पैंगीणच्या लोकोत्सवाला लाभणार तुळशी गौडांची उपस्थिती

उद्घाटन सत्र १० डिसेंबर रोजी; तीन राज्यांचे राज्यपालही येणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th December 2021, 11:35 pm
पैंगीणच्या लोकोत्सवाला लाभणार तुळशी गौडांची उपस्थिती

लोकोत्सवाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना माजी मंत्री रमेश तवडकर, अशोक गावकर, श्रीकांत तवडकर व दामोदर वेळीप. (संजय कोमरपंत)

काणकोण : ‘आदर्श ग्राम’ उपाधी लाभलेल्या आमोणे-पैंगीण येथे शुक्रवार, १० डिसेंबरपासून लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात तीन राज्यांचे राज्यपाल आणि उद्घाटन सत्रात खास निमंत्रित म्हणून पर्यावरण रक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या तुळशी गौडा उपस्थित राहणार आहेत. ही माहिती माजी मंत्री तथा आदर्श युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिली.

येथे सोमवारी तवडकर यांच्या हस्ते लोकोत्सवाच्या माहितीपत्राचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी अशोक गावकर, श्रीकांत तवडकर व दामोदर वेळीप उपस्थित होते.

रुपरेषा : पहिल्या दिवसाची

शुक्रवार, १० रोजी दुपारी १२ वाजता गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते आश्रम शाळा व लोकोत्सवाचे उद्घाटन करतील, असेही तवडकर यांनी सांगितले. उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रेबेलो, आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर उपस्थित राहणार आहेत.

रूपरेषा : दुसऱ्या दिवसाची

शनिवार, ११ डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उकेई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत वीजमंत्री नीलेश काब्राल, भाजपच्या आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार समीर ओरावन, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, ट्रीफडचे अध्यक्ष रामसिंह रठवा आणि दक्षिण गोव्याचे माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत.

रूपरेषा : तिसऱ्या दिवसाची

रविवार, १२ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक सन्माननीय अतिथी म्हणून असतील. शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई खास अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसांच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या ९० मान्यवरांचा सत्कार होईल. शिवाय विविध प्रकारची ३५० प्रदर्शन विक्री कक्ष उभारले जाणार आहेत. लोकोत्सवामध्ये १०० संघ विविध कला सादर करणार आहेत, असेही तवडकर यांनी सांगितले.