माझे बाबा एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

त्यांच्याविषयी सांगण्यासारखं खूप आहे. कारण ते माझे बाबा, मित्र, गुरु सारंच आहेत. त्यामुळे त्या त्या वेळी आलेले अनुभव आम्हाला अलगद आमच्यात बदल करणारे आणि घडवणारे भासतात.

Story: माझे बाबा | सायली रामकृष्ण गर्दे |
22nd January 2022, 11:12 pm
माझे बाबा एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

आई जशी महत्त्वाची आहे तसेच बाबाही. कारण आई ही आपल्याला गर्भात वाढवते आणि बाबा सतत डोक्यात विचारांच्या चक्रखाली वावरत असतात व आपल्याला व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करण्याची तयारी करत असतात. बाबा म्हणजे घराची भक्कम भिंतच असते. एक मोठा आधार असतो. छत्र असतं. ज्यात सारं काही सामवलेलं असतं. 

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गिमोण्यात जन्मलं,

नाना-माईच्या कुशीत सुखात विसावलं।।

रामकृष्ण नाव, नावाप्रमाणेच शोभतात,

संत, खट्याळ वृत्या त्यांच्या अंगी वसतात।।

घरापासून राहून लांब शिक्षण याज्ञिकाचं घेतलं,

शंकराचार्य गुरु अन कीर्तन रंगी मन रंगलं।।

याच प्रवासात अनेक कला बहरल्या,

कीर्तिचा विजयध्वज सदैव उंचावला।।

आशीर्वाद-कौतुकाची थाप हीच मानली श्रेष्ठ,

सर्व काही करता करता सोसले भरपूर कष्ट।।

अहंकाराचा वारा कधीच नाही शिवला,

संसराचा तोलही खूप छान सावरला।।

जान्हवीची साथ आयुष्यभरासाठी लाभली,

दोन कन्यांची पाऊले गोकुळ अंगणी उमटली।। 

चिमुकल्या हाताना एक बोट मिळालं,

धरलेल्या हाताला आजवर नाही सोडलं।।

स्वतःची कित्येक स्वप्न बाजूला ठेवली त्यांनी,

आमची स्वप्न मात्र आजही जपली त्यांनी।।

न सांगताच त्यांना खूप काही कळतं,

बाबा असले तरी मित्र म्हणून जुळतं।। 

चेष्टा मस्करीनी घर आमचं हसतं,

कधी नसले ते घरी सगळं काही रुसतं।।

बाबा,मित्र,गुरु सगळं मिश्र आमचं नातं,

बापमन कसं असतं,त्यांना पाहून जाणवतं।। 

बाबासारखे सर्वगुणसंपन्न वडील आम्हा लाभले,

प्रत्येक क्षणांच्या वेळी कधीच बोट नाही सोडले।।

बाबा,गुरु,मित्र नाती एकसूत्रात बांधली गेली असे ज्यांच्याशी निखळ, खट्याळ, भक्कम आधार देणारं गोड नातं ज्यांच्याशी तयार झालं ते आमचे बाबा. त्यांचं जीवन, किंवा त्यांचं आमच्यासाठी असणं आणि त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं ते असं थोडक्यात मांडणं सोपं नाही. कारण न बोलता आम्हाला काय पाहिजे हे जाणून आमच्याही नकळत आम्हाला ते आणून देणं आणि त्यानंतर आम्हाला झालेला आनंद बघणं, किंवा न सांगता त्यांना झालेला आनंद आमच्याहीपर्यंत न कळत पोहचणं हे फार सुंदर आहे. 

लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत जे अजूनही आठवले तरी कधीकधी डोळ्यांत पाणी येतं, कधी हसू येतं, कधी मौज वाटते, कधी रागही... अशा सगळ्या संमिश्र भावभावनांचं विश्व ते आमच्यासाठी तयार करत होते आणि आम्हीही त्यात रमू लागलो. आमच्या (म्हणजे माझी मोठी बहिण गौरी ताई आणि मी) जन्मानंतरचा काळ आम्हाला आठवतो. पण त्यांच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर गोष्टीही आम्हाला कळल्या. ते सुद्धा मस्ती खूप करायचे असं ऐकायला मिळालं. म्हणूनच की काय, आम्हाला मस्ती केली तरी ते कधीच ओरडत नाहीत. मुली या वडिलांच्या नेहमीच लाडक्या, जवळच्या आणि नाजूक धाग्यांनी बांधलेल्या असतात. पण लहानपणापासूनच आम्ही गोष्टी, गाणी, स्तोत्र यांचं बाळकडू घेत मोठे होत आलो. तसे अजूनही आम्ही लहानच आहोत म्हणा, कारण अजूनही तीच मस्ती, तोच खोड़करपणा आहे. 

बाबांचा प्रवास थोडक्यात मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून ते शिक्षणासाठी नेहमीच घरापासून, घरातल्यांपासून लांबच होते. त्यामुळे स्वतंत्र, जबाबदारीची जाणीव त्यांच्यात आधीपासूनच आली आणि ते स्वतः धीट बनले. आम्हालाही त्यांनी तसंच वाढवलं. नक्कीच आमच्या आईची साथ त्यात त्यांना लाभली. त्यांच्याकडे असलेल्या सर्वच कलांचा आम्हाला अभिमान वाटतो. नाटकात त्यांची झालेली स्तुती, त्यांना मिळालेली शाबासकी, लोकांचं प्रेम सर्वच आमच्यासाठी खूप आनंद आणि मुख्यतः समाधान देणारं आहे. नेहमीच सगळ्या चांगल्या गोष्टीस प्रोत्साहन देणं आणि जर काही चुका होत असतील तर आम्हाला समजावून त्या सांगणं हे मित्रत्वाचं नातं आम्हाला अजूनही आनंद देणारं आहे. सगळ्यात जास्त अभिमान तेव्हा वाटतो जेव्हा बाबांविषयी त्यांना पाहिलेले न पाहिलेले, पण त्यांचं नाव कानावर पडलेले लोक बाबांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी ,"हा, गर्दे ना चांगला माणूस", "त्यांच्याविषयी आम्ही खूप ऐकलंय", "उत्कृष्ट कीर्तनकार आहेत" वगैरे वगैरे सांगतात तेव्हा ऊर भरून येतो. अगदी ते तसेच आहेत. एक मुलगा, भाऊ, नवरा, जावई, बाबा, मित्र या साऱ्या भूमिका ते उत्तम निभावतात आणि आम्हालाही त्यातूनच शिकायला मिळतं. "काही नाही मिळालं तर कधीच निराश नाही व्हायचं", "आपण आपलं कर्तव्य करायचं", असे एक ना अनेक सल्ले ते देतात आणि स्वतः ते पाळतात. जिथे कठोर असलं पाहिजे तिथे कठोर असतात आणि जिथे मवाळ असले पाहिजे तिथे तसे असतात. त्यांची हीच वृत्ती आणि शिकवण आम्हाला त्यांचे अंतरंग खुलवून दाखवते. 

त्यांच्याविषयी सांगण्यासारखं खूप आहे. कारण ते माझे बाबा, मित्र, गुरु सारंच आहेत. त्यामुळे त्या त्या वेळी आलेले अनुभव आम्हाला अलगद आमच्यात बदल करणारे आणि घडवणारे भासतात.  त्यांच्यामुळेच कीर्तन, कथाकथन, वक्तृत्व, वेशभूषा इत्यादी मध्ये मी भाग घेतला आणि त्यात मला आणि माझ्या ताईलाही खूप सहकार्य केलं. त्यांची साथ, प्रोत्साहन, आणि विश्वास आम्हाला घडवू लागला आणि आम्ही अजूनही घड़तो आहोत. त्यांची काम करण्याची पद्धत, संभाळून घेण्याची कला, नेहमी स्वतः सोबत इतरांनाही हसवत ठेवणं, आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं हे त्यांचे गुण खूप भावतात. एक कलाकार म्हणून, बाबा म्हणून त्यांच्याविषयी खूप प्रेम, विश्वास आणि अभिमान वाटतो.