देशभरात एकूण ९३ मतदारसंघांत आज मतदान

७ केंद्रीय मंत्री, ४ माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य होणार इव्हीएमबंद


07th May, 12:34 am
देशभरात एकूण ९३ मतदारसंघांत आज मतदान

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवार, ७ मे रोजी १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये या टप्प्यात गुजरातमधील २५, कर्नाटकातील १४, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेशातील १०, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाममधील ४, पश्चिम बंगालमधील ४ आणि दादरा नगरहवेली आणि दमण दीवमधील २ जागांचा समावेश आहे.
या टप्प्यात आधी १० राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९५ जागा होत्या, मात्र २१ एप्रिल रोजी सुरतमधून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर आणि ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग-राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता येथे सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसप उमेदवाराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या टप्प्यात (२६ एप्रिल) होणारे मतदान ७ मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यात अमित शहा, मनसुख मांडवीय, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, प्रल्हाद जोशी यांच्यासह ७ केंद्रीय मंत्री आणि शिवराज सिंह चौहान, दिग्विजय सिंह, बसवराज बोम्मई आणि जगदिश शेट्टर या माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बारामतीतून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. या टप्प्यात १,२२९ पुरुष आणि १२३ महिला, असे एकूण १,३५२ उमेदवार रिंगणात आहेत.      

हेही वाचा