अखेर रवी नाईक भाजपात

‘भंडारी मिशन’ला गती ; फडणवीस, मुख्यमंत्र्यांची मगो, काँग्रेसवर टीका

|
08th December 2021, 12:32 Hrs
अखेर रवी नाईक भाजपात

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : काँग्रेसचे फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी मंगळवारी सकाळी आमदारकीचा राजीनामा देऊन सायंकाळी भाजपात प्रवेश केला. जयेश साळगावकर यांच्यानंतर रवी नाईक यांना प्रवेश देऊन भाजपने ‘भंडारी समाज मिशन’ला गती दिली आहे. भंडारी समाजाचे आणखी काही दिग्गज नेतेही  भाजपच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.       

फोंड्यात आयोजित कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी रवी नाईक यांना भाजपात प्रवेश दिला. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मंत्री गोविंद गावडे, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह भाजपचे अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

रवी नाईक यांच्या प्रवेशामुळे भाजप आणखी बळकट झाला आहे. काँग्रेसची अवस्था केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात खिळखिळी झालेली आहे. त्यामुळे पक्षाला भवितव्यच राहिलेले नाही. दुसऱ्या बाजूला केंंद्रातील मोदी सरकार देशाचा चौफेर विकास साधत आहे. देशाचे उज्ज्वल भवितव्य केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच घडवू शकतात यावर सर्वांचाच विश्वास बसला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांसाठी काम करणारे नेते भाजपात प्रवेश करीत आहेत. रवी नाईक हे त्यापैकीच एक नेते आहेत, असे फडणवीस म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात उगवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पैशांच्या बॅगा घेऊन गोव्यात आलेला आहे. या पक्षाचे राजकारणाचे दुकान मांडलेले आहे. अशा पक्षाने गोव्यातील सर्वात जुन्या मगो पक्षाची शिकार केली आहे. गोमंतकीय जनता भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष म्हणून मगोच्या सिंहाला मते देत होती. पण, गोव्यातील जनता येत्या निवडणुकीत मगो आणि तृणमूलची युती कदापि मान्य करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.       

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, रवी नाईक भाजपात येताच सिंहाला गवत खायला लावलेले घाबरले आहेत. आज राज्यातील सर्वच पक्ष एकमेकांशी युती करीत आहेत. त्यांचे ध्येय केवळ भाजपचा पराभव करणे आणि आपल्याला मुख्यमंत्री होऊ न देणे हेच आहे. आपण सुरू केलेली स्वयंपूर्ण गोवा योजना, गोव्याचा सर्वांगीण विकास झालेला नको आहे. त्यामुळेच हे पक्ष युती करून भाजपचा पराभव करण्याची स्वप्ने पाहत आहेत. पण त्यांना कदापि यश मिळणार नाही. उलट भाजप येत्या विधानसभा निवडणुकीत २७ पेक्षा अधिक जागा मिळवेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने नेहमीच गोव्याचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला. कोविड काळात दोन्ही सरकारांनी गोरगरीबांना आधार दिला. त्यांची भूक भागवली. त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे रवी नाईक यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांत कोविड नसता तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकासाला मोठी गती दिली असती, असेही त्यांनी नमूद केले.