आनंद सोहळा : लग्नाची पंगत

सार्‍याचा आस्वाद घेत अतिथि तृप्त होत "अन्नदाता सुखी भव:" म्हणून आशीर्वाद देतो. मुखशुद्धीसाठी तांबूल किंवा विडा तयार असतो. आवडीने त्याचाही मग मस्त समाचार घेतला जातो.

Story: आठवणींचं गाठोडं | राजश्री खांडेपारकर |
04th December 2021, 11:48 pm
आनंद सोहळा : लग्नाची पंगत

शुभमंगल सावधान" मंगलाष्टकं होतात. नवपरिणित जोडप्यावर शुभेच्छा, आशीर्वचनांचा वर्षाव सुरू होतो. सुहास्यवदना, सालंकृत नर नारींनी ल्यालेल्या नव्या कपड्यांची सळसळ, दागिन्यांची आभा, मिश्र अत्तराचा आणि हार गज-यांचा सुगंध...बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या सग्यासोय-यांचे प्रफुल्लित चेहरे...त्यांची थट्टामस्करी अन् हास्याचे कारंजे,  रंगलेले गप्पांचे फड...बालगोपालांची मस्ती आणि ह्या सार्‍याला पार्श्वसंगीतासारखे लाभलेले सनईचे सूर...आनंदाला नुसतं भरतं आलेलं असतं. सान थोर सगळे कसे आपापले आनंद शोधण्यात पुरते दंग असतात... आनंदाचे आनंद तरंग ..आनंदी आनंद!!! 

तितक्यात जेवणाच्या तयारीला प्रारंभ झालेला जाणवतो. स्वादिष्ट पदार्थांच्या सुगंधाने, जठराग्नी प्रज्वलित व्हायला लागतो आणि सुग्रास भोजनाची जणू नांदी होते. आपल्यातुपल्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेण्याची गम्मत काही न्यारीच असते. पंगतीची तयारी अगदी जय्यत झालेली असते. ओळीत मांडलेल्या, बहुदा रंगीत, पाटांसमोर नीटस ठेवलेली लख्ख ताटं, केळीची पानं किंवा पत्रावळी, त्या भोवती सुबक रांगोळीची नक्षी, कधी त्यावर हळद कुंकवाची पखरण, तर कधी  रांगोळीच्या रंगांची. किती सुरेख दृश्य!!  तेव्हाच कुणीतरी बटाट्याचे अर्धे काप मध्ये मध्ये ठेवत त्यावर उदबत्ती खोचत जातो आणि मग ती वार्‍याच्या दिशेने पसरणारी सुवासिक धुराची वलयं स्वादिष्ट पदार्थांच्या सुवासात मिसळतात. मीठ, लिंबू , चटण्या, कोशिंबीरी असं करत, डाव्या उजव्या बाजूला नियमाने वाढत, उत्कृष्ट रंगसंगती साधत, पान किंवा पत्रावळ सजायला लागते. पाहुणे आसनस्थ झालेत नं, वाढपींनी पहिली वाढ नीट केलीय नं,  हे बघण्यासाठी यजमान जातीने स्वतः पंगतीपुढे हजर असतात. मग चित्राहुती घातल्या जातात. चित्राय स्वाहा..चित्र गुप्ताय स्वाहा..करत पुढे, आपल्या पंचप्राणांना आहुती देऊन झाल्यावर, सुस्वरात प्रार्थना आळवली जाते,

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।

हरीचिंतने अन्न सेवित जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

आणि मग, यजमान हात जोडून, भोजनास प्रारंभ करावा म्हणून अतिथि  देवाला विनंती करतात. रुचकर जेवणाचा आस्वाद घेतांना आपल्या शेजारी बसलेला, आपले ग्रह जुळणारा असेल,  तर क्या बात! पदार्थांची आणि पंगतीचे शिष्टाचार सांभाळत केलेल्या गप्पांची खुमारी नक्की वाढते. एखादा संकोची पाहुणा, जेवायला लाजत आग्रहाची वाट बघणाराही असतो. तसेच प्रेमळ आग्रहाच्या विनंतीला मान देत जेवताना दोन घास खचितच जास्त गेलेलेही पाहुणे असतात. पुन्हा यजमानांकडून मिष्टान्नाचा आग्रह केला जातो. ह्या सार्‍याचा आस्वाद घेत अतिथि तृप्त होत " अन्नदाता सुखी भव:" म्हणून आशीर्वाद देतो. मुखशुद्धीसाठी तांबूल किंवा विडा तयार असतो. आवडीने त्याचाही मग मस्त समाचार घेतला जातो ..

पंगतीत म्हटल्या  जाणार्‍या "वदनी  कवळ घेता " ह्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेत शिस्तीत जेवणे अपेक्षित असते, त्यामुळे हवे तेवढेच घेऊन, पानात न टाकता , पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेत, पोटभर  जेवण होते. यजमान आणि अतिथि दोघेही "अन्न हे पूर्णब्रम्ह आणि केवळ उदरभरण नव्हे, तर हे यज्ञकर्म " जाणतात आणि म्हणून हा भोजन सोहळा म्हणजे मांगल्यपूर्ण आणि सर्वार्थाने आनंददायी होतो...!!!