वस्त्रहरणानंतर आता सोवळे कोण राहिले ?

पक्ष सोडून गेलेला कसा वाईट होता हे सांगायला मूळ पक्षवाले जोर लावतात. अशा प्रकारे एकमेकांचे वस्त्रहरण ते करीतच असतात. त्यामुळे आता सोवळा राहिला तरी कोण असा यक्षप्रश्‍न मतदारांसमोर उभा ठाकतो.

Story: विचारचक्र | गंगाराम केशव म्हांबरे |
01st February 2022, 12:22 am
वस्त्रहरणानंतर आता सोवळे कोण राहिले ?

निवडणूक आली की पक्षांतरांना जोर चढतो. ज्याला उमेदवारी मिळत नाही, तो मग दुसर्‍या पक्षात जातो, तेथील उमेदवारी मिळवतो. तो एवढ्यावरच थांबत नाही, तर तो ज्या पक्षातून आला, त्या पक्षातील उणीदुणी वर काढतो. दुसरीकडे तो गेल्यामुळे आपला पक्ष किती स्वच्छ बनला हे सांगण्यासाठी मूळ पक्षाचे नेते त्याच्यावर टीका करायला लागतात. तो कसा वाईट होता हे सांगायला ते जोर लावतात. अशा प्रकारे एकमेकांचे वस्त्रहरण ते करीतच असतात. त्यामुळे आता सोवळा राहिला तरी कोण असा यक्षप्रश्‍न मतदारांसमोर उभा ठाकतो. मतदान कोणाला करायचे असा संभ्रम त्याला पडतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (प्रमुख) डॉ. मोहन भागवत नुकतेच एका व्हिडीओत म्हणाले की, ‘उपलब्ध उमेदवारांत जो चांगला, स्वच्छ वाटतो, त्याला (पात्र)मतदान करा. मात्र ‘नोटा’ वापरून नकारात्मक मतदान करू नका, कारण त्याचा लाभ जो सर्वात नालायक (अपात्र) असेल त्यालाच होईल.’ कोणताही पक्ष विशेषतः राष्ट्रीय पक्ष असेल तर तो पात्र आणि स्वच्छ उमेदवारच निवडेल याची खात्री कोण देईल. पणजीचे उदाहरण घ्या किंवा मांद्रे मतदारसंघाचे घ्या. मा. भागवत यांचे म्हणणे मान्य करायचे तर मते कोणाला द्यायची हे ठरविणे अतिशय कठीण बनले आहे.

मायकल लोबोंचेच उदाहरण घेऊ. एका नेत्याने भरपूर संपत्ती कमावली असून, बार्देश तालुक्यावर ताबा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अशा काळ्या पैशाने रिमोट कंट्रोल चालवू देऊ नका, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हापशात केले. लोबो हे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये होते, मंत्रिमंडळाचे भाग होते. तोपर्यंत त्यांचे व्यवहार स्वच्छ होते का, अशी शंका मतदारांच्या मनात येऊ शकते. त्यांनी अफाट संपत्ती कधी जमवली, हा एक अनुत्तरित प्रश्‍न आहे. लोबो यांच्या मते कोणीतरी सत्ताबाह्य केंद्र सरकारी कारभारात लुडबुड करायचे. मुख्यमंत्र्यांनी काय करायला हवे, याचे निर्देश द्यायचे. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून विधानसभेत भूमिपुत्र अधिकार विधेयक येऊन संमत करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याची अखेर नाचक्की झाली. हे लोबोंचे शब्द आहेत. पक्षातील पूर्वाश्रमीच्या नेत्यांचे वाभाडे जरूर काढावेत, पण ते याच सरकारचे, सत्ताधारी पक्षाचे आमदार होते हे विसरून चालणार नाही. त्यांना भाजपने एवढी वर्षे का सहन केले, त्यामागची अपरिहार्यता काय, याचे स्पष्टीकरण भाजप नेत्यांनी मतदारांना द्यावे. लोबोनाही अशा प्रश्‍नांचे उत्तर द्यावे लागेल. एकमेकांचे वस्त्रहरण करण्याने सत्य जनतेसमोर येते हे खरे, पण त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण होतो.

भाजपने उमेदवारी देताना जे काही निकष लावले, त्याची जणू खिल्लीच स्वतः उडवली. बाबू कवळेकरांना उमेदवारी देताना, त्यांच्या पत्नीस नाकारले. तेथे घराणेशाही आड आली. तिसवाडीत किंवा सत्तरीत मात्र वेगळाच निकष लावण्यात आला. उत्पल पर्रीकर यांना तिकिट नाकारताना त्यांच्या पक्षकार्याबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तो सत्तरीत मात्र लागू झाला नाही. बाबू कवळेकरांना पणजीचा न्याय, तर सत्तरीत तिसवाडीचा निकष लावण्यात आला. सोयीनुसार निकष लावताना, समान फूटपट्टीचा विसर भाजप नेत्यांना पडला. कारण दिले ते मात्र जिंकण्याची क्षमता. फुटीर कॉंग्रेसमधील बहुतेक नेत्यांना बक्षिसी म्हणून भाजप उमेदवारी देण्यात आली. त्यात कार्लुस आल्मेदा आणि एलिना साल्ढाना मागे पडले. मात्र त्याच वेळी अचानक भाजपमध्ये दाखल झालेले जोझफ सिक्वेरा यांना कळंगुटला उमेदवारी देऊन त्यांना पावन करण्यात आले. त्यांचे पक्षकार्य काय या प्रश्‍नाला उत्तर नाही, ते कधीही देता येणार नाही. साळगावला दिलीप परूळेकरांच्या पदरात उपाध्यक्षपद टाकून त्यांचे समाधान करण्यात आले. कुंभारजुव्यात पणजीप्रमाणे घराणेशाही आड आली नाही. त्यानिमित्ताने सिद्धेश नाईक राज्य कार्यकारिणीवर आले, त्यापूर्वी त्यांना पांडुरंग मडकईकर यांनी घरचा अहेर दिला होताच. 

मोठा गाजावाजा करून प्रवेश केलेल्या एल्विस गोम्सना अखेरपर्यंत टांगणीवर ठेवण्याचे कसब कॉंग्रेस पक्षाने दाखवले. फुटिरांना उमेदवारी नाही, असे म्हणणार्‍या या पक्षाने आम आदमी पक्षाचे गोव्यातील संस्थापक असलेल्या गोम्स यांना पक्षाची पणजीची उमेदवारी दिली. बंडखोर अथवा विश्‍वासघातकी हे लेबल आलेक्स रेजिनाल्ड यांना चिकटवले खरे, पण हाच न्याय इतरांना लावला नाही. कॉंग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झालेल्या सिनियर राणेंनी अखेर त्या पक्षाला तोंडघशी पाडले. माझ्यामुळे हा पक्ष सत्तरीत उभा राहिला असा जर त्यांचा दावा असेल तर पुढे बोलणेच बंद होते.  भाजप सरकारने दिलेल्या कॅबिनेट दर्जाला राणे जागले म्हणायचे.

तृणमूल कॉंग्रेस अथवा आम आदमी पक्षाने अन्य पक्षांवर टीका करायचे सत्र सुरू ठेवले आहे. अन्य पक्षांना नको असलेले सर्व नेते तृणमूलमध्ये दाखल होत आहेत, त्यांना उमेदवारीही मिळाली आहे. हेच नेते आता आपल्या (पूर्वाश्रमीच्या) मूळ पक्षावर तुटून पडले आहेत. मीठाला जागण्याचा हा एक वेगळाच अजब प्रकार म्हणायचे. वस्त्रहरणात कुठलाच पक्ष अथवा नेता मागे नाही. आपचे सांताक्रुझचे उमेदवार अमित पालेकर हे पूर्वाश्रमीचे भाजप समर्थक, त्यांच्या माता भाजप समर्थक सरपंच होत्या अशी टीका करणार्‍या तृणमूल नेत्या आपल्या बाजूला बसलेली मंडळी अथवा स्थानिक उमेदवार कोणत्या पक्षातून आला, ते विसरून गेल्या आहेत. यासंबंधी आप अथवा तृणमूलबद्दल काय बोलावे, आपले स्थान देशात बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा देऊया. त्या पक्षनेत्यांनीही गोव्यातील वस्त्रहरण नाटकात सहर्ष भूमिका बजावली आहे. मतदारांसमोर आता एकच प्रश्‍न उभा राहातो, सोवळा कोण राहिला?