धालोत्सव- शैक्षणिक मार्गदर्शक

धालोत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो एक शैक्षणिक मार्गदर्शक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंपरागत चालत आलेली लोकगीते जरी अशिक्षित लोकांकडून निर्माण झाली असली तरीही सुशिक्षितांच्या लिखाणा एवढीच त्यांची क्षमता असल्याचे दिसून येते. फरक एवढाच की हे लोकवेद लिखित नसून मौखिक स्वरूपात ऐकावयास मिळतात.

Story: लोकसंस्कृती । पिरोज नाईक |
16th January 2022, 11:38 Hrs
धालोत्सव- शैक्षणिक मार्गदर्शक

धालोत्सव- शैक्षणिक मार्गदर्शक


केसरां बाए केसरां हींs काळे कांबळीची केसरां हीं s काळे कांबळीची केसरां,
वनदेवते तुळशीमाये सारखें दैवत हेंs नाही त्रिभुवनी रतन हेंs,
नाही त्रिभुवनी रतन…

पौष महिना सुरू होताच ग्रामीण भागात मांडा-मांडावरून वनदेवतेचे स्तवन करणाऱ्या धालांचे गायन कानावर पडू लागते. शेवटची रात्र बुधवारी किंवा रविवारी येईल अशापद्धतीने धालांना सुरुवात करतात. कारण शेवटच्या दिवशी देवचाराला चोरू-रोट घालून कोंबडा बळी देतात. रात्री-अपरात्री धालो खेळणाऱ्या बायकांना कोणत्याही प्रकारची नड बाधा न येता धालोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून राखणदाराला त्याचा मान देतात व गावातील इतर देवतांना विडा ठेवतात.
‘देवचार’ म्हणजे गावचा राखणदार याला ‘वाटारो’ असेही म्हणतात. वाट चुकणाऱ्यांना वाट दाखविणारा तो ‘वाटारो’ जसा ‘कटंगळीचा दादा’, म्हापशाचा बोडगेश्वर तसा धालो मांडाचा 'वाटारा'. प्रत्येक गावाला सीमारेषा असते. त्या सीमेवर राखणदाराचे स्थान असते. भूत-प्रेत, ब्रह्म-समंध यांच्यापासून रक्षण करण्याचे काम देवाने देवचारावर सोपविले आहे. तो गावाबाहेरील वाईट शक्तींना गावच्या वेशीत प्रवेश करण्यापासून परावृत्त करतो. दुष्ट शक्तींना वेशीवरच अडवून ठेवतो. त्याचप्रमाणे अडल्यानडल्या व्यक्तींना दृश्य व अदृश्यपणे मदत करण्याचे कामही ही शक्ती करत असते.
 वेऱ्या माझ्या गावा हो रामा भोवते भोवते आडे हो रामा,
 भोवते भोवते आडे,
वाटारो पुरीस म्हजो हो रामा ढवळे साजे घोडे हो रामा ढवळे साजे घोडे…
मालून महिन्यातील मालिनी पौर्णिमा जवळ आली की सगळा परिसर पिठोरी चांदण्यात न्हाऊन निघतो. पांढरं शुभ्र चांदणं; झाडाच्या सावलीत चांदणं डोकावल्यामुळे एखादी अकराळ-विकराळ आकृती; संभ्रम निर्माण करणारी; याच दिवसात भुताखेतांचा संचार, कडाक्याची थंडी; पण या कशाचीही पर्वा न करता वनदेवतेवरील श्रद्धेने म्हणा अथवा धालोच्या ओढीने म्हणा, एकमेकींना साद घालत हर्षभरित मनाने मालिनी बाल-बच्चांसह धालो मांडावर जमा होतात.
ओवळीचे ओवळ गे फुलून गुल्ल जालां गे,  फुलून गुल्ल…
वतान करपले वाऱ्याने झडपले पडले भूमीवर गे, पडले…
हातान काडिले माथ्यान माळीले भोगिले आयावपण गे, भोगिले…
थंडीच्या दिवसात फुलणारी ही सुगंधित फुले आपल्याला सदैव डोक्यात घालून मिरविण्यासाठी त्या वनदेवतेकडे अखंड सौभाग्याची मागणी करतात.
पान म्हजे फोफळ तुजे चुना कोणालागी आहे गे,
म्हादरशिला माळीते भुजा मोडिते नवदेवते लागी चुना आहे गे,
हाते माळीते भुजा मोडिते रंभा लागी चुना आहे गे,
गुरु लागी चुना आहे गे…
शेवती माळीते भुजा मोडिते सातेरी लागी चुना आहे गे...
या धालोगीतातून देवाच्या आवडीच्या फुलांची नावे ऐकावयास मिळतात. धालोत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो एक शैक्षणिक मार्गदर्शक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंपरागत चालत आलेली लोकगीते जरी अशिक्षित लोकांकडून निर्माण झालेली असली तरीही सुशिक्षितांच्या लिखाणा एवढीच त्यांची क्षमता असल्याचे दिसून येते. फरक एवढाच की हे लोकवेद लिखित नसून मौखिक स्वरूपात ऐकावयास मिळतात. आज शालेय अभ्यासक्रमानुसार शिकविण्यात येणाऱ्या परिसर, गणित, संगीत, कवायतीच्या मुक्त हालचाली, नृत्य-गायन, नाट्य, सुसंस्कार, एकत्र कुटुंबपद्धती निरनिराळे नातेसंबंध हे सारेच धालोगीतातून दृष्टोत्पत्तीस येते.
त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान नव्हते. आजच्यासारखी शाळा-महाविद्यालये नव्हती. आर्थिक व्यवहार कमी होता पण वर्षभर कुटुंबातील व्यक्तींच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटेल एवढे धनधान्य घरात असायचे. पूर्वज साक्षर नव्हते. पण व्यवहार ज्ञान होते. त्यांची निरीक्षणशक्ती एवढी प्रगल्भ होती की, एखादे पीक घ्यायचे झाल्यास झाड लावून त्याच्यापासून किती दिवसांनी उत्पन्न मिळेल त्यासाठी ती वनस्पती कोणत्या अवस्थांतून जाईल, किती माणसे कामाला लागतील याची तंतोतंत माहिती असणारे जाणकार त्यावेळी होते. यातूनच रोप लावणे, लावून त्याची वाढ होऊन सुपारी बाजारात नेण्यापर्यंतचा कालावधी दर्शविणाऱ्या धालोगीतांचा जन्म झाला.
 आणके फोफळ नव्हे नारी माणके फोफळ गे
 माणके फोफळ नव्हे नारी आयणे फोफळ गे
आयणे फोफळ नव्हे नारी भिजावे फोफळ गे
 भिजावे फोफळ नव्हे नारी कोम फोफळ गे
मुलांना घोकंपट्टीपेक्षा नाचत, खेळत शिकणे आवडते. गायन कलेची आवड असलेला विद्यार्थी कविता लगेच पाठ करतो. धालोगीतातून भाताच्या जाती, शेतात करावी लागणारी नडणी, लावणी, कापणी यासारखी कामे, बांधकामासाठी लागणारे साहित्य, निरनिराळ्या फुलांची नावे, वड, पिंपळ, रुमड यासारख्या वृक्षांची नावे, मोर, घोण, कवडुलो यासारख्या पक्षांची नावे हसत-खेळत पाठ होतात.
आयज भोवणी काढली गे काढली,
काढूनी पोरा कवडुल्या सांगलेली सांगणी नरवशी,
चिचेर घोटीर बांधशी आपले पोट फाळशी.
 मोठ्या माणसांचे ऐकावे, त्यांना मान द्यावा ही आपली संस्कृती. ते आपल्याला नेहमीच चांगला सल्ला देतात. त्यांचे न ऐकता आपल्या मनाला येईल तसे वागलो तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. यासारखी संस्कारी गीते धालोतून ऐकावयास मिळतात. या लोकगीताद्वारे मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. निरीक्षणशक्ती वाढीस लागते. मोर, घोण, कवडुलो यासारख्या मुक्त हालचालीच्या खेळांमुळे शरीराला व्यायाम मिळतो. त्याचबरोबर आनंददायी शिक्षणसुद्धा पदरात पडते.