वानखेडेंची दिल्ली येथे दोन तास चौकशी

एनसीबीचे पथक आज मुंबईत; अनेक अधिकारी रडारवर


26th October 2021, 10:13 pm
वानखेडेंची दिल्ली येथे दोन तास चौकशी

वानखेडेंची दिल्ली येथे दोन तास चौकशी
एनसीबीचे पथक आज मुंबईत; अनेक अधिकारी रडारवर
नवी दिल्ली ः
मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मंगळवारी एनसीबीच्या दिल्लीतील मुख्यालयात पोहोचले. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून जवळपास दोन तास चौकशी केली गेली. समीर वानखेडेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी तपासासाठी एनसीबीचे दक्षता पथक बुधवारी मुंबईत दाखल होणार आहे.
एनसीबीचे दक्षता प्रमुख ग्यानेश्वर सिंह हे या पथकासोबत असतील. हे पथक बुधवारपासून तपासाला सुरुवात करणार आहे. यावेळी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या इतर अधिकार्‍यांचीही चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमली पदार्थप्रकरणी मुंबईत क्रूझवर मीर वानखेडे यांनी छापा टाकला होता. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टाचा आता बुधवारी निकाल येऊ शकतो.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी कोट्यवधींची डील झाल्याचा आरोप साक्षीदार प्रभाकर साईलने केला आहे. यांनाही यातील ८ कोटी रुपये देण्यात येणार होते, असा दावा प्रभाकर साईलने रविवारी केला होता. आर्यन खानला सोडण्यासाठी एनसीबीच्या अधिकार्‍याने आणि इतरांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप आहे. या आरोपांप्रकरणी एनसीबीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रॅली काढणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. वानखेडे दलित समाजाचे आहेत आणि नवाब मलिक जाणूनबुजून त्यांची बदनामी करत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.  नवाब मलिकांच्या या आरोपांना स्वत: समीर वानखेडे, त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, हैनिक बाफना यांनी पालघर पोलीसस्थानकावर प्रभाकर सैलविरुद्ध बदनामीची तक्रार दाखल केली आहे. आपला फोटो वापरून सैल आपला संबंध या केसशी जोडू पाहत आहे व आपली नाहक बदनामी करत असल्याची तक्रार बाफना यांनी केली आहे.


बनावट प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणारे निनावी  पत्र
समीर वानखेडे यांनी २६ बनावट प्रकरणांमध्ये अनेकांना अडकवल्याबद्दल त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे एक निनावी पत्र प्राप्त झाल्याचे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले. पण, एनसीबीने असे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे म्हटले आहे.


असे कुठलेही निनावी पत्र आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे, त्याची चौकशी करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तसे कुठले पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी चौकशी करू.
- मुथा अशोक जैन,
उपमहासंचालक, एनसीबी


हेही वाचा