रक्ताच्या नात्यांपलिकडची ‘नाती गोती’

महाराष्ट्र

Story: राज्यरंग | नीलेश करंदीकर |
01st February 2022, 12:25 Hrs
रक्ताच्या नात्यांपलिकडची ‘नाती गोती’

१९९१ साली रुपेरी पडद्यावर झळकलेला स्मिता तळवलकर निर्मित ‘चौकट राजा’ सिनेमा असो, वा जयवंत दळवी लिखित ‘नाती गोती’ नाटक असो! त्यातून गतीमंद मुलं आणि पालकांचं भावविश्व हा सामाजिक पातळीवरील दुर्लक्षित, संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळण्यात आला आहे. क्षणभर विचार करा, आपल्या पोटी जर गतीमंद मुल आलं तर? या विचारानेच मन व्याकुळ होतं. पण, अशा मुलांना माया देणारी, त्यांच्या पालकांना आधार ठरणारीही माणसं या समाजात आहेत. सुलोचना व नीरज बेरू दाम्पत्यही त्यापैकीच एक. प्रारंभी १९८९ साली पुणे येथे आणि त्यानंतर बदलापूर (मुंबई ) येथे बेरू प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी शेकडो दिव्यांग, गतीमंद मुलांना आसरा (मोफत) दिला आहे. याच कार्यामुळे त्यांना ‘देवदूत’ असेही संबोधले जाते. 

गोष्ट १९८० सालातली. व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेरू कुटुंबात तान्हुल्याचा जन्म झाला. पण, बेरू दाम्पत्याला धक्का बसला जेव्हा त्यांना कळले की त्यांचा मुलगा हा इतरांसारखा नाही, तो गतीमंद आहे. बेरू कुटुंबीयांचा खिन्न मनाने जीवनप्रवास सुरू झाला. मात्र, अखेर त्यांनी वास्तवाला स्वीकारले व मुलाचे शक्य तितके उत्तम संगोपन करण्याचा निश्चय केला. त्यासाठी पालकत्व या नात्याने दाम्पत्याला बरेच काही शिकावे लागले, अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. याचवेळी बेरू दाम्पत्याला कळले की, आपल्यासारखी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांना मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अनेक कुटुंबांकडे गतीमंद, दिव्यांग, अंथरुणाला खिळलेल्या मुलांची काळजी घ्यायला साधने, मनुष्यबळ नाही. ही स्थिती पाहून बेरू दाम्पत्याने १९८९साली पुण्यात ‘बेरू मतिमंद प्रतिष्ठान’ सुरू केले. काही वर्षांनी अधिक लोकांना सामावून घेण्यासाठी बदलापूर येथे एका मोठ्या जागेत स्थलांतर केले... 

त्यानंतर आता ३२ वर्षांचा काळ उलटला आहे. बदलापूर येथे बेरू प्रतिष्ठानने आतापर्यंत शेकडो दिव्यांग, गतीमंद मुलांना छत्र दिले आहे. एवढ्यावरच न थांबता तेथे  वृद्ध व्यक्ती, असाध्य आजार असलेल्या व्यक्तींना सामावून घेतले जाते. बदलापूर येथे ट्रस्टच्या दोन एकर परिसरात दिव्यांगांसाठी वसतिगृह, रुग्णालय आहे. तेथे विविध प्रकारच्या कार्यशाळा, उपक्रम आयोजित केले जातात. दिमतीला सुसज्ज फिजिओथेरपी कक्ष, मानसोपचारतज्ज्ञही आहेत. ट्रस्टमध्ये दाखल होणाऱ्या उपेक्षितांची मोफत सेवा केली जाते हे विशेष. त्यासाठी जात, पात, पंथ पाहिले जात नाही. केवळ मानवता हाच धर्म तेथे दिसून येतो. दिव्यांग, रुग्ण, गतीमंद यांचे आयुष्य आनंदी व्हावे, त्यांच्यातील सुप्त कला-गुणांना वाव मिळावा, यासाठी बेरू दाम्पत्य नेहमीच कार्यरत असते. केंद्रात २५ मदतनीस व कॉल ऑन डॉक्टर सेवाही आहे. हा सर्व व्याप नागरिकांनी दिलेल्या देणग्यांमधून चालतो. ईश्वराची इच्छा असल्यानेच आमच्या हातून ही सेवा घडत आहे, असे बेरू दाम्पत्य म्हणते. मतिमंद मुलांना गतीमंद व अपंगांना दिव्यांग म्हणण्याचे शासनाने फर्मान काढले आहे. मात्र, प्रत्यक्षात सामाजिक पातळीवर अशा व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का? शब्दप्रयोग बदलला तसे त्यांचे परावलंबित्व दूर करण्यासाठी शासन काही करतेय का, हा खरा प्रश्न आहे. जयवंत दळवींच्या ‘नाती गोती’ नाटकाच्या शेवटीही गतीमंद मुलाचे पालक हे सामाजिक पातळीवर अशाच समस्येत अडकलेल्या पालकांना मदतीचा निश्चय करतात. बेरू दाम्पत्य तर वास्तवातील आदर्श आहे. असे बिंब-प्रतिबिंब कायम राहो, त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचे हात अधिक बळकट होवे, इतकेच!