स्वयंसहाय्य गटामुळे स्वयंपूर्ण झालेली : रत्नमाला शिरोडकर

‘मंगलदीप’ ग्रामसंघात रत्नमाला यांचा 'लक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप' घेण्यात आला. तेव्हा त्यांना विविध सरकारी विभागातल्या योजनांचा लाभ घेण्यास मिळाला. त्यातली एक याजेना म्हणजे 'आत्मनिर्भर भारत अभियान'.

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
03rd December 2021, 11:57 pm
स्वयंसहाय्य गटामुळे स्वयंपूर्ण झालेली : रत्नमाला शिरोडकर

घरातील कर्त्या, कमावत्या पुरूषाच्या निधनानंतर घरातील सर्वांवर दु:खाचा डोंगर तर कोसळतोच, पण त्याच्या पत्नीला जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण घराचा सर्व भार अचानक तिच्या एकटीवर पडतो. आपली मुले व घरातील इतर माणसांचा प्रपंच कसा सांभाळावा याची चिंता व आपल्या पतीचे अचानक निधन हे ती सर्व सहन करते.  आपल्या नात्यांना साभाळाण्यासाठी दिवस रात्र झटत राहण्याची तिची तयारी असते. असेच काहीसे रत्नमालाबद्दल घडले.

रत्नमालाचे लग्न श्री.रत्नाकर शिरोडकर यांच्याबरोबर झाले होते. डोंगरी, तिसवाडी येथे ती रहात होती. लग्न झाले तेव्हा रत्नमाला २५ वर्षांची होती. लग्नाच्या १५व्या वर्षी अचानक तिच्या पतीचे निधान झाले. पतीच्या निधनामुळे तिला फारच धक्का बसला होता. तेव्हा तिचा लहान मुलगा अवघ्या १० वर्षांचा होता व मुलगी आठवीत शिकत होती. रत्नमाला जास्त शिकली नव्हती म्हणून तिला कुठेच नोकरी करता आली नाही. ती घरकाम किंवा जेवणाची कामे करत फावल्या वेळी घरी पापड व अन्य खाद्यपदार्थ करण्यासाठी ऑर्डर्स घ्यायची. सणानिमित्ताने लाडू, करंज्याही करायची. तसेच एखाद्या वेळी खाद्यपदार्थ करण्यासाठी ती  मदतीसाठी  शेजारी किंवा नातेवाईक, ओळखीच्यांकडे जात असे.॰

२०१० साली  रत्नमालाने एक सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपचे नाव 'लक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप' होय! तेव्हा हा ग्रुप ‘स्वर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना’ (एसजीएसवाय) यांच्याकडे स्थापित होता. तद्नंतर ‘लक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप’ जिल्हा ग्रामिण विकास संस्था (डिआरडिए) यांच्या जीएसआरएलएम या ‘स्त्रीशक्ती’ योजनेअंतर्गत जोडला गेला. गटाचे नेतृत्व तांत्रिक सहाय्यक रेखा वेर्णेकर यांनी केले. सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये असल्यामुळे तिने केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉलवर करायला तिला संधी मिळत गेली. प्रामुख्याने तिने घरी बनवलेले लाडू, चकली व चिवडा असे पदार्थ ती विक्रीस ठेवत असे. 

‘मंगलदीप’ ग्रामसंघात रत्नमाला यांचा 'लक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप' घेण्यात आला. तेव्हा त्यांना विविध सरकारी विभागातल्या योजनांचा लाभ मिळाला. त्यातली एक योजना म्हणजे 'आत्मनिर्भर भारत अभियान'. या अभियानांतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्यम उन्नयन योजना' (पीएलएफएलई) यांच्याद्वारे तिला सुमारे ४०,०००/- (चाळीस हजार रूपयाचे) कर्ज मिळाले. हे कर्ज तिला २ जून, २०२१ रोजी मिळाले. या कर्जाची रक्कम भरण्यासाठीचा हप्ता आणि व्याज पण कमी असल्यामुळे रत्नमालाला कर्जाची परतफेड करण्यास सोपे होणार होते. आपल्या थोड्याफार आर्थिक गरजा आपण सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये असल्यामुळे पूर्ण करता आल्या तसेच पीएलएफएमई योजनेमुळे थोड्याफार प्रमाणात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास मदत झाल्याचे तिने स्पष्ट केले. आज वयाच्या ५८व्या वर्षीसुद्धा मिळालेल्या  कर्जामुळे ग्रामसंघाची तसेच सेल्फ हेल्प ग्रुपची खूप ऋणी असल्याचे रत्नमाला सांगते.