नामिबियाचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

उत्तम धावगतीसह तिसऱ्या क्रमांकावर झेप : रुबेन ट्रम्पलमॅनचे ३ बळी

|
28th October 2021, 12:07 Hrs
नामिबियाचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

दुबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुपर १२ मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियाने बुधवारी ऐतिहासिक विजय नोंदविला. नामिबियाने राऊंड १ मध्ये नेदरलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर त्यांनी आयर्लंडला नमवून थेट सुपर १२ मध्ये धडक दिली होती. बुधवारी त्यांनी त्यांच्यापेक्षा तगडा प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा पराभव केला. या विजयासह नामिबियाने ग्रुप २ मध्ये २ गुणांची कमाई करताना .५५० नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टीम इंडिया, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड यांची पाटी अजूनही कोरीच आहे. स्कॉटलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे उपांत्य फेरीमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या षटकामध्ये एखाद्या गोलंदाजाने तीन विकेट घेतल्या. सुपर-१२ च्या या सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरासमसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डरबनमध्ये जन्मलेल्या नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅनने पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर जॉर्ज मुन्सेला शून्य धावांवर बाद केले. यानंतर त्याने पुढचा बॉल वाईड टाकला. यानंतरच्या चेंडूवर एकही धाव आली नाही, पुढचा चेंडूही त्याने वाईड टाकला. तिसऱ्या वैध चेंडूवर कॅलम मॅकलियोड शून्य धावावर पायचित झाला. पुढच्या चेंडूवर रिची बेरिंग्टनही शून्य धावावरच पायचित झाला.
या धक्क्यांतून सावरताना स्कॉटलंडने मिचेल लिस्क (४४) व ख्रिस ग्रेव्हेस (२५) यांच्या भागीदारीच्या जोरावर ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. लिस्कने २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचले होते. नामिबियाकडून रुबेनने १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याला जॅन फ्रायलिंक (२-१०), जेजे स्मिथ (१-२०) व डेव्हिड विज (१-२२) यांची उत्तम साथ मिळाली
प्रत्युत्तरात क्रेग विलियम्स व मिचेल व्हॅन लिंगेन यांनी नामिबियाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, शाफियान शरिफने लिंगेनला १८ धावांवर बाद केले. झेन ग्रीन (९) व कर्णधार गेरहार्ड इरास्मस (४) हे झटपट माघारी परतल्याने नामिबियाची अवस्था बिकट झाली होती. विलियम्सन २३ धावांवर माघारी गेल्यानंतर त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, डेव्हिड विज व जेजे स्मिथ यांनी खंबीरपणे सामना केला. विज फॉर्मात होताच आणि त्याची विकेट मिळवण्यासाठी स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी सर्व प्रयत्न केले. अखेर विजयासाठी अवघ्या ७ धावा हव्या असताना विज १६ धावांवर बाद झाला, परंतु स्मिथने विजयी धाव हवी असताना खणखणीत षटकार खेचला. त्याने नाबाद ३२ धावा करून नामिबियाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

रुबेनने इतिहास घडवला
नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅनने पहिल्याच चेंडूवर जॉर्ज मुन्सी (०) चा त्रिफळा उडवला. तिसऱ्या चेंडूवर कॅलम मॅकलीओड (०) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रिची बेरींगटन (०) हाही बाद झाला. रुबेनने पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत इतिहास घडवला. पुरुष टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या षटकात तीन विकेट घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड : २० षटकांत ८ बाद १०९ धावा
नामिबिया : १९.१ षटकांत ६ बाद ११५ धावा