पाळी येथून लंपास केलेली स्फोटके जप्त

डिचोली पोलिसांकडून ३ जणांना अटक, रिमांड

|
06th December 2021, 11:25 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : डिचोली तालुक्यातील पाळी येथे खाण भागातील एका गोदामातून चोरीस गेलेली सुमारे शंभर किलो स्फोटकांचा शोध लावून ती जप्त करण्यात डिचोली पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून सध्या त्यांना रिमांडवर घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकामार्फत होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सदर चोरीचे प्रकरण गेल्या २९ नोव्हेंबर रोजी घडले होते. पाळी येथे खाण भागातील अत्यंत दुर्गम अशा भागात असलेल्या चौगुले कंपनीच्या गोदामात सदर जिलेटीन, डेटोनेटर व नॉन इलेक्ट्रीक ट्युब या स्फोटकांचा साठा करून ठेवला जातो. सदर गोदामाचा ताबा टेक एनर्जी प्रा. लि. या कंपनीकडे आहे. या गोदामातील सुमारे १०० किलो वजनाची स्फोटके लंपास करण्यात आली आहेत.
या प्रकरणाची डिचोली पोलीस स्थानकात तक्रार झाल्यानंतर डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी पथकाने लागलीच तपासकार्याला गती दिली. या चोरीत संशयितांनी जिलेटीन, डेटोनेटर व नॉन इलेक्ट्रीक ट्युब या सामानांची सहा पेट्या लंपास केल्या होत्या. डिचोली पोलिसांसमोर सर्वप्रथम या प्रकरणाशी संबंधित कोणताही दुवा नसताना तपासकामात वेग घेतला आणि या प्रकरणातील प्रितेश गावडे (रा. सत्तरी) याला सर्वप्रथम दि. ३ डिसेबर. रोजी ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आल्यानंतर दि. ४ रोजी कृष्णा गावकर (कुळे) व गौरीश शेवडेकर (सत्तरी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी या चोरीची कबुली दिली.
स्फोटकांची सहा पेट्या चोरी केल्यानंतर तीन बॉक्स त्याच भागात विविध ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. तर एक पेटी कुळेतील संशयित कृष्णा गावकर याच्या घरी सापडली, एक पेटी वाहत्या ओहोळात फेकून देण्यात आली होती. तर एक पेटी म्हादई नदीत पाडेली पुलावरून फेकण्यात आली होती. तपासादरम्यान संशयितांनी सदर पेट्यांची माहिती डिचोली पोलिसांना दिल्यानंतर ती सर्व स्फोटके जप्त करण्यात आली. या प्रकरणी सदर गोदाम चालवत असलेल्या अास्थापनावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डिचोली पोलीस या प्रकरणात गुप्तपणे तपास करीत असून यापूर्वी अशा प्रकारच्या चोऱ्या होऊन या स्फोटकांचा वापर कोणताही वाईट हेतू साध्य करण्यासाठी केला गेला आहे का? यावर तपास सुरू आहे.