पिलार येथे कारमध्ये सापडली ४.५० लाखांची रोख रक्कम

आगशी पोलिसांकडून एकास अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 12:43 am
पिलार येथे कारमध्ये सापडली ४.५० लाखांची रोख रक्कम

पणजी : पिलार जंक्शनवर नाकाबंदीवेळी निवडणूक पथकाला कारमध्ये ४.५० लाखांची रोख रक्कम सापडली. या प्रकरणी आगशी पोलिसांनी मंजुनाथ हलवागल (आगशी) याला अटक केली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सांतआंद्रे मतदारसंघातील स्टॅटीक सर्व्हेलन्स अधिकारी साईश परब यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, रविवार ५ रोजी दुपारी १२ वाजता पिलार जंक्शनवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी तपासणी करत असताना एका वॅगनआर कारमध्ये पथकाला ४.५० लाख रुपये सापडले. या संदर्भात चालकाची चौकशी केली असता, संबंधित पैशाची माहिती दिली नाही. त्यामुळे पथकाने चालक मंजुनाथ हलवागल याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आगशी पोलिसांच्या स्वाधीन केले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अनंत गावकर याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी संशयित मंजुनाथ हलवागल याच्या विरोधात भादंसंच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताने पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले असता, न्यायालयाने त्याची सशर्त जामिनावर सुटका केली.             

हेही वाचा