भाज्यांच्या किमती वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना फटका

स्थिती सामान्य होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार


06th December 2021, 11:14 pm
भाज्यांच्या किमती वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना फटका

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : टोमॅटो, वालपापडी, गाजर या भाज्यांंचे दर गगनाला भिडल्याने हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला आहे. टोमॅटो, तसेच कुरमा भाजी देणे परवडेनासे झाले आहे. भाज्या महाग झाल्याने हॉटेलवाल्यांंना फटका बसू लागला आहे. पुढील काही दिवसांत पाव भाजी महाग होण्याची शक्यता आहे.
गॅस सिलिंडर आणि पावाचे दर यापूर्वीच वाढले आहेत. आता भाज्याही महाग झाल्या आहेत. टोमॅटो भाजी सध्या ४० रुपये प्लेट दर आहे. हा दर परवडत नाही, असे ‘कॅफे आराम’चे मालक संंदीप केसरकर यांनी सांगितले. कोथिंबीर, गाजर महाग झाल्याने सामोसा, बटाटेवडे करण्यालाही अधिक खर्च येताे, असे त्यांनी सांगितले. बेळगाव आणि अन्य भागांत झालेल्या पावसामुळे गोव्यात भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बटाटे आणि कांदे सोडले तर अन्य भाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटो १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. मिरची १२० रुपये किलो झाली आहे. पापडी १२०, गाजर ८०, वांगी ८०, कोबी ४०, भेंडी ८० रुपये किलो झाली आहे. फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवरही भाज्यांचे दर चढेच आहेत.
मागील आठवड्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. बेळगाव आणि परिसरात टोमॅटो, कोबी कुजून वाया गेला. त्यामुळे भाज्यांची आवक कमी आहे. आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. कोथिंबिरीची पेंडी ४० ते ५० रुपये आहे. बटाटे आणि कांदे तुलनेत काहीसे स्वस्त आहेत. गोव्यात बहुतांश भाजी ही बेळगाव भागातून येते. बेळगावात भाजी महाग झाल्याने गोव्यात दर वाढले आहेत, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. आता पाऊस थांबला असला तरी स्थिती सामान्य होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल, असेही भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा