कांगारू टी-२० विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतीक्षेत

ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरच्या खराब फॉर्मचा श्रीलंका उचलणार फायदा?

|
27th October 2021, 11:54 Hrs

दुबई : माजी चॅम्पियन श्रीलंका गुरुवारी आयसीसी टी-२० विश्वचषक सुपर १२ च्या गट ए सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांच्या खराब फॉर्मचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. २०१४ मध्ये श्रीलंकेने विजेतेपद पटकावले होते. परंतु, यावेळी त्यांना क्वालिफायरमध्ये खेळावे लागले. जेथे त्यांनी सर्व तीन सामने जिंकून अव्वलस्थान पटकावले. त्यानंतर सुपर १२ मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पाच विकेट राखून पराभव केला.
दुसरीकडे, अद्याप टी-२० विश्वचषक जिंकू न शकलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे ११९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांची धावसंख्या एकावेळी ३ बाद ३८ अशी होती आणि अखेरच्या षटकात त्यांना विजयाची नोंद करता आली. कर्णधार अॅरॉन फिंचला खातेही उघडता आले नाही, तर काही काळ धावा काढण्यासाठी झगडणारा डेव्हिड वॉर्नर पुन्हा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. मिशेल मार्शची बॅटही चालत नाही.
ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीची नितांत गरज आहे आणि त्यासाठी ते फिंच आणि वॉर्नरवर अवलंबून आहेत. ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या फिरकीपटूंवर मात करायची असेल, तर या दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी केली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळी केल्यास त्याच्या कामगिरीला महत्त्व येईल. फिंचलाही मार्शकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी म्हणजे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत आपला इंडियन प्रीमियर लीगचा फॉर्म कायम ठेवला आहे. गेल्या सामन्यात चार षटकांत एक विकेट घेऊन त्याने कर्णधाराला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण, श्रीलंकेच्या संघाकडे चांगले फिरकीपटू आहेत आणि येथील संथ खेळपट्टीवर धावा काढणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सोपे जाणार नाही.
दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध खेळू न शकलेल्या महिष दिक्षानाचे पुनरागमन संघाचे मनोबल उंचावणारे आहे. लेगस्पिनर वानिंदू हसरंगाची कामगिरीही श्रीलंकेसाठी मोलाची ठरेल. ऑस्ट्रेलियाचे लक्ष त्यांच्या वेगवान गोलंदाजांवर असेल. जोश हेझलवूडने आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जसाठी आपली क्षमता सिद्ध केली. त्याच्यासोबत मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. ऑस्ट्रेलियाने लवकर विकेट घेतल्यास श्रीलंकेवर दडपण येईल. सलामीवीर कुसल परेरा धोकादायक ठरू शकतो. पण, हेझलवूड आणि त्याच्या सहकाऱ्यांची या सामन्यात खडतर कसोटी लागणार आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला चरित अस्लंका, पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांच्याकडूनही चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल. अस्लंकाने गेल्या सामन्यात संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या फलंदाजांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
आजचा सामना
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स