विचार तर कराल ?

जी गाेष्ट विद्यार्थ्यांना उमजते, त्या गाेष्टी ज्येष्ठांना पचायला जड का जाव्यात? खरे म्हणजे या गाेष्टी शुद्ध व्यवहाराच्या आहेत. पण आपण विचार करीत नाही म्हणून आपल्याला त्या समजत नाहीत.

Story: विचारचक्र | कुलदीप कामत |
24th February 2022, 10:14 Hrs
विचार तर कराल ?

लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो, या लेखासाठी बऱ्याच जणांकडून बऱ्याच गोष्टी उसन्या घेतल्या आहेत. लेखाचे शीर्षक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरून, तर लेखातील मुद्दे, प्रतिपादन पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या ‘सामाजिक अभुदय’ आणि पत्रकार गो. पु. हेगडे देसाई यांच्या ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या अग्रलेखावर बेतलेले आहे. हे दोन्ही लेख अनेक वर्षे वर्गात शिकवले आहेत. एखादा विचार आपण वाचतो, त्यावर मनन चिंतन करून आपला विचार विश्वाचा भाग बनतो, त्यानुसार कृती करत तो विचार आपलाच बनतो, नाही का?

धर्म व धर्मसंस्थांचे सामाजिक जीवनातील योगदान या विषयाची परखड चिकित्सा हे दोन वैचारिक लेख करतात. यात ‘सामाजिक अभुदय’ या लेखात सहस्त्रबुद्धे लिहितात, धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असे दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही, त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कुणी घेतलीच नाही. 

धनाचे दान धर्माच्या दृष्टीने केवढे पुण्य आहे? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे, पण इथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली ? त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या, अन्नछत्रे घातली, त्यासाठी उत्पन्न नेमून दिले, पण रुग्णालयासाठी, पाट बंधाऱ्यासाठी, शेती सुधारण्यासाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणी दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही, पण त्या दीनांची कायमची उन्नती व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याने त्यांचा प्रश्न सुटत नाही. तो सोडविण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे अशी भावना कुणाच्या चित्तात येथे उदित झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांती झाली असती. लेखक पुढे रॉकफेलर या त्या काळाच्या धनाढ्य माणसाविषयी लिहितात, प्रचंड संपत्ती मिळवल्यानंतर या संपत्तीच्या काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायातून निवृत्त झाला आणि आयुष्याची पुढली पंचेचाळीस वर्षे संपली दान करण्यात खर्च केली. रुग्णालय व वैद्यकीय संशोधन, शास्त्रीय संशोधन, ग्रंथालय, सार्वजनिक इमारती, शांततेसाठी प्रयत्न करणारी मंडळी, धर्मसंस्था या सर्वांना त्याने कोटी कोटी रुपयांचे दान केले. या दानामध्ये मानव जातीचे कल्याण हा एकच हेतू होता. आजच्या काळात बिलगेट हा जसा हा वसा चालवतोय, टाटा कंपनी समूहाने अशा प्रकारचे भरीव काम केले आहे. हे झाले श्रीमंत लोकांच्या बाबतीत, पण धर्म संस्थेनेही धर्माचा सामाजिक अर्थ प्राप्त करून दिला नाही. याविषयी पत्रकार गो. पू. हेगडे देसाई लिहितात, आपल्या गोमंतकात पुष्कळ श्रीमंत लोक मोठे होत आहेत. पुष्कळ देवालयांतील पैसा पडून आहे, परंतु या सर्वांना आपल्या पैशांचा व्यय करण्यास मुळीच समजत नाही. देवालय आणि मोठमोठे उत्सव करून आतिषबाजीसारख्या निरुपयोगी कामात पैसा खर्च करावा, या पलीकडे आपले काही कर्तव्य आहे याची त्यांना जाणीव होऊ नये का? भूतदया हे धर्माचे मुख्य अंग आहे. याविषयी सर्व साधुसंतांनी व धर्मग्रंथांनी टाहो फोडून कंठशोष केला आहे. लोकांकडून मिळालेल्या देणग्या, वर्गण्यांतून अस्तित्वात आलेल्या व चाललेल्या या संस्थानांतून निराधार  लोकांना मदत का होऊ नये? धर्मगुरूंनी पाषाणाच्या निर्जीव मूर्ती सोन्याने मढवून आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यापेक्षा या चालत्या बोलत्या जिवंत देवाकडे आधी पहा व त्यांना संतुष्ट करावे. हेच देव  आपल्या राष्ट्राच्या उपयोगी पडणारे आहेत. आमच्यातील श्रीमंत लोकांनी देवळे बांधण्याला भरपूर मदत केली आहे. परंतु त्या लोकांचे अशा भूतसेवेचे कमी पडलेले आकडे पाहिले म्हणजे त्यांच्या अज्ञानाची फार कीव येते. ही स्थिती श्रीमंत लोकांची नसून मध्यम स्थितीतील लोकांची हीच दिसून येते. गोमंतकातील देवळातून तो पुष्कळसा पैसा ठेवला आहे. त्याचा विनियोग अशा वेळी अशा कामी केला पाहिजे. नुसते तीळ-तांदूळ जाळून किंवा मोठे मोठे उत्सव साजरे करण्यापेक्षा ज्ञानरूपी देवाकडे त्या पैशाचा उपयोग केल्यास ईश्वरसेवा केल्यासारखे होईल.

हे दोन लेख किमान पन्नास साठ वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत. पण त्यात वर्णन केलेली परिस्थिती अजून बदललेली नाही. उलट उत्सवी मानसिकता वाढतच आहे. ही स्थिती पालटण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. आता कोणी म्हणेल तरुणांनी हे करावे, ते करावे असे येता जाता एेकविण्याची फॅशन आहे खरी. आजचा तरुण वेगळा विचार करतो. प्रश्न इतकाच आहे की त्या वेगळ्या विचाराला भोवतालच्या वातावरणातील काही सकारात्मक चालना मिळते का?

गेली पंधरा वर्षे एक प्रश्न प्रत्येक वर्गातील विद्याथ्यार्थ्यांना विचारला आहे.- आपल्या समाजाला मंदिराची गरज आहे की विद्यालय़ाची, इस्पितळाची, ग्रंथालयाची ?  प्रत्येक वेळी उत्तर- विद्यालय, इस्पितळ, ग्रंथालय असेच आले आहे. याचा अर्थ त्यांना आपली प्राथमिकता समजलेली आहे. आम्हीच जरा गाेंधळलेलाे आहाेत. हा गाेंधळ आपल्या डाेक्यात नसता तर देवालयातील शुद्र मानापमानाच्या गाेष्टी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पैसा-वेळ खर्च करण्याचा मूर्खपणा आपण वषार्नुवर्षे केला नसता. मंदिरावर साेन्याचे कळस चढविले नसते. कदाचित पाेर्तुगीज कालखंडात माेडलेल्या देवळांची पुन्हा स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नसते. उपस्थितांकडून या बिनडाेक विधानाला टाळ्या पडल्या नसत्या. धर्माच्या नावाने मतांचा जाेगवा मागण्याचे धारिष्ट्य राजकारण्यांना झाले नसते. पण या सगळ्या गाेष्टी सुखनैव हाेतात. याचा अर्थ समाजाच्या माेठ्या घटकाकडून याला मान्यता आहे. मग प्रश्न असा-जी गाेष्ट विद्यार्थ्यांना उमजते, त्या गाेष्टी ज्येष्ठांना पचायला जड का जाव्यात. खरे म्हणजे या गाेष्टी शुद्ध व्यवहाराच्या आहेत. पण आपण विचार करीत नाही म्हणून आपल्याला त्या समजत नाहीत. आपण आपल्याच मनात जरा तपास घ्यावा म्हणजे सगळ्या गाेष्टी निवळू लागतील.