आज मतदार घेणार ‘मतपरीक्षा’

निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण; दोन्ही मतदारसंघांत आहेत ११,७९,६४४ मतदार


07th May, 12:38 am
आज मतदार घेणार ‘मतपरीक्षा’

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथून इव्हीएमसह मतदानासाठीचे साहित्य घेऊन जाताना कर्मचारी.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील​ गोव्यासाठीचे मतदान मंगळवारी सकाळी ७ सायंकाळी ६ या दरम्यान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असून, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठीचे प्रयत्न आयोगासह निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांकडूनही सुरू आहेत.
उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेसचे अॅड. रमाकांत खलप, रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) मनोज परब, अखिल भारतीय परिवार पार्टीचे सखाराम नाईक, बसपच्या मीलन वायंगणकर, तसेच थॉमस फर्नांडिस, विशाल नाईक आणि शकील शेख हे आठ, तर दक्षिण गोव्यातून भाजपच्या पल्लवी धेंपो, काँग्रेसचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आरजीपीचे रुबर्ट परेरा, बसपच्या डॉ. श्वेता गावकर आणि दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, अॅलेक्सी फर्नांडिस व डॉ. कालिदास वायंगणकर हे आठ, असे एकूण सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी ईव्हीएममध्ये बंदिस्त होणार असून, त्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी आ​णि इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करून मतदानासाठी आवश्यक साहित्य मतदान केंद्रांवर नेऊन तेथील व्यवस्था पूर्ण केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ७५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्याचा ​विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी आयोगाने गेल्या काही दिवसांत जागृतीही घडवून आणली होती. त्यात आयोगाला कितपत यश मिळाले, हे मंगळवारी सायंकाळी ६ नंतरच स्पष्ट होणार आहे.
मतदार
उत्तर गोवा : ५,८०,७१०
दक्षिण गोवा : ५,९८,९३४
एकूण : ११,७९,६४४
मतदान केंद्रे
उत्तर गोवा : ८६३
दक्षिण गोवा : ८६२
एकूण १,७२५
पिंक मतदान केंद्रे : ४०
ग्रीन मतदान केंद्रे : ४०
मॉडेल मतदान केंद्रे : ११०
विशेष मतदान केंद्रे : २२९
मतदान केंद्रांवर अशा असणार सुविधा
वैद्यकीय सुविधा
लिंबूपाणी, शीतपेये, थंड पाणी
दिव्यांगांसाठी व्हीलचेअर
सुरक्षाव्यवस्था अशी
पोलीस स्थानक, वाहतूक, सुरक्षा व इतर विभागांतील मिळून सुमारे ६,००० पोलीस तैनात.
केंद्रीय सशस्त्र दलातील बारा कंपन्यांचे १,२०० जवान.
५९ चिंताजनक, ६ असुरक्षित आणि १७ आर्थिकदृष्ट्या संवेदनशील अशा ८२ मतदान केंद्रांवर ४० साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ४३९ हवालदार, १,७२५ कॉन्स्टेबल आणि ७३० गृहरक्षकांचा असेल पहारा.
४० विधानसभा मतदारसंघांत २० पोलीस उपअधीक्षक आणि २० निरीक्षकांनी क्षेत्रीय अधिकारी, तर २०० उपनिरीक्षक, २० साहाय्यक उपनिरीक्षक, १०० काॅन्स्टेबल आणि १०० गृहरक्षकांची सेक्टर अधिकारी म्हणून नियुक्ती.
गोवा पोलिसांचे वाहतूक पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बाॅम्ब निकामी पथक, जलद कृती दलाचे पोलीस तसेच विशेष विभागाचे १,५०० कर्मचारी असणार कार्यरत.            

हेही वाचा