गोकर्ण

या फुलांचा मनमोहक असा तो निळा रंग बघितला की ताण खरंच कमी होतो. मन प्रसन्न होतं अगदी. निळी शाई पाण्यात घातल्यावर जो रंग येतो तोच या फुलांचा रंग. गहिरा निळा!... या रंगात बुडून जावं वाटतं, डुंबावं वाटत मनसोक्त,पण त्यासाठी खूप फुलं लागतील ना आणि म्हणून ही वेल लावायला हवी दारात...

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक |
19th November 2021, 11:56 Hrs
गोकर्ण

एक हजार एक वर्षांपूर्वी हिमपान जंगलातील प्राणी माणसांच्या जगात वावरायचे.  म्हणजे आजच्यासारख्या सीमा नव्हत्या त्यावेळी. त्या गावात इस्रा नावाची मुलगी रहायची, साधी, सरळ पण खूप गोड अशी ही मुलगी . एके दिवशी तिला भेटायला किन्नरी नावाची एक प्राणी येते, ती अर्धी बाई आणि अर्धी पक्षी असते, ती इस्राला म्हणते चल आपण फिरून येऊ, इस्रा आनंदाने किन्नरीच्या पाठीवर बसून जाते, चांदण्यांनी भरलेले आकाश, चंद्रप्रकाशात चकाकणारे तळे, सुवासिक कमळफुलांची जागा असे सगळं फिरून झाल्यावर  किन्नरी तिला एका विशेष फुलवेलीकडे नेते, गडद निळे असे ते सुंदर फूल इस्राने कधीही पाहिलेले नसते, किन्नरी तिला म्हणते ही वेल घेऊन जा आणि घरी लाव, या झाडांमुळे ताण कमी होईल आणि सगळे आनंदी रहातील,इस्रा तिचे ऐकते आणि ती वेल आपल्या घरासमोर लावते, वेल फार लवकर मोठी होते आणि निळ्या सुंदर फुलांनी भरून जाते,आसपासची लोकं ती बघून संमोहित होतात.

इस्रा खूप चांगली सुगरणही होती, ती ठरवते की या सुंदर फुलांचा चहा केला तर, म्हणून ती फुलं काढून त्याचा चहा करते, अतिशय सुंदर निळ्या रंगाचा चहा तयार होतो, त्यात लिंबू पिळून ती त्याचा रंग जांभळा करते, लोकांना  हे पेय खूप आवडतं. अशातऱ्हेने थायलंडच्या प्रसिद्ध अचाम चहाची उत्पत्ती झाली. (एक थाई लोककथा)

आपण ज्या विषयाशी निगडित असतो तो विषय आपल्याला सर्व बाजूने माहीत आहे अशी आपली धारणा असते. बऱ्याच वेळेला, एक प्रकारचा इगो म्हणा ना. असंच काहीसं माझं गोकर्णीच्या फुलाबाबतीत झालं.  गोकर्णी म्हणजेच शंखपुष्पी हे मला माहीत होतं, अत्यंत महत्त्वाचं औषधी झाड किंवा वेल आहे हेही माहीत होतं, त्याचा निळा रंग तर माझा फार आवडता, पण हा निळा रंग पाण्यात उतरवता येतो म्हणजेच त्याचा चहा करता येतो, आणि मुख्यत्वे केसांसाठी चांगला असतो हे मात्र मला फोटोग्राफर आसावरी कुलकर्णी यांच्या पोस्टमुळे कळलं.

दुर्गा देवी किंवा शंकराला प्रिय अशी ही फुलं प्रत्येक बागेत असतात, काहीशी नाजूक वेल असली तरी एकदा का फुलायला लागली की भरभरून फुलतात, मराठीत याला शंखपुष्पी हेही नाव आहे, याचा महत्त्वाचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो. याच्या आकारावरून याला शंखपुष्पी किंवा गोकर्ण म्हणजे गायीच्या कानासारखं असं नाव आहे, हिंदीत आणि बंगालीत अपराजिता असे सुंदर नाव आहे. अपराजिता म्हणजे कधीही न हरणारी. शुक्राचार्यांनी ही वेल स्वर्गातून पृथ्वीवर आणली अशी आख्यायिका आहे.  मूळ दक्षिण आशियावासी या वेली आता सगळीकडे लावल्या जातात.  निळा रंग हा सर्वात लोकप्रिय रंग आहे, पण ही फुलं पांढऱ्या किंवा गुलाबी रंगातही फुलतात.   आशियाई pigio n pea, ब्लू pea , butterfly pea अशी याची इंग्रजी नावे आहेत आणि क्लीटोरिया ternateaअसे शास्त्रीय म्हणजेच लॅटिन नाव आहे.   याचे शास्त्रीय नावही त्यांच्या विशिष्ट आकारावरून ठेवलं गेलंय.

याची फुलं, पानं, मूळं असं सगळंच औषधी असतं, म्हणजे सर्दी , ताप , उच्च रक्तदाब, मधुमेह, स्मरणशक्ती, ताण कमी करण्यासाठी, केसांची वाढ, उत्तम त्वचा, अँटीऑक्सिडंट  इत्यादीसाठी ही वेल, भारत, थायलंड, मलेशिया आणि इतर ठिकाणी ही वापरली जाते.  

या वेलीवर शास्त्रीय शोध चालूच आहे. संशोधनानुसार कॅन्सर आणि hivसारख्या असाध्य रोगावरही ही गुणकारी ठरू शकते. जगातल्या काही cyclotideनावाचं प्रोटीन असणाऱ्या काही झाडांपैकी एक म्हणजे गोकर्णीची वेल आहे त्यामुळे hivसाठी ती उपयुक्त ठरते.

याची वेल शेंगधारक कुळात मोडते म्हणजेच हवेतील नत्र जमातीत आणण्यासाठी या वेलीचा वापर होतो. त्याचबरोबर प्रदूषित झालेल्या जमिनीला पूर्वपदावर आणण्यासाठी या वेलीचा वापर होतो.

थाईलंडमध्ये नाम डॉक अचाम या नावाचे पेय किंवा चहा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.  या फुलांचा सुंदर निळा रंग ( इंडिगोklor) निघतो ज्यापासून चहा बनवला जातो, यात लिंबाचा रस मिसळला की याचा रंग जांभळा होतो, तसेच कार्बोनटेड वॉटरमुळे गुलाबी होतो, गवती चहा, मध घालून या चहाचे सेवन केले जाते, ब्लू pea tea म्हणून आता हे पेय सगळीकडे प्रचलित आहे, 

मलेशियामध्ये नासीकरबू नावाचा भात करण्यासाठी याच्या फुलांचा वापर होतो, शिजणाऱ्या भातात हे टाकलं की निळा रंग चढतो भाताला. बर्मा , थायलंडमध्ये फुलांची भजीही केली जातात.  आजकाल butterfly pea जीन नावाने रंग बदलणारी दारू म्हणून रेस्टरंटमध्ये प्रसिद्ध आहे, ही दारू बाटलीत निळ्या रंगाची असते तर ग्लासमध्ये लिंबू घालून जांभळ्या रंगाची होते.

Anthocyninआणि फ्लॉवनोइड्स नावाच्या रासायनिक तत्त्वामुळे या फुलांना सुंदर रंगांची देणगी मिळालेली आहे.

लहानपणी या नाजूक सुंदर फुलांना देवावर घालण्यासाठी चढाओढ लागायची, अगदी हार करण्याएव्हढी नाही मिळत पण एखादं दुसरं फूल घालायला मिळायचं.  जशी शनकरच्या बिया खाऊन बघायची, तशी याच्याही कोवळ्या बिया मी खाऊन बघितल्यात लहानपणी, पुढे वनस्पती शास्त्राच्या फॅमिलिज शिकताना, लगुमिनोसीए फॅमिलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून या फुलांची चिरफाड करायचो, पण याचा रंग निघू शकतो असा विचार केलाच नाही कधी, शास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग असावं ते यासाठी, सृष्टीचा अभ्यास करताना एखादी लहान गोष्टही मोठा शोध लावण्यासाठी उपयोगी पडू शकते.असो तर...

या फुलांचा मनमोहक असा तो निळा रंग बघितला की ताण खरंच कमी होतो.  मन प्रसन्न होतं अगदी.   निळी शाई पाण्यात घातल्यावर जो रंग येतो तोच या फुलांचा रंग.  गहिरा निळा!... या रंगात बुडून जावं वाटतं, डुंबावं वाटत मनसोक्त,पण त्यासाठी खूप फुलं लागतील ना आणि म्हणून ही वेल लावायला हवी दारात, भरू द्यायला हवी, आणि फुलू, बहरू लागली की मनसोक्त रंग खेळता येईल. 

हल्ली या वेली रुजवून सगळ्यांना वाटेनं म्हणते, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांच्या परिसरामध्ये खास करून. नको असलेला ताण जाऊन पोरं शिकण्यावर जास्त भर तरी देतील, घराघरा मधला, मित्रमैत्रिणीमधला ताण दूर होऊन देश, हे जग शांत होईल.... आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाना हेच एक सुख तर हवंय जगण्यासाठी,

बाकी, भाकरी, वस्त्र, निवारा शोधण्यासाठी लढणं हे आपल्याला चुकलं नाही त्यामुळे ताण दूर करून शांत चित्ताने उत्तम जगण्यासाठी आणि उत्तम पिढी वाढवण्याकडेच आपलं जास्तीत जास्त लक्ष उरेल नाही का? होऊ का मीही त्या गोष्टीतली किन्नरी? पण इस्राही भेटायला हवी..…..

Blue pea tea recipe:

https://m.youtube.com/watch?v=GVJJ9WH_nEU&feature=youtu.be ,