मगोपचे दहा, शिवसेनेचे नऊ, आपकडून तीन उमेदवार जाहीर!

सुदिन मडकई, दीपक प्रियोळ, तर झांट्ये मयेतून लढणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:37 am
मगोपचे दहा, शिवसेनेचे नऊ, आपकडून तीन उमेदवार जाहीर!

पणजी : तृणमूल काँग्रेससोबत युतीत असलेल्या मगो पक्षाने शुक्रवारी दहा, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेने नऊ, तर आम आदमी पार्टीने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली.
मगोपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आमदार सुदिन ढवळीकर यांना मडकई, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांना प्रियोळ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. मांद्रेत जीत आरोलकर, पेडण्यात राजन कोरगावकर, डिचोलीत कार्याध्यक्ष नरेश सावळ, मयेत प्रवीण झांट्ये, वाळपईत विश्वेश प्रभू, फोंड्यात डॉ. केतन भाटीकर, शिरोड्यात संकेत नाईक मुळे आणि सावर्डे येथे विनायक उर्फ बालाजी गावस यांना उमेदवारी दिली आहे.
मयेचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांनी काहीच दिवसांपूर्वी मगोपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने माजी सभापती अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट यांना पक्षात घेतल्यानंतर तेथून झांट्ये यांना भाजप उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ मगोपमध्ये प्रवेश करून मयेची उमेदवारी मिळवली आहे. पेडण्यात मगोपने प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. परंतु, आर्लेकर भाजपमध्ये गेल्याने मगोपने राजन कोरगावकर यांना पक्षात आणून त्यांना पेडणेची उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त इतर आठ उमेदवारांची नावे काही महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती.
शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. म्हापशात शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, पेडण्यात सुभाष केरकर, शिवोलीत व्हिन्सेंट पेरेरा, हळदोण्यात गोविंद गोवेकर, पणजीत शैलेंद्र वेलिंगकर, पर्येत गुरुदास गावकर, वाळपईत देविदास गावकर, वास्कोत मारुती शिरगावकर आणि केपेत एलेक्सी फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेसोबत आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या काही उमेदवारांची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. दरम्यान, आपने पाचवी यादी जाहीर करीत कुंभारजुवेतून गोरखनाथ केरकर, थिवीतून उदय साळकर आणि नुवेतून डॉ. मायनो गुदिन्हो यांना उमेदवारी दिली आहे.

तृणमूलची दुसरी यादी आज

मगोपसोबत युती असलेल्या तृणमूल काँग्रेसची दुसरी यादी शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तृणमूलने चार दिवसांपूर्वी अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर शनिवारी त्यांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. भाजप, काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या काही उमेदवारांना तृणमूलने गळ घातली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास यादीत दिग्गजांच्या नावांचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.