कवयित्री दीपा मिरिंगकर यांची कविता : साखळी टाका

त्या बालवयात आजी काय म्हणायची हे काही समजलं नाही. आज मात्र कवयित्री लग्न होऊन सासरी आली आणि या 'साखळी टाक्या' मागचा आजीने दिलेला संस्कार उलगडत चाललेला आहे. संसार म्हटलं की घरातील प्रत्येक माणसांचा स्वभाव सारखा नसतो, या टाक्याचे जेवढे प्रकार तेवढे माणसांच्या स्वभावाचे कंगोरे.

Story: कवितेतील भावतरंग | चित्रा क्षीरसागर |
04th December 2021, 11:47 Hrs
कवयित्री दीपा मिरिंगकर यांची कविता : साखळी टाका

साखळी टाका

आजीने लहानपणी शिकवला होता

भरतकामाचा टाका…..साखळीचा

थरथरत्या हाताने तो, लाल रंगीत रेशीम दोरा, पांढ-या शुभ्र कपड्यावर

सुई बरोबर वर खाली होत होता

म्हणाली अशीच जोडत जा पोरी नाती

एकांत एक साखळी घालत न थांबता न थकता, 

शब्दांचा अर्थ त्यावेळी कळलाच नाही,काळ्या सावळ्या

सुरकुतल्या हातांचं कसब

तेही समजल नाही

आज मात्र मी तेच कसब वापरते आहे

तुटल्या नात्यांची, चुकल्या वाटांची साखळी 

असल्या नसल्या रंगीत दो-याने सांधत आहे,

भरते आहे एकात एक साखळी, कुठे मोती टाका, कुठे कांथा,  

तर कुठे कशिदा , कधी साधाच सरळ टाका , 

कपड्यांचा रंग कधी उडतो तसा माणसांचा रंग उडताना मी पाहिलं, 

मुखवट्या मागचा चेहरा उघडा तेव्हा झाला 

कधी नात्यांचं रेशीम रेश्मा तील नाती

तुटली, सुटली, कधी संपली, कधी फाटली , 

कधीतरी शिवलेली उसवली 

पण मी मात्र न थांबता न विसरता

उसवली नाती , चुकला शब्द परत परत शिवते आहे, 

रंगीत रेशमाने भरते आहे, कधी हे पॅचवर्क जमतं

तर कधी ठिगळ लावलं अस वाटतं, तरी पण तोंडांत ठेवत शब्द प्रेमाचा

 हाताशी मिळेल तो रंग रेशमाचा निळा हिरवा , 

कधी पिवळा, पांढराशुभ्र, कुट्टकाळा, 

खालचा कपडा असू दे कसाही , 

जुना जीर्ण अथवा कोराही

माझी आपली दोरा अन् सुई

हातातून कधीच सुटत नाही

कपडा बदलतो रेशीम बदलते

सुई मात्र मीच असते, आजीने लहानपणी शिकवलेला टाका

 साखळीचा वारसा जोडण्याचा न थांबता न थकता ,

सतत आयुष्याच्या कपड्यांमध्ये भरते आहे.

रसग्रहण.

या कवितेत कवयित्रीने संसाराचा बराच टप्पा गाठला. नंतर संसारात जे चढउतार, यशापयश, सुखदुःख, मानापमान आवतीभोवतीच्या माणसांचे बदलत जाणारे मुखवटे यावर भाष्य त्या करतात. यात आजी, नात यांचा संवाद आहे. पूर्वी लग्नाआधी मुलीला सर्व कला शिकविल्या जायच्या. शिवणकाम प्रामुख्याने असायचे; तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दो-यांचे टाके शिकवले जायचे. गाठी टाका, काश्मिरी टाका, साखळी टाका, गहू टाका, दोरे भरणे, हातांची एमब्राॅडरी, मशीनवरची,  हे सर्व आलं पाहिजे हा आग्रह होता.

स्वयंपाक, पेन्टीग, सर्व कला शिकल्या पाहिजेत, मुलीला आल्या पाहिजेत या हेतूने घरातील मोठ्या व्यक्ती म्हणजे आई, आजी, काकी, मामी,आत्या या शिकवायच्या. जेणेकरून लग्न झाल्यानंतर आपली मुलगी कुठेही कमी पडता कामा नये. तसं या कवितेत कवयित्रीला आजी  विणकाम - भरतकाम शिकवते. त्यात साधा सरळ टाका घेते 'साखळी टाका'. एका टाक्यातून दुसरा टाका घालणे, साखळी तयार करत जाणे. त्यात रेशमाचा धागा तलम, मुलायम, चमकदार रंगांचा असतो. पांढ-याशुभ्र कपड्यांवर आकृतीबंध आखून रंगीत दोरे सुईत ओवून टाका घालायचा. असं करताकरता आजी या टाक्यातून नातीला काही संस्काराचे बीज ओटीत देते, की पोरी अशीच साखळी नात्यांची जोडत जा. कवयित्री आजीशी भावनिकदृष्ट्या खूप जोडलेली आहे.

त्या बालवयात आजी काय म्हणायची हे काही समजलं नाही. आज मात्र कवयित्री लग्न होऊन सासरी आली आणि या 'साखळी टाक्या' मागचा आजीने दिलेला संस्कार उलगडत चाललेला आहे. संसार म्हटलं की घरातील प्रत्येक माणसांचा स्वभाव सारखा नसतो, या टाक्याचे जेवढे प्रकार तेवढे माणसांच्या स्वभावाचे कंगोरे. त्याप्रमाणे जिथे जो टाका बसतो तो नात्यांनी बांधण्याचा प्रयत्न करते. जीवनाच्या वाटेवर कडू-गोड अनुभवांची शिदोरी आपण बरोबर नेत असतो. वेळ जर आपल्यावर वाईट आली की नाती तोंड फिरवतात, मुखवटे बदलल्याप्रमाणे नाती बदलतात. कधी अपशब्द वापरले तेव्हा रेशमाचा धागा तुटावा तशी  नाती तुटली, सुटली, उसवली…

हे अनुभवांचे खाच खळगे पार करत असताना सुई आणि दोरा म्हणजे नात्यांना जोडण्याचं प्रतीक कवयित्री वापरते. संसारात प्रत्येक दिवस हा वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. नाती, रूढी, परंपरा, श्रद्धा, सणवार, सोवळे ओवळे,  गोतावळा  हे सांभाळत कधी रूसवेफुगवे, मानापमान, अपशब्द, वादविवाद  होतातच. तेव्हा कधी नाती जोडली, ठिगळ लावली. परिस्थिती नेहमी सारखीच नसते. कपडा बदलावा तशी परिस्थिती बदलते, रंग बदलतात. तरीही तोंडात प्रेमाचा शब्द आणि वेगवेगळे रंग घेऊन साखळी गुंफत जाणे हे काम चालूच आहे. जीवनात वैभवाचा रंग पिवळा, कधी हिरवे स्वप्न, कधी त्याग केशरी रंग घेऊन येतो, कधी लाल रंग राग, संताप, तर कधी भय, नैराश्य घेऊन येणारा कुट्टकाळा रंग अशा रंगांच्या धाग्याने नात्याला शिवत कवयित्री प्रवास करते. यात फक्त शिवणकला, धागा-सुई असं आहे का? तर नाही. हे प्रतीक वापरून कवयित्रीने आपल्या संसाराचा वारसा जपलेला आहे. जो तिच्या आजीने दिला आहे. हेच कसब संसारात वापरुन सुई सगळ्यांना जोडते तसं नाती जोडण्याचं काम ती करते. 

परंपरांचा अन्वयार्थ पुढे नेण्याची वृत्ती  यात आहे. संसारात 'गृहिणी' हे पद स्वीकारले की या चढउताराची सवय करून घ्यावी लागते. हे कटू सत्य सूचकतेने पान ४ वर >>

कवितेत मांडले आहे. कवयित्रीची जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी ज्या संस्कृतिक वातावरणामध्ये तिचे व्यक्तिमत्त्व व कवित्व आकारले  ती संस्कृतिक पार्श्र्वभूमी जाणून घेणे योग्य ठरेल. कवयित्री ही एकत्र कुटुंब पद्धती, गोतावळा असलेल्या कुटुंबातून येऊन सासरीही ती कुटुंबप्रधान असलेल्या घरात आलेली असल्यामुळे सर्व नाती जपण्यासाठी म्हणून तिला सुई आणि दोरा होण्याचं कसब जमलेलं आहे. कवयित्रीच्या जीवन दृष्टीचा साकल्याने विचार करताना असे लक्षात येते की, सौंदर्यशोध आणि आनंदबोध हे तिच्या जीवनदृष्टीचे सूत्र आहे. शिवणाच्या कलेतून विश्वात्मक एकात्मतेची जाणीव होते. या कवितेत व्यवहारी जीवन, त्यातील सामाजिक नीतीनियमांसह जगत असतानाही आपले संवेदनशील कवित्व जतन करण्याची  कला कवयित्रीने मनोमन साधली आहे. त्यामुळे आपलं अंतर्मन या व्यवहारी जगापासून अलिप्त व सुरक्षित ठेवले आहे. साखळी टाका घालता घालता क्षितीजाकडचा प्रवास संपणारा नाही. हा आत्मशोध माणूसपणाचा आहे. अस्तित्वाच आणि जगण्याचा शोध घेता घेता भोवतालच्या बदलत्या रंगरूपांना टिपण्याचा, खोलवर जाऊन वेध घेण्याचा, प्रसंगी त्यावर मार्मिक भाष्य करून माणूसकीहीन होत चाललेल्या नात्यांच्या संदर्भात कवयित्री लिहिते.

कविता दीर्घ स्वरूपात आहे. मुक्त छंदाच्या अंगीकारामूळे दीर्घ कविता लिहणे सुलभ झाले आहे. आपल्या आजीच्या संस्कारांचा वारसा जपत पुढच्या पिढीला संक्रमित करणार्‍या कवयित्री आहेत फोंडा गोवा इथल्या दिपा मिरींगकर.