कार्यक्षमतेचा निकष लावूनच लोकप्रतिनिधी निवडा

कोणत्याही माणसाच्या कामाचे मूल्यमापन करायचे तर त्या माणसाचे नेमके काम काय हे बघणे आवश्यक असते. आपण नेमलेले प्रतिनिधी योग्य काम करत आहेत की नाही, ते बघायचे असल्यास त्यांचे काम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Story: विचारचक्र | प्रा. राजेश कळंगुटकर |
27th October 2021, 11:59 pm

भारताच्या संविधानानुसार भारत देश हा सार्वभौम, समाजवादी, लोकशाही आणि गणराज्य असलेला  देश मानला जातो. भारताने 'प्रतिनिधी लोकशाही' स्वीकारली आहे, म्हणजे सरकार निवडताना किंवा कायदे आणि नियम बनवताना लोक थेट मतदान करणार नाहीत तर लोक त्यांचे  प्रतिनिधी निवडून देतील आणि हे प्रतिनिधी लोकांच्या वतीने सरकार निवडतील.  नागरिक त्यांचं  काम करण्यासाठी वेगळ्या व्यक्तींना नेमतात पण नेमलेल्या व्यक्ती ज्या कामासाठी त्यांना नेमलेले आहे ते काम करतातच  असं नाही; मग त्यांचं मूल्यमापन कसं आणि कोणी करायचं ?  ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला नोकरीवर ठेवल्यावर ती व्यक्ती त्याला  नेमून दिलेलं काम योग्य प्रकारे करते की नाही  हे बघण्यासाठी खाजगी कंपन्यांमध्ये "अप्रेजल"  केलं  जातं,  त्याचप्रमाणे लोकशाहीत  आपण ज्या प्रतिनिधींना निवडले आहेत, ते त्यांना नेमून दिलेलं काम योग्य रीतीने करतात की नाही ते बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचं मूल्यमापन व्हायलाच हवं; कारण आपण आपल्या आयुष्याची पाच वर्षे त्यांच्या हातात देत असतो आणि जर ते चुकत असतील तर निर्भीडपणे प्रश्न विचारण्याची आपल्यात धमक असली पाहिजे . कोणत्याही माणसाच्या कामाचे  मूल्यमापन करायचं तर त्या माणसाचे नेमकं काम काय  हे बघणे आवश्यक असतं. आपण नेमलेले प्रतिनिधी योग्य काम करत आहेत की नाही ते बघायचं असल्यास त्यांचं काम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

प्रतिनिधी - संसदेत भाग घेणं, लोकांच्या समस्याचं निराकरण करणं, हिताचे रक्षण करणं, त्यांच्या इच्छा-आकांक्षाना त्या त्या पातळीवरील शासकासमोर ठेवणे,  नेमलेलं सरकार नीट  काम करत आहे की नाही हे बघणे ,  गरज भासल्यास सरकारला जाब विचारणे, प्रश्न विचारणे ही प्रतिनिधींची मुख्य कामे असतात आणि याच आधारे  त्यांचे मूल्यमापन करायचे असते  पण प्रत्यक्षात प्रतिनिधी आपली खरी कामे  विसरून काही वेगळीच कामे करताना दिसतात. बऱ्याच वेळा  नेमून दिलेली कामे वेळच्यावेळी करीत नसल्याने हे प्रतिनिधी नाकारले जातात आणि परत त्याच मतदारसंघात निवडून येण्यास त्यांना कठीण होऊन बसते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की, लोकशाहीचा खरा पाया नागरिक असला पाहिजे आणि मतदाता नव्हे. तुम्ही स्वतःला नागरिक तेव्हाच म्हणून घेऊ शकतात जेव्हा तुम्ही देशाच्या प्रशासनावर, तुमच्या प्रतिनिधींवर, त्यांनी राबवलेल्या धोरणावर, घेतलेल्या निर्णयावर जागरूकपणे आणि सुजाणपणे लक्ष ठेऊन असतात. काहीसे प्रतिनिधी राजकारणातून कायमचे नाहीसे झालेले बघितले आहेत आणि त्यांना लोकही विसरून गेलेले आपण पाहतो. प्रतिनिधी आपल्या  पाच वर्षाच्या कार्यकाळात आपली जबाबदारी विसरून आपल्याला नेमून दिलेली कामे करायला विसरतात आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते  त्याला बरीच  कारणे आहेत. बहुतेक प्रतिनिधींना मतदारसंघाबद्दल   योग्य  भौगोलिक माहिती नसते. मतदारसंघातल्या प्रत्येक पंचायत क्षेत्रात किंवा प्रत्येक प्रभागात वेगवेगळे विषय आणि वेगळ्या समस्या असतात. अशा ह्या विषयांची खोल माहिती असणे गरजेचं आहे  पण त्यांना  योग्य माहिती नसेल तर असे विषय समजून घेऊन सोडवायला प्रतिनिधी कमी पडतात. माहिती नसल्यामुळे त्यांना कशा पद्धतीने  योग्य उपाय सुचवावेत हे माहीत नसते आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीने विषय शिकून घ्यायची त्यांच्याजवळ इच्छाशक्ती नसते. असे नेते मतदारसंघाला योग्य दिशा देऊ शकत नाहीत आणि मतदारसंघाचा विकास खुंटतो. बऱ्याच वेळी उमेदवार स्वतःच्या मतदारसंघात निवडणूक न लढवता इतर मतदारसंघात निवडणूक लढवून निवडूनही येतात आणि केवळ इच्छा आणि स्वप्नपूर्तीसाठी हा अट्टाहास केला जातो  आणि तेही पैशांच्या आणि शक्तीच्या जोरावर.

 संविधान आपल्याला बरेच हक्क देत असते,   पण काम करण्याची इच्छा नसेल तर कुणीही निवडणुका लढवू  नयेत, असं माझं स्पष्ट मत आहे; कारण संविधान कुणालाही इतरांचं नुकसान करण्याचा हक्क देत नाही. चुकीचे उमेदवार निवडून आल्याने देशाला त्याचं नुकसान भोगावं लागतं आणि देशाची प्रगती होतं नाही. अशा वेळी प्रतिनिधींना  काम करण्याची इच्छा नसते, कारण त्यांना मतदारसंघ किंवा मतदारसंघातले लोक आपलेसे कधीच वाटत नाहीत आणि हेच  मतदारसंघांतल्या  लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल. बऱ्याचवेळी कार्यकर्ते सुद्धा नेत्यांच्या नाशाला कारणीभूत ठरतात, कारण चुकीची माहिती पुरवल्यामुळे  चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्यातूनच त्यांच्यावर नामुश्की ओढवते.         यशस्वी माणसाला काम करण्याची योग्य पद्धती आणि प्रक्रिया माहिती असतेच आणि म्हणूनच अशा माणसाला यशस्वी म्हटलं आहे; पण कित्येक प्रतिनिधींना नेमून दिलेली कामे करण्याची पद्धती आणि प्रक्रिया माहीतच नसते आणि शिकून घेण्याची इच्छाही नसते. प्रतिनिधींच्या अशा गुणांमुळे कित्येक वेळी कामांची सुरवात न होताच कार्यकाळ संपून गेलेला असतो. नेमून दिलेली कामे कशी करावीत आणि ती कोणाकडून  किती वेळात करून घ्यावीत ही माहिती असणं अत्यावश्यक आहे, कारण नवीन काळ पिढी खूपच वेगवान झाली आहे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर कामाची पद्धती आणि प्रक्रिया माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचबरोबर कामाचा वेग वाढला पाहिजे  कारण आताची पिढी दुसरी संधी द्यायला अजिबातच तयार नाही.

 "कॉर्पोरेट " धंदेवाले किंवा काळा पैसा असलेले नेते राजकारणात आपलं आयुष्य अजमावण्याचे प्रयत्न करु इच्छितात. त्यांना आपला धंदा पुढे नेण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी राजकारणाची गरज असते, म्हणून ते राजकारणात गुंतवणूक करतात; गुंतवणूकच म्हणावी लागेल, कारण त्यांना राजकारणातून नफा कमवायचा असतो. त्यांना मतदारसंघातील लोकांशी काहीही देणं-घेणं नसतं. त्यांना राजकारण फक्त धंदा म्हणूनच करायचा असतो म्हणून असे प्रतिनिधी अल्प काळात  राजकारणातून नाहीसे होतात. सक्रिय राजकारणात असलेले नेते बऱ्याच वेळी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावतात  कारण स्वतःवर ताबा नसेल तर चुकीच्या व्यवहारात  गुंतणे हे साहजिक असतं. चुकीच्या वाटेने आलेले पैसे चुकीच्या पद्धतीने वापर होत असतात, बरेच नेते व्यसनाधीन झालेले बघितले आहेत आणि असा नेता कधीही योग्य रीतीने काम करू शकत नाही. यशस्वी नेता आपल्या कामाची पूर्वतयारी करत असतो आणि असं म्हणतात की मागील रात्री माणूस कुठं असतो, त्याच्यावर दुसऱ्या दिवशीच्या कामाची  तीव्रता ठरलेली असते. मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून आलेले प्रतिनिधी चांगल्या आचार आणि विचारांचे असणे आवश्यक आहे.       समाजात विश्वासार्हता गमावलेले बरेच लोक प्रतिनिधी असतात. दिलेला शब्द न पाळणे,  लोकांना वेळ न देणे, समस्या समजून न घेणे,  लोकांना उपलब्ध नसणे, अशा बऱ्याच कारणामुळे विश्वासार्हता गमावलेली असू शकते . जनतेचं आणि प्रतिनिधीचे एक चांगलं नातं आणि बंधन असणं खूप महत्त्वाचं असतं. दोघा घटकांमध्ये विश्वासार्हता नसेल तर मतदारसंघाच्या विकासात अडचणी येऊ शकतात आणि चांगले व लोकहिताचे प्रकल्प रखडले जाऊ शकतात कारण विश्वासाहर्ता नसल्याकारणाने सरकार विषयी आणि नेतेमंडळी विषयी कायम संशय  निर्माण होतं असतो. सरकार नक्कीच काहीतरी चुकीचंच करणार अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली असते,  हेच कारण त्याच्या नाषास होण्यास कारणीभूत ठरते. मतदारांनी  मोठ्या आशेने प्रतिनिधी निवडून दिलेले असतात, पण चुकीचे निकष लावून निवडल्यामुळे त्यांची निराशाच होते. वस्तू खरेदी करताना जसे आपण निकष लावतो तसेच निकष आपण प्रतिनिधी निवडताना लावले पाहिजेत. चांगला प्रतिनिधी निवडून आला तर  तो नेमून दिलेले  काम योग्य पद्धतीने करू शकला नाही तर मतदारांना कायम पश्चात्ताप करावा लागतो. योग्य प्रतिनिधींच मतदारसंघाचा योग्य पद्धतीने विकास साधू शकतो; नाहीतर चुकीच्या नेतेमंडळीमुळे आपल्या देशाचं कायम  नुकसानचं झालेलं आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की  भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काळात आदर्श, विद्वान आणि शिस्तबद्ध राजकारणी होते, पण अशा राजकारण्यांना आता खड्यासारखे टाकून दिले आहे म्हणून चांगले राजकारणी राजकारणात येणे देशहिताचे आहे.