शाळेतील मुलांची सुरक्षा ही संयुक्त जबाबदारी

Story: अंतरंग | नारायण गावस |
24th February 2022, 10:12 pm
शाळेतील मुलांची सुरक्षा ही संयुक्त जबाबदारी

राज्यात करोनामुळे गेली दोने वर्षे बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. मोठ्या उत्साहात पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले. तसेच शाळेत विद्यार्थ्यांचे थाटात स्वागतही शिक्षकांकडून करण्यात आले आहे. असे असताना काही शाळांमधून पालकांकडून विद्यार्थ्यांच्या जबाबदारीच्या हमीपत्रावर सही घेतल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे शाळा व्यावस्थापन शिक्षक आणि पालकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज झाला आहे. पालकांनी तसेच शाळेच्या व्यवस्थापन आणि शिक्षकांनी एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा कारण याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडू शकतो.

करोना हा आजार जगभर पसरल्याने लोकांमध्ये घबराट आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांची काळजी गेली दोन वर्षे घेतली आहे. मुलांना गर्दीत न पाठविणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राबविणे यासारखी शिकवण दिली आहे. त्यामुळे मुलांनाही आता करोना नियमांचे कसे पालन करावे हे माहीत आहे. तरीही नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सांभाळणे गरजेचे आहे. आता शिक्षण खात्याने विविध तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शाळा सुरु केल्या आहेत, त्यामुळे आता कुठलाच वादविवाद न करता सर्व करोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे.

करोना हा असा आजार आहे जो कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे कुणीही एकमेकांवर जबाबदारी टाकू नये. शाळा व्यावस्थापन आणि शिक्षकही ही जबाबादारी एकटे घेऊ शकत नाहीत. पालकांवरही शाळेच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी देता कामा नये. पालक तसेच शिक्षक दोघांनाही मिळून ही जबाबदारी घ्यावी. कारण एखाद्या विद्यार्थ्याला अन्य कुठला आजार असेल आणि त्यात त्याला करोनाची लागण झाली तर पालकांनी सरळ शिक्षक तसेच शाळेच्या व्यावस्थापनाला जबाबदार धरू नये. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पालकांनी पाठविले तर पालक संपूर्ण दिवस शाळेबाहेर बसून राहू शकत नाही. अशावेळी शिक्षकांनी मुलांकडून करोनापासून दूर राहण्यासाठी सर्व नियमांचे कडक पालन करुन घ्यावे. यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकमेकांची जबाबदारी समजून घ्यावी. एकमेकांवर जबाबदारी न ढकलता दोघानीही जबाबदारी स्वीकारावी. गेली दोन वर्षे मुले शाळेत गेली नसल्याने अनेक मुलांवर मानसिक तणाव आला होता. मुले मोबाईलमध्ये तसेच कार्टूनमध्ये रमून गेली होती. त्यामुळे दोन वर्षांनी शाळा सुरु होताच मुलांना आपल्या मित्र मैत्रिणींना भेटता आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. मुलांचा हा आनंद पुन्हा विरजू द़ेऊ नये. गेली दोन वर्षे ओस पडलेल्या शाळा विद्यार्थ्यांमुळे फुलून गेल्या आहेत. त्यांच्या त्या किलबिलाटाने शाळांना एक वेगळाच रंग आला आहे. आता पालकांनी आणि शिक्षकांना समजूतदारीने निर्णय घ्यावा. कुठल्याही नवीन वादाला वाचा फोडू नये. करोना आहे म्हणून आपण मुलांना शाळेपासून दूर ठेवू शकत नाही. आज जगभर सर्वत्र करोना अजूनही काही प्रमाणात आहे, पण सर्व देशात करोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु केल्या आहेत. गोव्यातही या शाळा सुरु झाल्या, या निर्णयाचे स्वागत सर्वांकडून केले जात आहे. खासगी शाळांनी आपली जबाबदारी विसरता कामा नये. अनेक खासगी शाळांनी करोना काळात ऑनलाईन शिक्षण देत असताना पालकांकडून विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क भरुन घेतले होते. मुलांकडून ज्या प्रकारे शुल्क घेतले जाते, तशाच प्रकारे त्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे शाळेच्या व्यावस्थापन आणि शिक्षकांचे काम आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. पण काम व्यावसायामुळे पालकही दिवसभर मुलांसोबत शाळेत राहू शकत नाही. त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी करोनाची भीती मनात न ठेवता फक्त करोना नियमांचे विद्यार्थ्यांकडून पालन करुन घेऊन सुरक्षितरीत्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे.