संकटात पती स्त्रीधन वापरू शकतो, पण नंतर परत द्यावे लागेल... सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 01:06 pm
संकटात पती स्त्रीधन वापरू शकतो, पण नंतर परत द्यावे लागेल... सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : सासरहून मिळालेल्या स्त्रीधनावर पती किंवा सासरच्यांचा अधिकार नाही. संकटकाळात हे स्त्रीधन वापरल्यास नंतर ते पत्नीला परत करण्याची नैतिक जबाबदारी पतीची आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या वेळी दिला आहे. तसेच खटला दाखल करणाऱ्या महिलेला २५ लाखांचे सोने परत करण्याचा आदेश तिच्या पतीला दिला आहे.

महिलेच्या माहेरून तिच्या लग्नाच्या वेळी ८९ सोन्याची नाणी भेट दिली होती. लग्नानंतर तिच्या वडिलांनी पतीला २ लाखांचा धनादेशही दिला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने तिचे सर्व दागिने घेऊन ते सुरक्षित ठेवण्यासाठी सासूकडे दिले. नंतर कर्ज फेडण्यासाठी पती आणि सासूने ते सर्व दागिने वापरले. हा गैरवापर असल्याचा आरोप करत संबंधित महिलेने प्रथम केरळमधील कौटुंबिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. शेवटी तिच्या लढ्याला यश आले.

कौटुंबिक न्यायालयाने २०११ मध्ये प्रथम तिच्या याचिकेवर निवाडा दिला होता. तेव्हा पती आणि त्याच्या आईने अपीलकर्त्या महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांचा प्रत्यक्षात गैरवापर केल्याने तिला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश अंशतः नाकारला. कारण ती महिला तिच्या पती आणि त्याच्या आईने सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर सिद्ध करू शकत नाही. त्यानंतर महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने त्यावर अंतिम निवाडा दिला. ‘स्त्रीधन’ ही पत्नी आणि पतीची संयुक्त मालमत्ता नाही. मालक म्हणून तिच्या संपत्तीवर पतीचा कोणताही अधिकार किंवा स्वतंत्र प्रभुत्व नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.