तळे राखील तोच पाणी चाखील

भाजपचे काही मंत्री, आमदार फक्त आपला वैयक्तिक लाभ शोधत बसलेले असताना, पक्ष किंवा सरकार यांच्या समर्थनार्थ येऊन बोलण्यासाठी अनेकांना वेळ नसताना श्रीपाद नाईक यांनी पक्षाची बाजू उचलून धरत भाजपला थोडे बळ निश्चितच दिले आहे.

Story: उतारा । पांडुरंग गांवकर, ९७६३१०६३०० |
20th November 2021, 11:20 pm
तळे राखील तोच पाणी चाखील

गोव्यात भाजप उभा करण्यासाठी ज्यांनी पायपीट केली त्यातील एक श्रीपाद नाईक. खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री. स्थानिक राजकारणात नशीब आजमावणे कठीण होत असल्यामुळे त्यांनी दिल्लीत जावे आणि पर्रीकरांनी गोव्यात रहावे असा अलिखित करारच जणू भाजपने त्यांच्याशी केलेला असावा. सलगपणे लोकसभा निवडणूक जिंकत त्यांनी गोव्यात विक्रमही प्रस्थापित केला आहे. श्रीपाद नाईक यांच्या साध्या आणि प्रामाणिक वागणुकीमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये जागा दिली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान होते. त्यानंतर मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये आणि आताही ते मंत्री आहेत. त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि कोणाला दुखवायचे नाही या स्वभावामुळे ते अनेकदा स्पष्टपणे बोलत नाहीत. आपली बाजू खंबीरपणे मांडत नाहीत, त्यामुळे त्यांची बाजू घेणारेही वैतागतात. पण, वरवर श्रीपाद नाईक साधे दिसत असले तरीही पक्षातील काहीजणांच्या मतांना थेट विरोध करून किंवा त्यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे हे जनतेला ठाऊक नसले तरी पक्षातील नेत्यांना माहीत आहे. पक्षाने एकदा निर्णय घेतला की पक्षाचे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास ते मागे हटत नाहीत. त्यांना पक्षापेक्षा मोठा कोणी वाटत नाही. या शिकवणीमुळेच ते बोलतात तेव्हा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढतात. आताही त्यांनी पक्षाच्या विरोधात बोलणारे, पक्षाच्या धोरणांविरोधात जाणाऱ्यांना आपल्या भाषेत समज दिली आहे आणि पक्षाला ब्लॅकमेल करू नका, ऐनवेळी विश्वासघात करण्यापेक्षा आताच पक्ष सोडून जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांचे हे बोलणे फक्त मायकल लोबो किंवा अन्य काही मंत्री, आमदारांसाठीच नाही. तर आमदार नसलेल्या आणि पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही आहे.

पहिली घटना आहे मंत्री मायकल लोबोंसंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून मायकल लोबो आपण भाजप सोडण्याचा विचार करत असल्याचे सांगत होते. त्याविषयीच्या बातम्याही आल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी अमित शहांपासून ते बी. एल. संतोष यांच्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले. आपल्या ताब्यात बार्देश तालुक्यातील मतदारसंघ द्या, अशी मागणी करणारे लोबो हे पक्षापेक्षा मोठे नसल्यामुळे त्यांनी अशा अवास्तव मागण्यांसाठी आणलेला दबाव भाजपने घेतला नाही. आपल्या पत्नीला शिवोलीतून उमेदवारी मिळावी यासाठी मायकलने आवश्यक ते सगळे प्रयत्न केले. पण मायकल लोबोंची मागणी मान्य केली तर इतर आमदारांच्याही मागण्या मान्य कराव्या लागतील याची जाणीव असल्यामुळे भाजपने लोबो यांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

दुसऱ्या घटनेचा संबंध अन्य एका मंत्र्याशी आहे. तोही पक्ष सोडण्याच्या प्रयत्नात आहे. कारण लोबोच्या पत्नीला जशी भाजपने उमेदवारी नाकारली तशीच ती या मंत्र्याच्या पत्नीलाही नाकारली जाईल. त्यामुळे लोबोला जो सल्ला दिला आहे तोच सल्ला या मंत्र्यालाही दिला आहे. त्याने तर आपण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू ते योग्यवेळी जाहीर करू असे मतदारांना सांगितले आहे.

तिसरी घटना दक्षिण गोव्यातील एका मंत्र्याशी संबंधित आहे. त्यालाही पत्नीला अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवण्याचा सल्ला भाजपने दिला आहे.

चौथी घटना आहे काल परवाची. अर्थात पणजी मतदारसंघातील. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपने उमेदवारी नाकारली तर कठीण निर्णय घेण्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. त्याचा अर्थ त्यांनाच चांगला माहीत असेल. पणजीत बाबूश मॉन्सेरात हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना वगळून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला तर पणजी, ताळगाव, सांताक्रुझमध्ये मॉन्सेरात जोडपे भाजपला नुकसान करू शकते. २०१७ मध्ये भाजपने काही तत्कालीन आमदारांना वगळून दुसऱ्या नव्या उमेदवारांना संधी दिली होती. यावेळीही काही जणांना वगळले जाईल. सुमारे आठ ते नऊ आमदारांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते. पण, मॉन्सेरात जोडप्याची उमेदवारी भाजपने निश्चित केली आहे. पणजी आणि ताळगावचा नियम बार्देश, सत्तरी किंवा सांगेत लागू पडणार नाही. त्यामुळे उत्पलला उमेदवारी मिळेल की नाही याबाबत कोणीच अंदाज बांधू शकत नाही. उमेदवारी नाही मिळाली तर उत्पल भाजपविरोधी भूमिका घेईल असे दिसत नाही. पण त्यांच्या भोवती असलेले काही लोक त्यांचा राजकीय बळी करण्याच्या तयारीत आहेत.

उत्पलने योग्यवेळी आपली चाल खेळायला हवी. त्यासाठीही योग्य वेळ येऊ शकते. श्रीपाद नाईक यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना पक्षाला ब्लॅकमेल करू पाहणाऱ्यांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. गेल्या काही वर्षांत प्रथमच त्यांनी परवा काही विधाने केली जी भाजपसाठी फायद्याची ठरली. ज्यांना पक्ष सोडायचाच आहे, ज्यांना जायचे आहे त्यांनी लवकर जावे. ऐनवेळी भाजपचा विश्वासघात करू नये. कोणी कुठे जायचे तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पक्षाला ब्लॅकमेल करू नये. जाणाऱ्यांचा पक्षावर परिणाम होणार नाही. कारण लोक पक्षाला ओळखतात, माणसांना नव्हे असे म्हणत पक्षावर उमेदवारीसाठी दबाव आणणाऱ्यांना श्रीपाद नाईक यांनी खडसावले आहे. त्यांनी कोणाचेच नाव घेतलेले नाही. पण तरीही त्यांनी अनेकांना आपल्या विधानामुळे इशारा दिला आहे. त्यांचा हा इशारा कोणाकोणाला आहे ते ज्यांना त्यांना समजले असेल.

भाजप आपल्या पदाधिकाऱ्यांना वेळ येते तेव्हा बक्षीशी देत असते. त्यामुळे जे पक्षासोबत राहतील त्यांचीच चिंता पक्ष करेल. ब्लॅकमेलिंग वगैरे चालत नसते. तळे राखणार आहे त्यालाच पाणी चाखण्याची संधी मिळणार आहे असे श्रीपाद नाईक सूचवत आहेत.

‍भाजपचे काही मंत्री, आमदार फक्त आपला वैयक्तिक लाभ शोधत बसलेले असताना, पक्ष किंवा सरकार यांच्या समर्थनार्थ येऊन बोलण्यासाठी अनेकांना वेळ नसताना श्रीपाद नाईक यांनी पक्षाची बाजू उचलून धरत भाजपला थोडे बळ निश्चितच दिले आहे.