गोव्याची लोकधारा

गोमंतकीय समाजजीवन आणि लोकसंस्कृतीचे सचित्र दर्शन घडविणारे, 'विस्मृतीच्या उंबरठ्यावर' या त्यांच्या पुस्तकातील मजकूर, 'गोव्याची लोकधारा' या मथळ्याखाली अनेक भागांतून माहितीपट स्वरुपात प्रदर्शित करीत, गोमंतकीय लोकसाहित्याचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या प्रा. पौर्णिमा केरकर यांच्या युट्यूब चॅनेलविषयी...

Story: युट्यूबची जादूगिरी । स्नेहल कारखानीस |
23rd October 2021, 11:38 pm
गोव्याची लोकधारा

लोक आणि साहित्य या दोन पदांच्या संयोगाने तयार झालेला शब्द म्हणजे लोकसाहित्य. जे साहित्य मौखिक असते, ज्याला सहजरित्या कलारूप प्राप्त झालेले असते, सामुहिक समाजमन घेऊन; जे परंपरागत आविष्कृत झालेले असते, ते म्हणजे लोकसाहित्य. या लोकसाहित्यातून लोकजीवन अभिव्यक्त होत असल्यामुळे ते लोकांच्या जीवनाचाच एक भाग बनलेले असते. लोकसाहित्यात अनुभवाचे बोल असतात. हे साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणूनच आलेले असते. नवीन पिढी या महत्त्वपूर्ण वारशापासून अलिप्त होत चालली आहे. त्यांच्यापर्यंत लोकमानसाची निसर्गसन्मुख जीवनशैली पोहोचवायला हवी. हा वारसा निरक्षरांचा जरी असला तरी तो कलात्मक असतो आणि म्हणूनच या लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, हा लोकसाहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सिद्धहस्त लेखिका प्रा. पौर्णिमा केरकर यांनी सुरु केलेला युट्यूब चॅनेल सर्वांसाठी जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल असाच आहे.

२०१९ च्या डिसेंबर मध्ये प्रकाशित झालेले, 'विस्मृतीच्या उंबरठ्यावर' हे गोमंतकीय लोकसंस्कृतीतील विस्मृतीत गेलेल्या, विस्मृतीच्या उंबरठ्यावर असलेल्या, वस्तूंविषयीचे प्रा. पौर्णिमा केरकर यांचे एक संशोधनात्मक पुस्तक. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील 'वस्तूसंस्कृती' वर आधारित सदर लोकसाहित्यावरील संशोधनात्मक पुस्तकात प्रा. केरकर यांनी गोव्याचा सामाजिक, सांस्कृतिक अंगाने विचार केलेला आहे. "करोनाच्या संक्रमणामुळे आणि एकंदरीत लॉकडाऊनमुळे हे पुस्तक म्हणावे तसे लोकांपर्यंत पोहोचले नाही. परंतु या पुस्तकातील मजकूर जशाचा तसा माझ्या परवानगीशिवाय युट्यूब चॅनेलसाठी वापरला जाऊ लागला ही गोष्ट माझ्या विद्यार्थिनीच्या लक्षात आली आणि तिनेच मला माझा युट्यूब चॅनल सुरु करण्याविषयी सांगितले." अशी भावना व्यक्त करणाऱ्या लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासिका प्रा. पौर्णिमा केरकर यांनी आपल्या युट्यूब चॅनलद्वारे गोमंतकीय लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले आहे.

गोव्याची प्रतिमा नेहमीच समुद्रकिनारे, पब, पार्ट्या, दारू, जुगार यांच्याशी जोडली जाते. मुळात आपला गोमंतक असा नसून गोव्याला वैभवशाली लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. गोव्याची नाळ लोकसंस्कृतीशी जोडलेली आहे. लोकसमूहाचे आचार-विचार, सुख-दुःख, रीती-रिवाज, लोकसंस्कृतीतूनच उगम पावतात. आपल्या भावभावनांची उत्स्फूर्त वाणी गात, ऐकत, पिढ्यानपिढ्या आपल्या अनुभवांचा वारसा आपलेपणाने जपतात. हा आपलेपणा लोकसाहित्याचा आत्मा असतो. लोकसाहित्य हे लोकांच्या जगण्याचाच एक भाग असल्यामुळे, जगण्याचा जेथे-जेथे म्हणून संबंध येतो, त्या सर्व गोष्टी लोकसाहित्यात श्रद्धास्थानी असतात. श्रद्धा मनुष्याच्या जगण्याला बळ देते; या विश्वासावरच लोकांचे जगण्याचे विश्व उभे असते. लोकसाहित्य सतत प्रवाही असते. ते बदलत असते. हा बदल व्यक्ती, स्थळ, काळपरत्वे घडत असतो. आणि म्हणूनच काळाबरोबर आपली संस्कृती लुप्त होऊन नये, या उद्दिष्टांतून सदर युट्यूब चॅनल कार्यरत आहे.

गोमंतकीय लोकसंस्कृतीत सातत्याने दिसणारी पारंपरिक फुगडी, धालो, शिगमो आणि त्याचप्रमाणे सारन (झाडू), जाते ,दवली माण, चूल ,आटो(झोपाळा),  इत्यादी लोक समूहातील रोजच्या उपयोगातील वस्तू, त्यांच्याशी निगडित लोकगीते, या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व वस्तूंची माहिती, त्यांच्याशी निगडित गीतांची माहिती, त्या वस्तूंचे लोकजीवनातील स्थान आणि लोकांनी जिवापाड जपून ठेवित, या वस्तूंना दिलेला सन्मान याविषयी प्रा. केरकर स्वतः आपल्या निवेदनातून माहितीयुक्त गोष्टी सांगतात. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचा उपयोग लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच होईल.

या युट्यूब चॅनेलवरील 'गोव्याची लोकधारा' या भागांचे निवेदन स्वतः पौर्णिमा केरकर यांनी केले असून, यासाठी लागणारी वेशभूषा व दिग्दर्शन शुभदा च्यारी करते; तर संपादन- सानिष अवखळे; कॅमेरा- गजानन शेट्ये; विठ्ठल शेळके, विठोबा गावडे, तसेच ग्राफिक्स- रोहित नारुलकर, संस्कृती नाईक असे सर्व जणांनी आपापली कामे चोख पार पाडली आहेत. एक आगळा वेगळा पारंपरिक गोमंतक सर्वांच्या निदर्शनास आणण्याचे आवाहन स्वीकारत, लोकसाहित्याचे वेगवेगळे घटक उलगडून दाखवीत, प्रा. केरकर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वैभवसंपन्न गोमंतकाच्या रुपाचे दर्शन लोकांना घडवतात. 

"युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणे ही संकल्पना खूप सुंदर आहे. पण प्रत्यक्षात काम करताना त्यातील अडचणी लक्षात येतात.  या युट्यूब चॅनेलसाठी कोणताही प्रोफेशनल कॅमेरामन, प्रोफेशनल एडिटर नाही. आमची मुलेच ही कामे उमेदीने करतात आणि एकदा व्हिडिओ प्रदर्शित झाला की रसिकांची दाद पाहून मनाला खूप आनंद होतो." आपल्या युट्यूब चॅनलविषयी असा अभिप्राय देणाऱ्या प्रा. पौर्णिमा केरकर यांनी व्हिडिओ स्वरूपात आपल्या युट्यूब चॅनलच्याद्वारे जो माहितीचा खजिना जमा केला आहे, त्याला तोड नाही. गोव्याची लोकधारा या मथळ्याखाली प्रदर्शित केलेल्या या सर्व व्हिडिओंना एक हजार पेक्षा अधिक दर्शक लाभले असून, एका वर्षाच्या कालावधीत दोन हजार पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. प्रा. केरकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने प्रत्यक्षात आणलेली ही संकल्पना खरोखरच उल्लेखनीय आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्रा. पौर्णिमा केरकर यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा.

https://youtube.com/c/PournimaKerkar