गायनातून आनंद घेणारी ‘ मेघा’

मेघा सहा वर्षांची असल्यापासून आई तिला बालगीते शिकवायची. अशी सुरुवात करुन तिने हळूहळू शाळेतील गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला. सुरुवातीला काही यश मिळाले नाही, पण गायन केले हे समाधान मात्र होते. पण यातून तिने स्वतःच ठरविले की आपल्याला जर या क्षेत्रात नाव मिळवायचे असेल तर आपण त्यासंबंधित शिक्षण घेतले पाहिजे तसेच गायनाचा रियाजही केला पाहिजे.

Story: मार्ग नवा, ध्यास नवा | सुश्मिता मोपकर |
04th December 2021, 11:56 Hrs
गायनातून आनंद घेणारी ‘ मेघा’

गायन, अभिनय आणि नृत्याची आवड जोपासून कलेच्या क्षेत्रात वाटचाल करणारी उसकई येथील मेघा पदकी हिने म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यालयात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेत कला शाखेत अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाळेत असताना अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्यातील कलागुण तिने दाखविले. वेशभूषा, नृत्य, रंगोळी काढणे, चित्रकला तसेच देशभक्तीपर गीत गायन स्पर्धांमध्ये ती भाग घ्यायची. खो-खो, बुद्धीबळ सारख्या खेळांतही ती सहभागी होत असे. एन.सी.सी.मध्ये तिने कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळली. उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात असताना गायन, पथनाट्य, नाटकात तसेच 'चॉकलेट' व 'अनन्या' या लघुपटांत अभिनय केला आहे. शालेय ते महाविद्यालयीन जीवनात ती आपल्यातील कलेला एक व्यासपीठ देत आली आहे, जे तिला अजूनही पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे. 

तिला शास्त्रीय संगीत क्षेत्रात करियर करायचे आहे. याची सुरुवात तिने अगदी लहान वयातच केलेली दिसते. मुळात तिच्यातील ही कला जागविणारे तिचे आई-वडील आहेत ज्यांनी अगदी लहान वयात तिला संगीताची ओळख करून दिली. आपली पहिली गुरु ही आपली आई आहे हेच ती मानते. मेघा सहा वर्षांची असल्यापासून आई तिला बालगीते शिकवायची. अशी सुरुवात करुन तिने हळूहळू शाळेतील गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला. सुरुवातीला काही यश मिळाले नाही, पण गायन केले हे समाधान मात्र होते. पण यातून तिने स्वतःच ठरविले की आपल्याला जर या क्षेत्रात नाव मिळवायचे असेल तर आपण त्यासंबंधित शिक्षण घेतले पाहिजे तसेच गायनाचा रियाजही केला पाहिजे. सुरुवातीला बक्षीस मिळाले नाही म्हणून ती कधी निराश झाली नाही. उलट अधिक प्रयत्न करुन तिने शालेय व महाविद्यालयीन जीवनात खूप यश मिळविले. आंतर शालेय असो वा पुढे आंतर-महाविद्यालय असो, ती स्पर्धेत उतरायची आणि यशही मिळवायची. 

शास्त्रीय संगीत शिकण्याची सुरुवात २००९मध्ये केली. सुरुवातीला स्वर श्रृंगार, म्हापसा येथे गुरु श्री. सिंगबाळ यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. तद्नंतर २०१४ पासून आतापर्यंत गुरु श्री. नरेश पार्सेकर आणि गुरु श्री. शरद पाळणी  यांच्याकडून अभंग गायन व नाट्यगीताचे शिक्षण घेतले.सध्या ती गुरु श्री. सचीन तेली व गुरु सम्राज्ञी आईर यांच्याकडून कला अकादमीत संगीताचे पुढचे शिक्षण घेत आहे. 'कुशल'च्या अभ्यासक्रमाच्या - प्रथम वर्षाचे धडे ती घेत आहे.

संगीतात तिने अनेक संधी मिळविल्यात. 'सा रे ग म प' सारख्या मोठ्या व्यासपीठावर तिने आपले गाणे सादर केले आहे. यात सुरुवातीच्या दोन फेऱ्या तिने पार केल्या होत्या. अभंग गायन स्पर्धा होतात, त्या गायनाचे संघ असतात तर अशा संघातून गात असताना तिला उत्कृष्ट अभंग गायिका म्हणून पारितोषिक मिळाले आहे. त्याचबरोबर अखिल गोवा अभंग/ गौळण गायन स्पर्धेतही तिला यश मिळाले आहे. हल्लीच पार पडलेल्या सीएम ट्रॉफीच्या कार्यक्रमात गायनात तिला गायनासाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. या सगळ्या प्रवासात तिच्या वडिलांनीही खूप साथ दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी गायन स्पर्धांसाठी ते घेऊन जायचे.

आता ती कला अकादमीत संगीताचे पुढचे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर कॅरियोके गायनचे कार्यक्रमही ती करते. यातूनही तिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला आवाज पोहचविण्याची संधी मिळते. तसेच जसा तिचा गळा स्वरांनी रुळलेला आहे तसाच तिचा हातही स्वादिष्ट केक बनविण्यात माहीर आहे. ती केक‌ तयार करते. कॅरियोके गायन आणि केक तयार करणे हा तिचा आता छंदच होऊन बसला आहे. अनेक कार्यक्रमांत, लग्नसमारंभात तिचे गायन झाले आहे. तसेच कित्येक केक करुन तिने विकले आहेत. तिच्या कंठाला जसा सूर गवसतो तसाच तिच्या हातालाही खरोखर चव आहे. फुगडी संघातही ती सहभागी होऊन गोमंतकीय संस्कृती जतन करण्यासाठी खारीचा वाटा उचलते.

या संपूर्ण प्रवासात आई, बाबा व ताईंनी नेहमी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर तिच्या मित्र-मैत्रिणींनीही तिला खूप प्रोत्साहन दिले. पाहिजे तेव्हा आपल्याला हवी ती सगळ्या तऱ्हेची मदत केली असल्याचे ती सांगते. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ती कॅरियोके गायन‌‌‌ करायची व सोबत शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घ्यायची. तिने एफ. एम. रेडिओवर गाणे गायिले आहे. स्टुडिओत जाऊन  दिवली नृत्याचे गीत रेकोर्ड केले आहे.

अशाप्रकारे गायनात वेगवेगळ्या संधी शोधून आपला गुणांना वाव देणे हे तिच्याकडून शिकावे. अतिशय मन लावून आणि संगीतात गुंग होऊन ती आनंद अनुभवत आहे.  आपल्या सोबत्यांना सल्ला देताना ती म्हणते, " आपण आपले स्वप्न जगले पाहिजे. एकदा खाली पडलो तर ते पाऊल तिथेच न ठेवता परत वर चढण्याची संधी मिळविली पाहिजे तरच आपले ध्येय साध्य होईल."