वास्कोत मतदारांना पैसे वाटताना एकास अटक व सुटका


13th February 2022, 11:57 pm
वास्कोत मतदारांना पैसे वाटताना एकास अटक व सुटका


प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी फिरत असलेल्या फकीर गल्ली साईनगर येथील शाहरूख उर्फ मोहम्मद तौफिक शेख याला रविवारी मध्यरात्री अटक केली. त्याच्याकडे एक लाख रुपयांची रोकड मिळाली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले.
दरम्यान, वास्को पोलिसांनी शनिवारी बायणा येथे एका दुकानावर छापा मारून देशी-विदेशी बनावटीच्या सुमारे एक लाख सात हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. शाहरूख हा निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करतो. त्यामुळे त्याच्यावर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते तसेच पोलीस लक्ष ठेवून होते. रविवारी रात्री तो साईनगर येथे फिरत असताना त्याला वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाकिटांमध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम सापडली.
दरम्यान, मांगोरहिल झोपडपट्टीमध्ये रात्री साडेबाराच्या दरम्यान फिरणाऱ्या चार जणांना वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर समज देऊन त्यांना सोडण्यात आले. पैशाचे वाटप होऊ नये. तसेच वाद निर्माण होऊ नये यासाठी वास्कोचे उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस ठिकठिकाणी गस्त घालीत आहेत. नागरिकांनी मतदान शांततेत व्हावे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.      

हेही वाचा