किटला मारहाण; जखमी अश्विनचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th October 2021, 11:36 Hrs
किटला मारहाण; जखमी अश्विनचे निधन

म्हापसा : किटला - हळदोणा येथील अश्विन बेंजामिन आलेमाव (२२, किटला) या मारहाण जबर जखमी झालेल्या युवकाचे गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाले. म्हापसा पोलिसांनी पाचही संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा आता खून म्हणून नोंद करण्यासाठी पोलिसांनी येथील प्रथमवर्ग न्यायालयाकडे परवानगी अर्ज सादर केला आहे.      

   या प्रकरणी पोलिसांनी सलिक बेपारी (हळदोणा), हेन्सल डायस, ज्योविटो कुतिन्हो (दोघेही किटला), वेलांसिओ फेरिया व अँडरसन डिसोझा (पोंबुर्फा) यांना भा.दं.सं.च्या ३४१ व ३०७ कलमांखाली गुन्हा नोंदवून अटक केली होती.      

   मैत्रिणीवरून झालेल्या वादातून हा मारहाणीचा प्रकार शनिवारी मध्यरात्री १.३०च्या सुमारास घडला. या प्रकरणी मयत अश्विनचा भाऊ ऑल्विन आलेमाव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.      

अश्विन व संशयित सलिक बेपारी यांच्यात मैत्रिणीवरून वाद होता. घटनेच्या दिवशी सलिक अश्विनला घेऊन किटला येथे मानसीवर गेले होते. तेथे त्यांच्यात वाद होऊन प्रकरण मारहाणीवर आले. त्यानंतर संशयितांनी अश्विनला त्याच्या मैत्रिणीच्या घराजवळ नेले आणि तेथे जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे अश्विन घटनास्थळीच बेशुद्धावस्थेत पडला होता. नंतर त्याला उपचारार्थ गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री अश्विनचे निधन झाले.      

  मंगळवारी सकाळी अश्विनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले व त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.      

 जखमी अश्विनचे निधन झाल्यामुळे हा आता खुनाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात भा.दं.सं.चे  ३०२ कलम जोडण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर करीत आहेत.