१२,४१६ पैकी १,०१७ मतदारांनी केले नाही पोस्टल बॅलट मतदान

दोन्ही मतदारसंघांतील ११,११५ मतदारांकडून सुविधेचा लाभ


07th May, 12:36 am
१२,४१६ पैकी १,०१७ मतदारांनी केले नाही पोस्टल बॅलट मतदान

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोस्टल बॅलटची (टपाल मतदान) सुविधा दिलेल्या १२,४१६ पैकी ११,११५ मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी पोस्टल बॅलट मतदान केलेले आहे; परंतु १,०१७ मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतलेला नाही. त्यात उत्तर गोव्यातील ५६२ आणि दक्षिण गोव्यातील ४५५ मतदारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व्हिस मतदार, ८५ वर्षांवरील, को​विड झालेले, अत्यावश्यक सेवांमध्ये, पोलीस, गृह खात्यांत कार्यरत तसेच इतर मिळून १२,४१६ मतदारांनी​ पोस्टल बॅलटसाठी नोंदणी केलेली होती. पण, त्यांतील ११,११५ जणांनी या मतदानाचा लाभ घेतला असून, १,०१७ जणांनी मात्र मतदान केलेले नाही. त्यामुळे राज्यातील पोस्टल बॅलट मतदान ७७.७५ टक्के झाले आहे.
उत्तर गोव्यातील ६,८१२ जणांनी पोस्टल बॅलटसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६,१२४ जणांनी मतदान केले, तर ५६२ जणांनी मतदान केले नाही. त्यामुळे तेथील टक्केवारी ७९.५० राहिली. दक्षिण गोव्यातील ५,६०४ जणांना ही​ सुविधा देण्यात आली होती. तेथील ४,९९१ जणांनी मतदान केले. उर्वरित ४५५ जणांनी मतदान केले नाही. त्यामुळे तेथील टक्केवारी ७४.६९ झाली आहे. 
लाभ न घेतलेल्यांना आज मतदान करता येणार नाही !
पोस्टल बॅलट मतदानाचा पर्याय स्वीकारूनही ज्या मतदारांनी मतदान केलेले नाही, त्यांना मंगळवारी मतदान केंद्रांवर मतदान करता येणार नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सुमारे १,०१७ मतदार यावेळी मतदानापासून वंचित राहणार आहेत.            

हेही वाचा