स पडल्यानंतर धोनी पुन्हा एकदा ‘ट्रबलशूटर’च्या भूमिकेत दिसला आणि त्याने ब्राव्होसह डाव हाताळला. मात्र, केवेळ १२ धावा करून ब्राव्हो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ ९७ धावांत सर्वबाद झाला. धोनीने चेन्नईसाठी सर्वाधिक खेळी केली. त्याने नाबाद ३६ धावांची खेळी खेळली.

चेन्नईचा कमी धावसंख्येचा इतिहास

आयपीएलमध्ये चेन्नईची सर्वात कमी धावसंख्या ७९ धावा आहे आणि तीही चेन्नईने मुंबईविरुद्ध केली होती. मुंबईने ५ मे २०१३ रोजी चेन्नईचा वानखेडे स्टेडियमवर ८० धावांनी पराभव केला होता. या सामन्यात मात्र मुंबईने प्रथम फलंदाजी करत १३९ धावा केल्या. मुंबईने हा सामना ६० धावांनी जिंकला.

चेन्नईची आयपीएलमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या १०९ धावा आहे, जी त्यांनी ४ मे २००८ रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली होती. २६ एप्रिल २०१९ रोजी मुंबईने चेन्नईला १०९ धावांत गारद केले होते.