विस्मृती जागवणारे रेखाचित्रकार : अभिर प्रभुदेसाई

Story: आवतीभोवती | कविता आमोणकर |
04th December 2021, 11:57 pm
विस्मृती जागवणारे रेखाचित्रकार : अभिर प्रभुदेसाई

व्यंगचित्र हा चित्रकलेचा एक प्रकार असून या व्यंगचित्रांतून चित्रकार आपले विचार मांडायचा किंवा भाष्य प्रकट करायचा प्रयत्न करत असतो. चित्रकला हा प्रकार सोपा असला तरी व्यंगचित्रे काढणे हा प्रकार तितकासा सोपा नाही. फार थोडे कलाकार अशी व्यंगचित्रे काढण्यात वाकबगार असतात . 

मडगाव शहरातील अभिर प्रभुदेसाई हे पेशाने प्रख्यात वकील असले तरी ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकलाकारही आहेत. त्यांची व्यंगचित्रे सध्या सोशल मिडियावर फारच लोकप्रिय होत आहेत. 'गोवन फूडमेनिया' या सोशल मिडियाच्या फेसबुक ग्रुपवर त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती दाखवतानाच विस्मृतीत गेलेले अनेक क्षण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन, ती समर्थपणे रेखाटून गोव्याची संस्कृती जतन करतानाच त्यांना उजाळा दिला आहे. ही व्यंगचित्रे पाहताना  आपणही नकळत आपल्या भूतकाळात फेरफटका मारून कधी येतो, ते आपल्यालाच कळत नाही. अभिर प्रभुदेसाई यांनी गोव्याची संस्कृती जपतानाच गोव्यातील पारंपरिक असे विविध खाद्यपदार्थ, पाककला, उद्योगधंदे यांचीही ओळख आपल्या व्यंगचित्रांद्वारे दिली आहे. यासाठी त्यांना सोशल मिडिया वरील गोवन फुडमेनिया ग्रुपने नोव्हेंबर महिन्यासाठी " फूड मेनियाक ऑफ द मंथ ' म्हणून निवड केली आहे. 

गोवा हे निसर्गसमृद्धी लाभलेले राज्य असून गोव्यात चालू असलेले अनेक पारंपरिक व्यवसाय आता काळानुसार लुप्त होत आहेत. मासे हे गोवेकारांचे मुख्य अन्न. मासे भरपूर प्रमाणात मिळाले की हे मासे मीठ लावून कडक उन्हामध्ये वाळवून ते साठवून ठेवत. असे मीठ लावून कडक उन्हात ठेवलेले मासे पूर्वी रस्त्याच्या कडेला, शेतात किंवा रस्त्याच्या आडोशालाही सुकत घातलेले दिसायचे. तसेच मीठ व्यवसाय हा त्यापैकी एक. पूर्वी उन्हाळाच्या दिवसात मीठ भरलेले टेम्पो मोठयाने हॉर्न वाजवत “मीठ मीठ'‘ असे मोठ्या आवाजात आरोळी देत  प्रत्येक  वाड्यावाड्यातून फिरताना दिसत असत. अभिर प्रभुदेसाई यांनी अशी गोव्याच्या पारंपरिक व्यवसायाची व्यंगचित्रे काढताना त्यातील पात्रांच्या तोंडी संवाद घालून त्या व्यंगचित्रांची शोभा आणखीनच वाढवली आहे. 

रोस आमलेट गाडयावरची गर्दी, पायलटस्वार म्हणजे भाड्याची दुचाकी मोटारसायकल सवारी, गोव्यातील अनेक मंदिरातील जत्रेदरम्यान खाजे, लाडू आदी मिठाई घेऊन विक्रीस बसणारे खाजेकार, पावसाळ्याच्या आधी भरणारे पुरुमेताचे फेस्त, या फेस्तात खेळणी विकणारे आणि ती खेळणी घेण्यास हट्ट करणारी लहान मुले व त्यांच्या तोंडी असणारे त्यांचे हमखास संवाद हे अभिर प्रभुदेसाई यांनी बारकाईने टिपून आपल्या व्यंगचित्रात चित्रित केले आहेत. 

'धुवरी' हा असाच एक पारंपरिक प्रकार, जो बहुतेक खेड्यात संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेत केला जात असे. संध्याकाळाच्या वेळेत डास व इतर किडे  घरी येऊ नयेत म्हणून नारळाच्या काथ्या, सुकलेली पाने जाळून त्यांचा धूर करून तो संपूर्णपणे घरात दाखवला जाई. त्याचे सुंदर चित्रण आणि व्यंगचित्राद्वारे अभिर यांनी 'धुवरी‘ या व्यंगचित्रात केले आहे. घरातील कोयती, विळी यांना धार काढणारी माणसे, आठ आण्याची पेप्सी विकणारे पेप्सिवाले, चिरमुल्याची मोठी पिशवी घेऊन चिरमुले विकणारे विक्रेते यांचे हुबेहूब चित्रण व त्यांचा होणारा संवाद हा अभिर प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्रात आपल्याला अनुभवायला मिळतो. 

आईस फ्रूटवाला आला की त्याच्याकडे गर्दी करणारी मुले, जत्रेदरम्यान  खेळणी घ्या म्हणून आपल्या पालकांकडे हट्ट करणारी मुले व खिशात पैसे मोजकेच असल्याने ही खेळणी नंतर घेऊया म्हणून त्यांना समजावणारे पालक, सकाळच्या वेळेस कोणी खास मित्र भेटल्यास “चल ,चल मारूया ‘ म्हणजे चल, हॉटेलात जावून मस्तपैकी सुंगटा घातलेली पातळ /सुकी भाजी, पाव, मिरची भजी आणि फक्कडपैकी चहा घेऊया असे दिलदार मित्र,  धुवांधार पाऊस पडत असताना गाड्यावर गरमागरम कांदा भजी आणि मसालेदार चहा प्यायची मजा हे सर्व काही आता विस्मृतीच्या पडद्याआड चालत असलेल्या गोष्टी असून या सर्व गोष्टींचा आस्वाद आपल्याला अभिर प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्रांतून अनुभवाला मिळतो. 

रोस ओमलेटच्या गाड्यावरील गर्दी, रविवारी  प्रत्येक घराघरातून होणारी (व्हडल्या नुसत्याची म्हणजेच विसवण, तामसो, मोठी कोळंबी (वागयो) यांची मागणी, घरापासून चार दिवस दूर राहिल्यावर घरी आल्यावर होणारी सोलां कडी आणि खारे मासे यांची मागणी, पावाच्या भट्टीतील पाव काढणारे पोदेर आणि त्या गरमागरम पावांबरोबर त्या पावांचा घमघमाट, पारंपरिक दूधवाला आणि घरची स्त्री यांचा व्यंगचित्राद्वारे होणारा रोजचा संवाद ही जी सर्व काही मजा आहे, ती अभिर प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्रातून आपण घेतो, तेव्हा आपले मन हे भूतकाळाच्या चकरा मारताना वेगळाच आनंद अनुभवते. 

अभिर प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. विविध प्रकारच्या मोटर कार रेखाटणे हा त्यांचा आवडता छंद होता. मग त्यांच्या काकीने त्यांना मानवी चेहऱ्यांचे रेखाटन कसे करावे हे पुस्तक दिले. 2 साली त्यांनी संभाषणासह व्यंगचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. विविध विषयांवरील व्यंगचित्रे रेखाटताना अभिर यांना नवनवीन विषय सूचत गेले. एक नामांकित वकील म्हणून आपला व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी हा आपला छंद ही  जोपासला. हा छंद त्यांनी व्यावसायिक करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आपल्या जीवनाशी निगडित ज्या गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत, अशा आठवणींना उजाळा देऊन आनंद प्राप्त करणे या एकमेव उद्देशाने ते आपली ही व्यंगचित्रे रेखाटण्याची कला जोपासत आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराला खूप शुभेच्छा !