दक्षिण आफ्रिकेने उघडले विजयाचे खाते

वेस्ट इंडीजचा ८ गडी राखून पराभव : उपांत्य फेरीचा मार्ग खडतर


27th October 2021, 12:06 am
दक्षिण आफ्रिकेने उघडले विजयाचे खाते

दुबई : दक्षिण आफ्रिकेने दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या चॅम्पियन वेस्ट इंडीजचा ८ गडी राखून पराभव करत आपले विजयाचे खाते उघडले. आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करत विंडीजला १४३ धावांत रोखले. त्यानंतर हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात १८.२ षटकांत पार केले. या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. दरम्यान, आफ्रिकेकडून मार्कक्रमने आक्रमक (५१) अर्धशतक ठोकले. गोलंदाजीत प्रेटोरियसने भेदक मारा करत १७ धावांत ३ बळी टिपले.
वेस्ट इंडीजने ठेवलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेंबा बामुवा अवघ्या ४ धावांची भर घालून धावबाद झाला. त्यानंतर रिझा हेंड्रिक आणि रासी व्हॅन डेर डुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचत संघाला १० व्या षटकापर्यंत ६० धावा पार करून दिल्या. मात्र, अकैल हुसैनने हेंड्रिंग्जला ३९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
हेंड्रिग्ज बाद झाल्यानंतर आलेल्या एडिन मार्कक्रमने डुसेन बरोबर दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे नेला. मार्कक्रमने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. तर डुसेनने सावध फलंदाजी करत ५१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ८३ धावांचा नाबाद भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजचे १४४ धावांचे आव्हान १८.२ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आफ्रिकेचा हा निर्णय वेस्ट इंडीजची सलामी जोडी लिंडल सिमोन्स आणि एल्विस लुईसने खोटा ठरला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत १० षटकांत ७३ धावांची सलामी दिली. यात लुईसने ३५ चेंडूत ५३ धावा ठोकून मोठा वाटा उचलला. मात्र, पुढच्या १० षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत विंडीजचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडण्यास सुरुवात केली. केशव महाराजने लुईस आणि पुरनला बाद करत दोन धक्के दिले. त्यामुळे विंडजची अवस्था बिनबाद ७३ धावांवरून २ बाद ८७ धावा अशी झाली.
केशव महाराज नंतर प्रेटोरियसने भेदक मारा करण्यास सुरुवात केली. त्याने ख्रिस गेल (१२), कायरन पोलार्ड (२६) हायडेन वॉल्श (०) अशा तीन विकेट घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याला नॉर्खिया आणि रबाडानेही चांगली साथ देत प्रत्येकी एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या या सामुहिक कामगिरीमुळे विंडीजचा डाव २० षटकांत ८ बाद १४३ धावांवर आटोपला.

वेस्ट इंडिजचे उरलेले सामने आता बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजला आता उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असलेली वेस्ट इंडिज पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या क्रमांकावर आहे.