सांकवाळमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; वाहतुकीत बदल... ‘हे’ रस्ते उद्या राहणार बंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 12:45 pm
सांकवाळमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; वाहतुकीत बदल... ‘हे’ रस्ते उद्या राहणार बंद

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांकवाळ येथे उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यानुसार उद्या दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि बिर्ला टायटन जंक्शन ते दाबोळी विमानतळ जंक्शन हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या रस्त्यांवर केवळ सभेसाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत आदेश काढला आहे.

वास्कोकडे जाणारी वाहतूक बिर्ला क्रॉस जंक्शन येथून शरयू टोयोटा हमरस्ता-कुठ्ठाळी जंक्शन-चिखली जंक्शन मार्गे वळवण्यात येईल. तर वेर्णा औद्योगिक वसाहत, पणजी, मडगाव येथे जाणारी वाहतूक दाबोळी विमानतळ जंक्शन येथून वळवून चिखली जंक्शन-कुठ्ठाळी जंक्शन मार्गे पुढे सोडण्यात येईल. या काळात वरुणापुरी जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि एमईएस जंक्शन ते क्विन जंक्शन या रस्त्यांवर वाहने थांबण्यास अथवा पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय २७ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६६ (जुना राष्ट्रीय महामार्ग १७ ब) वर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावर केवळ अत्यावश्यक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उद्या (ता. २७) संध्याकाळी ५ वाजता बिर्ला मंदिरासमोरील जागेत होणार आहे. या सभेला ५० हजारांहून अधिक उपस्थिती राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

हेही वाचा