मतदारांत ‘महिलाशक्ती’ वरचढ

४० पैकी ३९ विधानसभा मतदारसंघांत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 12:37 am
मतदारांत ‘महिलाशक्ती’ वरचढ

पणजी : लोकसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ३६ हजार ९८ ने जास्त आहेत. राज्यात ४० विधानसभा मतदासंघांपैकी ३९ मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. केवळ वास्को मतदारसंघात पुरुष मतदार महिलांपेक्षा जास्त आहेत. दक्षिण गोव्यातील नूवे मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २३०२ ने जास्त आहे.            

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी दोन्ही मतदासंघांत मिळून ५ लाख ७१ हजार ६१७ पुरुष तर ६ लाख ७ हजार ७१५ महिला मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय पाहता नुवे नंतर सांतआंद्रे मतदासंघांत महिला मतदार पुरुषांपेक्षा १८९० ने अधिक, वेळ्ळीत १८०६ ने जास्त आहेत. फातोर्डा (१६६४ ने अधिक), बाणवली (१६४० ने अधिक) आणि ताळगाव (१५९९ ने अधिक) यांचा क्रमांक लागतो.        गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत देखील पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार जास्त होत्या. त्यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचे प्रमाणही जास्त होते. त्यामुळे यावेळी महिला मतदानाचे प्रमाण जास्त झाले, तर उमेदवाराला जिंकून आणण्यात महिला मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.             

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडवारीनुसार २०१४ मध्ये दोन्ही मतदासंघांत मिळून ८ लाख १७ हजार ४४० मतदान झाले होते. यातील ५१.३८ टक्के म्हणजेच ४ लाख २० हजार ३० मतदान महिलांचे होते.  तर पुरुषांचे मतदान ४८.६२ टक्के होते. २०१४ मध्ये मतदार यादी नाव असलेल्यांपैकी ७८.८८ महिलांनी मतदान केले होते. २०१४ मध्ये एकूण ७७.०६ टक्के मतदान झाले होते.             

२०१९ मध्येही पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला आघाडीवर होत्या. २०१९ मध्ये राज्यात एकूण ८ लाख ५३ हजार ७२४ मतदान झाले होते. यातील ५१.७५ टक्के म्हणजेच ४ लाख ४१ हजार ७८० मतदान महिलांचे होते. तर पुरुषांचे मतदान ४८.२५ टक्के होते. २०१९ मध्ये मतदार यादी नाव असलेल्यांपैकी ७६.१६ महिलांनी मतदान केले होते. २०१९ राज्यात लोकसभेसाठी मध्ये एकूण ७५.१४ टक्के मतदान झाले होते. 

   

हेही वाचा