विनाकारण विरोध करणे हे विरोधकांचे काम : जोशुआ

|
25th November 2021, 11:02 Hrs
विनाकारण विरोध करणे हे विरोधकांचे काम : जोशुआ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
सरकारने म्हापसा शहरासाठी १४० कोटी रुपयांचे केलेले प्रयोजन नावापुरते नाही. निवडणुकीची ही जाहिरातबाजी नाही. आपण हे प्रकल्प पूर्ण करून दाखविणार, हा माझा म्हापसावासीयांना शब्द आहे. एकाद्या गोष्टीला विनाकारण विरोध किंवा टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. यामुळे तरी म्हापशात विरोधक असल्याची जाणीव होते, अशा शब्दांत आमदार जोशुआ डिसोझा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
खोर्ली येथे कार्यक्रमस्थळी आमदार डिसोझा पत्रकारांशी बोलत होते. सरकारकडून या प्रकल्पांसाठी मला हिरवा कंदील मिळाल्यामुळेच आपण संबंधित प्रकल्पांची माहिती जाहीररीत्या दिली. अन्यथा प्रत्येक प्रकल्पाची स्वतंत्र्यरीत्या माहिती देऊन स्वतःची जाहिरातबाजी केली असती, पण आपल्याला उगाच आपलीच पाट थोपटणे योग्य वाटत नाही, असे डिसोझा म्हणाले.
या प्रकल्पांमुळे म्हापसावासीयांचा फायदाच होणार आहे. म्हापशात इतके दिवस विरोधक मला दिसले नव्हते. माझ्या वरील माहितीमुळे त्यांना जाग आली, ते बोलू लागले. ही आनंदाचीच गोष्ट आहे, असे आमदार डिसोझा म्हणाले.
गेल्या दोन वर्षांत आपण १४० कोटींचे प्रकल्प शहरात आणून दाखविले. ही कामे आता पूर्ण करण्याची जबाबदारी माझीच असेल, मी दिलेली ही आश्वासने पूर्ण करून दाखविणार, तो खरा विजय माझाच असेल. त्यासाठी मी माझी कार्यक्षमता सिद्ध करून दाखवू, असे ते म्हणाले.
मी कधीच कारणाशिवाय बोलत नाही. मी अगोदर काम करतो व नंतरच बोलतो. काही गोष्टी करोना व पावसामुळे लांबल्या. सारस्वत विद्यालय मैदान प्रकल्पाची पायाभरणी हे याचेच एक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांचे सहकार्य घेत मी विकास कामे पुढे नेत आहे. आगामी काळात म्हापसा हा पायाभूत सुविधांमध्ये सर्वोतम मतदारसंघ बनवून दाखविण्याचे आपले उद्दीष्ट आहे. यासाठी मला जनतेने थोडासा वेळ द्यावा. तसेच करोनासारखी आणखीन प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक क्षेत्रात आम्ही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आपण म्हापसावासीयांना देत आहेत, असेही ते म्हणाले.