अग्रलेख । आक्रमक चीनचा जगाला धोका

इतर देशांनी आण्विक ऊर्जा ही विकासासाठी वापरावी, असा साळसूदपणाचा सल्ला बडे देश देतात; मात्र,आपण कोरडे पाषाण अशीच त्यांची वृत्ती आहे.

Story: अग्रलेख |
06th November 2021, 01:28 Hrs
अग्रलेख । आक्रमक चीनचा जगाला धोका

जगावर वर्चस्व निर्माण करून, सर्वच देशांवर हुकुमत गाजवण्याचा इरादा बाळगलेल्या चीनचे खरे रूप अमेरिकेच्या पेंटागॉन (संरक्षण) खात्याच्या अहवालातून जगासमोर आले आहे. चीनची ही आक्रमकता केवळ भारत अथवा तैवान या देशांपुरती धोकादायक राहिली नसून, त्याचा जागतिक शांततेवर परिणाम होणार असल्याचे चीनची आण्विक शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि गरज पडल्यास वापर करण्याच्या हेतूमुळे स्पष्ट झाले आहे. सर्वच देशांवर धाक बसवून त्यांना आपल्या कह्यात ओढण्याची अतिशय धूर्त खेळी चीन खेळत आहे, ज्यामुळे रशिया अथवा अमेरिका या देशांचा प्रभाव कमी होईल. अमेरिकेवर २०४९ पर्यंत सर्वच बाबतींत मात करण्याची चीनची योजना असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालाविषयी चीनने दिलेली प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे अमेरिकेवर टीका करणारी आहे. चीन असो अथवा अमेरिका, दोन्ही देशांना एकमेकांवर कुरघोडी करायची आहे, यात शंका नाही. याचा अर्थ असा नव्हे की, संबंधित अहवालावर विश्‍वास ठेवू नये. अमेरिकेसारखा शक्तिशाली देश आपल्या लहरीनुसार, अन्य देशांना आपल्या तालावर नाचवू पाहातो, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र त्याचवेळी चीन प्रत्यक्ष नियंत्रण मिळवून ताबा मिळवू पाहातो, हा दोन देशांमधील भूमिकांमध्ये फरक आहे. दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीप्रमाणे अमेरिकेकडून असलेला धोका हा कमी आहे, तर चीनचे विस्ताराचे धोरण हे अन्य देशांसाठी अधिक धोकादायक आहे, असे म्हणावे लागेल.
चीन केवळ विस्तारवादी धोरण आखून थांबलेला नाही. त्या देशाने जून २०२० मध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवरील तणावादरम्यान पश्‍चिम हिमालय भागांत नियंत्रण कक्ष स्थापून फायर ऑप्टिक जाळे विणले असून, त्यामुळे भारतातील सीमेअंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवणे त्या देशाला शक्य होणार आहे. हा धोका लढाख व अन्य सीमावर्ती भागांना सतत जाणवत राहाणार आहे, याकडे पेंटागॉनने सादर केलेल्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. या अहवालातील पुढची माहिती तर अधिक भयानक आहे. चीनने दशकभरात ४०० आण्विक शस्त्रास्त्रे तयार केली असून, हा आकडा २०२७ मध्ये ७०० तर २०३० पर्यंत एक हजारावर जाईल, अशी जगाला हादरवून सोडणारी माहिती या अहवालात आहे. अत्याधुनिकीकरण आणि विस्तारवाद असा दोन सूत्री कार्यक्रम राबविण्यावर चीनने सध्या जोर लावला आहे. हा अहवाल जगात चुकीची माहिती पसरविण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे, खरा धोका अमेरिकेकडूनच आहे, असा चीनचा दावा आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात, अमेरिकेकडे सध्या ३,७५० आण्विक शस्त्रास्त्रे असून हा आकडा वर्षअखेर ५,५३० होईल, असा दावा चीनने केला आहे. आपण केवळ स्वसंरक्षणासाठी अशी शस्त्रास्त्रे तयार करीत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. हे दावेप्रतिदावे पाहाता, दोन्ही देश आण्विक शस्त्रे निर्मितीत स्पर्धा करीत असून तोंडाने मात्र शांततेचा जप करीत असल्याचे दिसून येते. योग्यवेळी ही सारी शस्त्रास्त्रे नष्ट करू, अशी हमी दोन्ही देशांनी दिली आहे, ती केवळ अन्य देशांवर दबाव आणण्यासाठी, हेच यावरून सिद्ध होत आहे. इतर देशांनी आण्विक उर्जा विकासासाठी वापरावी, असा साळसूदपणाचा सल्ला बडे देश देतात; मात्र,आपण कोरडे पाषाण अशीच त्यांची वृत्ती आहे.
जगातील काही देशांची आक्रमकता आणि विस्तारवाद यांचा जागतिक शांततेला खरा धोका आहे, असा सावधगिरीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात दिला होता. त्यांचा रोख शेजारी चीनवर होता हे वेगळे सांगायला नकोच. त्याच दरम्यान चीनच्या सीमेवरील कारवायांमध्ये वाढ झाली होती, ज्याचा अधिक त्रास भारताला जाणवत होता. कोविडरूपी जागतिक महामारीने त्रस्त जग लस शोधण्यासाठी संशोधनात मग्न असताना, चीनसारखा बलाढ्य देश स्वतः या कोविडरूपी महामारीने गटांगळ्या खात होता, त्याचवेळी दुसरीकडे आपला विस्तारवादाचा अजेंडा घेऊन भारत, तैवान अशा देशांना सतावण्यात गुंग झाला होता. करोनाचा जनक अशी जगातून निर्भत्सना होत असतानाही, निर्लज्जपणे अन्य देशांची भूमी बळाकावण्याचा प्रयत्नात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम या देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत होता. जगातील असंख्य देशांची पर्वा न करता, त्यांच्या टीकेची दखल न घेता चीनच्या कारवाया वाढतच चालल्या होत्या. चीनपासून भारताला अधिक धोका आहे, हे तत्कालीन संरक्षण मंत्री ख्रि. जॉर्ज फर्नांडिस यांनी व्यक्त केलेले मत खरे असल्याचा प्रत्यय देशाला आता येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणदृष्ट्या आपला देश अधिक बळकट करण्याकडे मोदी सरकार लक्ष देत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.