अग्रलेख । तरुणांना संधी

भाजप, आप किंवा आरजीपी असो यांचे किती उमेदवार जिंकून येतील हा नंतरचा प्रश्न आहे, पण या पक्षांनी तरुणांकडे नेतृत्व देण्याची केलेली घोषणा ही स्वागतार्ह आहे.

Story: अग्रलेख |
20th January 2022, 01:07 am
अग्रलेख । तरुणांना संधी

आम आदमी पक्षाने पंजाबनंतर गोव्यात आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला. भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांनाच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानतंर आप हा दुसरा प्रस्थापित पक्ष आहे, ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. नव्यानेच नोंदणी झालेल्या रिव्होल्यूशनरी गोवन्स या पक्षानेही मनोज परब हे पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. तिन्ही पक्षांच्या धोरणांमध्ये ही एकच समानता आहे, जिथे तरुण उमेदवारांना या पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसने आपला मुख्यमंत्री कोण असेल ते अजून जाहीर केलेले नाही. तृणमूल - मगोने आपली योजना घोषित केलेली नाही. गोवा फॉरवर्ड काँग्रेसच्या कुबड्यांवर असल्यामुळे त्यांचा दावेदार असू शकत नाही. निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते पण सध्यातरी आप, भाजप, रिव्होल्यूशनरी गोवन्स - आरजीपी यांनी तरुणांना नेतृत्व करण्याची संधी देणारी घोषणा केल्यामुळे तरुण वर्गाला राजकारणात चांगले दिवस येतील असे म्हणायला हरकत नाही.
आप आणि आरजीपीने तर आपले अनेक उमेदवार हे तरुण दिले आहेत. काँग्रेसनेही अनेक उमद्या तरुणांना संधी दिली आहे, पण काही ठिकाणी तेच जुने चेहरे उमेदवार म्हणून दिले आहेत. काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा आहे. त्यांंनी तृणमूल काँग्रेस, आप, मगो, राष्ट्रवादी यांच्याशी युती करण्याचे टाळले. गोवा फॉरवर्ड, तृणमूल यांंनी भाजपला वगळून इतर पक्षांची युती व्हावी असा प्रस्ताव दिला, पण काँग्रेसने 'एकला चलो' ची भूमिका घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सध्या अज्ञातवासात आहेत. त्यांना खरोखरच कोविडची लागण झाली आहे की फातोर्डाबाबात काँग्रेसने तडजोड केली म्हणून नाराज होऊन ते अज्ञातवासात गेले आहेत हे एक कोडे आहे. चोडणकर सक्रिय नसताना अनेक निर्णय घेतले जात आहेत. आपल्याला हवे ते उमेदवार जाहीर करण्याचे सत्रच काँग्रेसच्या काही नेत्यांनी आरंभले असल्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही स्वयंघोषित असू शकतो.
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये भगवंत मान आणि गोव्यात अॅड अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. आपने आधीच भंडारी समाजातील नेता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असेल असे जाहीर केले होते, त्याप्रमाणे पालेकरांचे नाव आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. आपने भंडारी समाजाला आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न केल्यापासून समाजात फूट पडल्याचे चित्र आहे. समाजाचे अनेक नेते राजकीय पक्षांच्या अशा धोरणांवर टीका करतात. काहींनी भंडारी समाजाच्या मुख्य समितीवर खापर फोडले आहे. असे असले तरी आपने आमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केल्यामुळे समाजातील मतांचा अनेक ठिकाणी आपला फायदा होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. 
भाजप, आप किंवा आरजीपी असो यांचे किती उमेदवार जिंकून येतील हा नंतरचा प्रश्न आहे,. पण या पक्षांनी तरुणांकडे नेतृत्व देण्याची केलेली घोषणा ही स्वागतार्ह आहे. घराणेशाही आणि काही ठराविक लोक पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रिपदांसाठी लॉबिंग करत असताना अशा वेळी तरुणांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करणे याला फार महत्व आहे. गोव्याच्या राजकारणात उमेदवारी वाटपासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत काही लोक पैशाच्या जोरावर लॉबिंग करत असतात. अशा सर्व पद्धतीना फाटा देत नेतृत्वासाठी तरुणांची निवड राजकीय पक्ष करू लागले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. रिव्होल्यूशनरी गोवन्स सारखा पक्ष काही तरुणांनी गेल्या काही वर्षात मोठ्या मेहनतीने उभा केला आहे. राज्यभर या पक्षाची हवा आहे. पण आवाज असणे आणि निवडणुकीत तो आवाज चालणे यात फरक असतो. पक्ष नवा आहे, त्यामुळे निवडणुकीत त्याची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अनेक तरुण चेहरे या पक्षाने दिले आहेत. भाजप हा सत्तेत असलेला पक्ष आहे, फार जुना राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यमान आमदारांसह जिंकून येणाऱ्या चेहऱ्यांना आपल्याबाजूने घेतले आहे. काँग्रेस असो किंवा तृणमूल मगो वगळता सर्वांनीच मोठ्या प्रमाणात तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभेतही अनेक तरुण नेते दिसतील. राजकारणात तरुणांनी येण्याचा हा अध्याय यशस्वी व्हायला हवा.