रेखा मिरजकर यांची कविता : पीळ

रेखा मिरजकर यांची एकूण सात पुस्तके आहेत. त्यात दोन ललित लेखसंग्रह, दोन कथासंग्रह व दोन कादंबऱ्यांसह एक कवितासंग्रह (बोली आरुषीची)

Story: कवितेतील भावतरंग। चित्रा क्षीरसागर, |
16th January 2022, 12:45 Hrs
रेखा मिरजकर यांची कविता : पीळ

पीळ

वेणीचे  पेड आवळताना,

म्हणाली  होतीस  ना,

"बाईच्या  जातीत सोसावंच लागतं "

त्या वेणीचा पीळ आजही  

माझ्या तनामनावर.....

त्यातूनच साहवत गेलं, 

प्रत्येक  नात्याचं बांधीलपण....

आताश्या मात्र एखादी मुक्तकेशा ...

सतत सादावत रहाते मला

तिच्या त्या मुक्त  केशसंभारात मी शोधत  रहाते 

माझं  हरवून  गेलेलं  मीपण

गवसेल  का ते पण?

लहानपण आठवलं की मन उदास, कातर होत जातं. शाळा, बागडणं, खेळ, सणांची मज्जा, केसांच्या वेण्या, रिबिनी, नागपंचमी आली की, मेंदी आणून भिजवायची. त्यात कात घातला म्हणजे जास्त रंगायची. झुले मोठमोठ्या झाडांना बांधलेले असत. त्यावेळी झुला खेळणे अशा अनेक गोष्टी मनाला मोहवून टाकायच्या. पूर्वी लांबच लांब केस असायचे आणि शक्यतो मोकळे केस सोडलेले घरातील मोठ्या व्यक्तींना चालत नव्हतं. त्यामुळे तीन पेडांची वेणी म्हणजे अगदी खोबरेल तेल केसांना लावून चापून चोपून दोन वेण्या घातल्या जायच्या. कपाळावर एकही बट यायला नको. इतकं कडक वातावरण होतं. केसाच्या वेणीचे पेड आई जोरात घट्ट आवळायची आणि मुळांपासून केस दुखायचे. तेव्हा लहानपणी रडू यायचं. ‘हलक्या हातानं वेणीचे पेड घे ना आई’, असं म्हटलं तर आई म्हणायची,  ‘तू बाई आहेस. तुला हा त्रास सोसावाच लागेल.’ आईनं लहानपणी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ बाईच्या तरुणपणी आणि तेही लग्नानंतर सासरी आल्यावर मुलीला जास्त कळू लागतो, अशा आशयाची कविता गोमंतकातील ज्येष्ठ कवयित्री रेखा मिरजकर यांची आहे. ‘पीळ’ हे त्यांच्या या कवितेचे नाव आहे. 

केसाच्या वेणीच्या माध्यमातून कवयित्रीने लहानपणी जो सोसण्याचा संस्कार झाला, तो झिरपत झिरपत अंतःकरणात प्रवाही राहत गेला आणि कवितेच्या रूपाने तो कागदावर उतरला. वेणीचं पेड हे केवळ वेणीचं पेड किंवा पीळ होता का? तर नाही. लहानपणापासूनच बाईच्या जातीला एका चौकटीत बंदिस्त केलं जायचं. संस्काराच्या नावाखाली तिच्या भावभावना बंदिस्त केल्या जायच्या. मोठ्यांदा हसायचं नाही, बोलायचं नाही. वडिलधाऱ्या माणसांच्या मध्ये बोलायचं नाही. बांगड्यांचा आवाज येता कामा नये, स्वयंपाक आला पाहिजे, घरातील सर्व  कामे आली पाहिजेत असे किती अन् काय काय... कवयित्रीच्या कवितेतून या सर्व गोष्टी उजागर होतात तसेच एकत्र कुटुंबपद्धतीत कवयित्रीचं बालपण, संगोपन झाल्याचं जाणवत. या सर्व संस्काराच्या माध्यमातून आयुष्याची जडणघडण होत गेली. त्यातूनच नातं जपत गेलं आणि प्रत्येक नात्याची बांधिलकी जपत गेली. आईने दिलेले संस्कार या वेणीच्या घट्ट पिळासारखे ती जपत राहिली. सासरीही या नात्याची जोपासना केली आहे. परंतु आताशा मात्र या वेण्या घट्ट पिळात अडकून पडल्या नाहीत. त्या मोकळे केस पाठीवर सोडून मुक्तपणे वावरताना पाहून कवियित्री स्वतःला त्यात शोधत राहते. लहानपण, मुक्त विचार, बंधनातून मुक्ततेकडे. या केशसंभारात कवयित्री स्वतःला पाहते, शोधते आणि स्वतःलाच प्रश्न करते की, मीपण हरवले आहे, ते सापडेल का?

या कवितेत तीन पिढ्यांचा उल्लेख आला आहे. कवयित्रीच्या आईवडिलांची पिढी, कवयित्रीची दुसरी पिढी आणि तिसरी मुक्त केसांत रमणारी तिच्या मुलीची पिढी. हा सगळा फरक कवयित्रीने अधोरेखित केला आहे. तीन पिढ्यांचे सूत्र ‘पीळ’ या कवितेत मांडले आहे..

शब्द साधे, सोपे परंतु मनाला पटणारे आहेत. पूर्वीचा काळ आणि सध्याच्या काळाचेही वर्णन या कवितेते आले आहे. पूर्वी केस मोकळे सोडणे अशुभ मानत होते. शुभ–अशुभाच्या संकेताने बऱ्याच गोष्टी सांगितल्या जायच्या. जसं पायाची तळवी ही खोल असली पाहिजेत. म्हणजे पायाचा पंजा आणि टाच यामधील जो तळ आहे तो खेल असला तर पाय लक्ष्मीकारक नाही कप अभद्र. असे अनेक संकेत जनमानसात रुढलेले होते. कावळा, मुंग्या, मधमाशा, काळी काय, काळा कुत्रा यांच्या बाबतीतले गैरसमज, पाण्याचा नळ सारखा वाहता कामा नये. असे एक ना अनेक अलिखित संकेत रूढ होते. आजही थोड्यफार प्रमाणात का होईना आहेत. तरीही बऱ्याच रूढी, परंपरा, संकेतांना आणि शुभ-अशुभाला फाटा मारत तरुण पिढी पुढे जात आहे. मुली मोकळे सोडून वावरत आहेत  आणि या मुक्त केशसंभारात कवयित्री स्वतःला पाहते. मुक्त वावरल्यासारखं. जे तिला कधीच वावरता आलं नाही. 

वेणी हे प्रतीक घेऊन कवयित्री काहीतरी सांगू पाहते. बाईच्या जीवनाचा  आणखी एक पदर उलगडून दाखवते. वेणीच्या घट्ट पेडात अडकलेलं तिचं मन मुक्त केशसंभारात मोकळं होऊ पाहतं आणि ती त्याचे स्वागतही करते. वेगवेगळ्या माध्यमातून कवयित्री स्त्रियांचं दुःख, मान-सन्मान, अडीअडचणी, न बोलता येणं, समाजाने घालून दिलेल्या संकेतांना कवितेच्या माध्यमातून मुक्त करणं म्हणजे स्वतःला मोकळ करत जाणं.