डिचोलीत भाजपकडून पाटणेकरच लढणार!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:26 am
डिचोलीत भाजपकडून पाटणेकरच लढणार!

सभापती राजेश पाटेकर यांची भेट घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सदानंद शेट तानावडे व भाजपचे स्थानिक पदाधिकारी.

डिचोली : भाजपकडून डिचोलीतून सभापती राजेश पाटणेकर हेच निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी समजूत काढल्यानंतर पाटणेकर निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आहेत. पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पाटणेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
आरोग्याच्या कारणास्तव आपण यावेळी निवडणूक लढवणार नाही. भाजप डिचोलीत जो उमेदवार देईल त्याला आपण पूर्ण सहकार्य करू, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी पक्षाला अगोदरच कळवले होते. त्यामुळे भाजपने डिचोलीसाठी माजी आमदार नरेश सावळ आणि अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना गळ घातली होती. परंतु, त्या दोघांनीही नकार दिल्यानंतर शिल्पा नाईक यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत शिल्पा नाईक पराभूत होत असल्याचे दिसून आल्याने शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी डिचोलीला जात सभापती पाटणेकर यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी, सतीश गावकर, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, वल्लभ साळकर, अरुण नाईक, तुळशीदास परब, अभिजीत तेली, अनिकेत चणेकर, सुदन गोवेकर, दीपा शिरगावकर आदी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि समस्यांवर तोडगे काढत पाटणेकरांना निवडणूक लढवण्यास तयार केले. त्यामुळे भाजपसमोरील डिचोलीत आव्हान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा