सेवाभावी, निष्ठावान लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी

Story: राजू बर्वे (वाळपई-सत्तरी) |
20th January 2022, 12:36 am
सेवाभावी, निष्ठावान लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी

गोवा विधानसभा निवडणूक ४० जागांसाठी दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली. २१ जानेवारी पासून अर्ज घेण्यास प्रारंभ होईल. खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वारे गावोगावी शहरात पसरू लागले. राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्ष आणि नवीन जन्माला आलेल्या पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले. काही आमदार मंत्र्यांनी राजीनामे देऊन ते दुसऱ्या पक्षात स्थापन्न झाले. काहीजण पचत नसल्याने माहेरी म्हणजे पूर्वीच्या पक्षात स्वगृही परतले. शेवटी राजकारण म्हणजे पैसा का? किंवा राजकारण म्हणजे सेवा?  हा सामान्य जनतेच्या मनात आजही प्रश्न पडला आहे.

गोवा राज्याच्या विकासासाठी आपण असे करणार, आपण तसे करणार म्हणणारे राजकीय लोक अनेक. कितपत विकास केला हे ज्यांना त्यांना माहीत. फक्त शहरात विकास झाला म्हणजे गोव्याच्या कानाकोपऱ्यांत विकास झाला का, हा प्रश्न पडतो. गोव्याच्या आज बऱ्याच भागात खेडोपाडी रस्ते, वीज, पाणी याची समस्या आजही लटकत आहे. बऱ्याच जणांना ह्या करीता हेलपाटे घालावे लागतात. आजची तरुण पिढी रोजगारापासून दूर आहे. गावातल्या जमिनीत काही पिकवणार म्हटल्यावर जमिनी मोकाशे खाली येत आहे किंवा खाजगी वनक्षेत्रात आलेल्या आहेत. पण ह्याचे राजकीय नेत्यांना सोयरसुतक काहीच नाही. सामान्य मतदार आहे तसाच आहे.

आज राजकीय नेता स्वतःला उमेदवारी मिळावी यासाठी धडपडत आहे. मग ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते. सर्व साधारण राजकीय नेत्यांना एक कारण फार चांगलं मिळतं ते म्हणजे "आपल्या मतदारसंघातील लोकांकरीता,.जनतेकरीता मला निर्णय घ्यावा लागतो " वास्तविक प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदाराला याचे कारण माहीत असते पण मतदार बोलत नाही एवढेच. एखाद्या पक्षातील नेते काहींना उमेदवारी देण्याची आश्वासने देतात. काहीं पक्ष आपले सरकार टिकवण्यासाठी आमदार आयात करतात. आयात केलेले आमदार दुसऱ्या पक्षातील असतात. मतदारसंघातील प्रामाणिक कार्यकर्ता काहीवेळा म्हणण्यापेक्षा बहुतेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्षाकरिता निष्ठावान कार्यकर्ता बाजूला रहातो. काही पक्षांनी आपली तत्वे निष्ठा ह्या गोष्टीवर पांघरूण घातलेलं आहे. प्रत्येक पक्षातील राजकीय नेते आपला पक्ष कसा निष्ठावान,.सामान्य जनतेची सेवा करणारा...गरीबातल्या गरीब माणसापर्यन्त पोचणारा याचा आव आणत असतो. 

एखादा उमेदवार आपला राजकीय वारसा चालावा म्हणून आपल्या नंतर मुलाला..सुनेला पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवतात. मग पिढ्यांनपिढ्या त्यांच्या घरातील उमेदवार ठरतात. घरातील वारश्याला उमेदवारी मिळण्यासाठी काहीवेळा दुसऱ्या पक्षात माकडासारख्या उड्या मारायची तयारी असते.  ह्याला काही राजकीय निष्ठावंत उमेदवार अपवाद आहे. ते आपला दर्जा सांभाळतात. स्वतः निष्ठावान तत्वे पाळणारा नेता असतो. राजकीय क्षेत्रात कोण आणि केव्हा एकमेकांचे दोस्त शत्रू बनेल याचे गणित मांडणे कठीण असते. राजकीय स्तरावर सुद्धा  एखाद्या घरात भांडण तंटे चालू असतात. खरी नाती बाजूला ठेवून नवीन वादाना सुरुवात होते. राजकीय हवास्यापोटी काही नेते घरातल्या नात्यांचा विचार करत नाही. त्या नेत्यांना फक्त राजकीय नाती जपायची असतात. राजकीय नेते फार हुशार असतात म्हणून राजकारणात टिकून रहातात. कुणाशी कसं आणि किती बोलायचं त्यांना पक्क माहीत असत. कुणाजवळ भावनिक दृष्टीने बघायचं त्यांना बरोब्बर माहीत आहे. एखादा नेता आपल्या राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोचवतो.गोव्याचा विकास केला..ज्यांनी निष्ठा तत्वं पाळली. त्या तत्वांना आज काही पक्ष विसरले आहेत. काही पक्षांत मनमानी कारभार चालतात. राजकीय वारसा जपायला नेत्याबरोबर पक्षातील नेते अग्रेसर आहेत. शेवटी सत्तेसाठी काहीपण? मग तत्वे..प्रामाणिकपणा.. निष्ठा ह्या गोष्टीवर पाणी फिरवले तरी चालेल. 

मतदारांनो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात माकडासारख्या उड्या ह्या चालू राहतील, कारण निवडणूक निकालानंतर सुद्धा निवडून आलेले उमेदवार पदांसाठी काहीही करण्यास तयार असतात, कारण त्यांना समाजसेवा करायची असते. फक्त ती सेवा कितपत प्रत्येकापर्यन्त पोचते हे त्या मतदाराला माहीत.

आपल्या हातात एकच असते ते म्हणजे मतदान. पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत त्या दिवशी पुरते तरी आम्ही मतदारराजा असतो. मतदान करीपर्यन्त जे तुम्ही सांगाल ते नेते करण्यास तयार असतात.  पण मतदान करताना विचार करा. आपले मत मौल्यवान असते. मतदानाचा हक्क बजावा. तो आपला हक्क आहे. मतदान करताना योग्य उमेदवार निवडा. त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. ज्याचे चारित्र्य शुद्ध, सामान्य गरीब लोकांची दुःखे ओळखणारा, जनसेवेची जाण असलेला, सामान्य सुविधा प्रत्येकाच्या दारात पोचवणारा नेत्याला निवडा. खोट्या आश्वासनाना बळी पडू नका. पैशांना भुलू नका. आजची पिढी सुसंस्कृत आहे. काय करावं काय नाही हे त्यांना माहीत आहे. आपण सर्वजण सुज्ञ आहोत. आपण लाचार होऊ नका. 

उमेदवार आपल्या दारात येतील त्यांना तुमचे सतावणारे प्रश्न विचारा, त्यांना विचारण्याची हीच संधी आहे.