‘विघ्नहर्ता’...पु.शि. नार्वेकर

अलीकडेच ज्यांना देवाज्ञा झाली असे २७व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले, स्व. पु. शि. नार्वेकर हे गोमंतकाच्या मुक्तिपूर्वकालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संक्रमणाचे प्रथम साक्षीदार होते.

Story: लोकमुद्रा/ डॉ. विद्या प्रभुदेसाई |
19th December 2021, 12:09 am
‘विघ्नहर्ता’...पु.शि. नार्वेकर

अलीकडेच ज्यांना देवाज्ञा झाली असे २७व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले, स्व. पु. शि. नार्वेकर हे गोमंतकाच्या मुक्तिपूर्वकालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संक्रमणाचे प्रथम साक्षीदार होते. गोमंतकातील कुळे गावात जन्म झालेल्या नार्वेकरांनी आपण बालपणापासूनच लेखनाचा वसा घेतल्याचेही  आपल्या पहिल्याच  कथासंग्रहाच्या प्रास्ताविक निवेदनात म्हटले आहे. एकुणच स्वार्थापेक्षा त्यागाचे महत्त्व अधोरेखित करणारी आणि जीवनातील विकृतीकडे बोट न दाखवता त्यावर हात ठेवत मांगल्यपूर्ण अशी सकारात्मक दृष्टी देणारी अशी त्यांची कथा आहे. ‘विघ्नहर्ता’ हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह इ.स. १९८६ मध्ये दै. गोमंतकाच्या पुस्तकप्रकाशन योजनेअंतर्गत प्रकाशित झाला होता. गोमंतकात प्रसिद्ध   होणा-या विविध दैनिकांच्या पुरवण्यांमधून तसेच दिवाळी अंकांत पूर्वप्रसिद्धी मिळालेल्या काही कथांचे संकलन या संग्रहात केले आहे. त्यांच्या बहुतांश कथांची कथानके प्रत्यक्ष जीवन जगताना आलेल्या अनुभवातून साकारली आहेत.

या संग्रहातील पहिलीच शीर्षककथाही अशाच अनुभवाचा परिपाक आहे. यातील कथानकाला गोमंतकातील पोर्तुगीज राजवटीची पार्श्वभूमी  लाभली आहे. कथेचे कथानक दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात गावचा रेजिदोर असलेला काशिनाथबाब काकोडकर याने आपला मित्र विसुबाबची पोर्तुगीजांकडे खोटी चुगली केल्याने पोलीस विसुबाबला  ऐन चतुर्थीच्या दिवशी पकडून नेतात. या संदर्भात कथेतील रेजिदोर काशिनाथबाब हा मैत्रीपेक्षा कर्तव्य मोठे असल्याने आपल्याला हे करणे भाग पडले असा आभास दाखवतो. तर कथेच्या दुस-या भागात विश्वनाथचा मुलगा घरात पुजलेल्या विघ्नहर्त्याकडे साकडे घालून आपल्या बालपणीच्या मित्राच्या आधाराने विश्वनाथची सुटका करतो असे ढोबळ कथानक असलेली ही कथा आहे.

मुक्तिपूर्व काळातील गोमंतकात असलेली पोर्तुगीज दहशत, कोंकणसहित संपूर्ण गोमंतकातील  महत्त्वाचा गणेश चतुर्थी हा हिंदु सण, या सणात असणारे  गोमंतकीय समाजातील कौटुंबिक उत्साहाचे वातावरण असे अनेक स्थानिक तपशील या कथेत प्रभावीपणे आले आहेत. मैत्रीचा विश्वासघात आणि मैत्रीतील निष्ठा अशा दोन्ही अनुभवांना कथाबद्ध करताना लेखकाने गोमंतकाची पार्श्वभूमी आणि गोमंतकातील सांस्कृतिक संदर्भांच्या आधारे उत्तम वातावरणनिर्मिती साधली आहे.

या संग्रहातील ‘नकुळ’ आणि ‘मीरा’ या दोन कथांनाही गोमंतकाची पार्श्वभूमी लाभली आहे. कथानकाच्या अनुषंगाने विचार केल्यास या दोन कथा म्हणजे एकाच कथानकाचे दोन तुकडे आहेत. गोवामुक्तिसंग्राम आणि जयहिंद चळवळ यांची पार्श्वभूमी लाभलेल्या ‘नकुळ’ या कथेत पारतंत्र्यातील गोवा आणि पोर्तुगीज राजवटीतील  अनन्वित  अत्याचार असा भाग आला असून ‘मीरा’ या दुस-या कथेत गोवा स्वातंत्र्याचा दिवस आणि नजिकचा काळ आला आहे. सातोस्करांच्या दोन भागात विभागलेल्या ‘आज मुक्त चांदणे’ या कादंबरीतील वातावरणाची आठवण करुन देणारे वातावरण या कथांत आले आहे. वास्तविक या दोन्ही कथांतील कथानक एकत्रित केल्यास ती एक दीर्घकथा होऊ शकली असती असे वाटते.  गोवामुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी जरी या दोन्ही कथांना लाभली असली तरी कथांमध्ये खचाखच भरलेले योगायोग आणि मेलोड्रॅमॅटिक पद्धतीने केलेला कथेचा शेवट पाहिला म्हणजे कथानक कृत्रिम झाल्यासारखे वाटते.

‘स्वातंत्र्य सैनिक’ या कथेतही एक कटू वास्तव कथारुपाने आले आहे. गोवा मुक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या संसाराची वा प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्य युद्धात झोकून देणारे कितीतरी स्वातंत्र्यसैनिक गोव्यात होऊन गेले. त्यांच्या या अमूल्य कामगिरी विषयीचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी सरकारने सुरु केलेली पेंशन योजना आणि प्रत्यक्षात अनेकवेळा त्याचे समोर दिसणारे विकृत रुप या कथेत  आले आहे. कवि कुसुमाग्रजांच्या भाषेत ‘बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे’ असे म्हणणा-या स्वातंत्र्यसैनिकांना पेंशन मिळविण्यासाठी एक तांत्रिक बाब म्हणून का होईना फॉर्म मिळविण्यासाठी रांगा लावणे, वशिला लावणे या गोष्टी करुन आपण स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सिद्ध करावे लागते हा विपर्यास या कथेत आला आहे.

‘न्याय’ या कथेचे कथानक गोमंतकातील वाळपई या गावात घडते. कथा घटनाप्रधान असून त्यात पोर्तुगीजकालिन समाजदर्शन घडते. ‘घोवाच्या भयान घेतला रान, थंय भेटलो खाटीक तेणी केला बटीक’ या मालवणी म्हणीची आठवण करुन देणारे कथानक या कथेला लाभले आहे. एकाबाजूला समाजातील पीडित घटकाला न्याय मिळवून देणारा तत्कालिन पोलीस आपण केलेल्या कामाचा ‘मोबदला’ कसा घेतो हे वाचून वाचक सून्न झाल्याशिवाय राहत नाही.

१९ डिसेंबर १९६१ या गोवा स्वतंत्र झालेल्या दिवसाचा कथाबद्ध वृत्तांत ‘मंतरलेला दिवस’ या कथेत आला आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर गोमंतकाच्या सर्व भागांत उमटणारे चैतन्यमय अशा वातावरणाचे पडसाद या कथेत आले आहेत. गोमंतकातील सर्व समाजगट आणि सर्व थरांतील लोकांनी या दिवसाचे उत्स्फूर्तपणे केलेले स्वागत तत्कालिन गोमंतकाच्या सामाजिक मानसिकतेचे दर्शन घडविते.

या संग्रहातील ‘उफराटे दिवस’ या कथेचे कथानकही एकुणच   आधुनिकता आणि त्यानुसार परिवर्तित मानसिकता यांचा नेमकेपणाने छेद घेताना दिसते. जन्या धनगर हा या कथेचा नायक असून पारंपरिक सामाजिक व्यवस्थेत आपली पारंपरिक जीवनशैली आचरताना तो सुखी आणि समाधानी जीवनाचा अनुभव घेत असतो. गोवा स्वतंत्र झाला, गोव्यात भारत सरकारचे राज्य आले म्हणजे नेमके काय झाले हे जरी त्याला कळत नसले तरी स्वातंत्र्यानंतर आपल्या आजूबाजूला होणारे बदल मात्र त्याला जाणवत होते. गावात शाळा सुरू होताच जन्याने आपल्या मुलांना शाळेत पाठवावे असा प्रस्ताव येताच, ‘धनगराचा पोर शिकला म्हणून तो भट-बामण थोडाच होणार?’ असा प्रश्न पडलेला जन्या इतरांप्रमाणे मुलांना शाळेत पाठवतो... परिणामी त्याच्या पारंपरिक व्यवसायात मुले लक्ष देईनात. रुढी परंपरांना नाकारून सिनेमाच्या वलयात गुरफटतात, पाळण्यात केलेले लग्न नाकारतात, शेणात हात बुडलेली वाग्दत्त वधू त्यांना अडाणी-अशिक्षित वाटते... अशा प्रकारे बेफिकीर वृत्ती बळावलेली मुले आणि असहाय जन्या यांच्यातील दरी वाढत जाते. अशा काहीशा कथानकावर बेतलेली ही कथा आहे. एकुणच आज विकासाच्या नावावर आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा लेखाजोखाच जणू या कथेत घेतला आहे. शिक्षण, माहिती तंत्रज्ञान या गोष्टी माणसाच्या दरवाज्यात पोहोचल्या आहेत. साहजिकच आधुनिक जगाचे आकर्षण वाटणारी नवी पिढी जमिनीकडे पाठ फिरवते आहे या कठोर वास्तवाचा छेद या कथेत  घेतला आहे.

एकूण १७ कथांचा समावेश असलेला असा हा कथासंग्रह आहे. यातील काही कथांमधील प्रश्न, पात्रे, वातावरण आणि पार्श्वभूमी हे सारे गोमंतकीयच  आहे. या कथा जरी तथाकथित प्रादेशिकतेच्या प्रभावातून निर्माण झाल्या नसल्या तरी यातील संदर्भ मात्र पूर्णतः स्थानिक आहेत.