निवडणु ‘का’

गोव्यात खनिज पट्ट्यात म्हटले जाते - सकाळी बाहेर निघालेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परतणार ह्याची कोणतीच हमी नाही. तसेच आता पॉलिटिकल पार्ट्यांचे झालेय. सकाळी अमुक पार्टीत असलेला माणूस रात्री त्याच पार्टीत असेल ह्याची काहीच हमी नाही.

Story: आदित्यचा चष्मा । आदित्य सिनाय भांगी स |
23rd October 2021, 11:26 Hrs
निवडणु ‘का’

जशा निवडणुका जवळ येतात, तसे तुम्हाला काही कार्यक्रम, सण असले की ठिकठिकाणी शुभेच्छा संदेश देणारे फलक मिळणार. त्या फलकावर त्या व्यक्तीचा फोटो व खाली लिहिलेले असते समाजसेवक. म्हणजे तो त्या भागातला पुढचा उमेदवार हे निश्चितच असे समजा. कदाचित तुम्ही कधी नाव सुद्धा ऐकलेले नसेल पण तो स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो. समाजसेवक असताना त्याने एक वेळ खूप कामे केलेली असतील, पण निवडून आल्यावर तो काम करणारच ह्याची काहीच हमी नाही. जशी पाऊस पडल्यावर अळंबी येतात तसे नेते तयार होतात. गोव्यात खनिज पट्ट्यात म्हटले जाते - सकाळी बाहेर निघालेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परतणार ह्याची कोणतीच हमी नाही. तसेच आता पॉलिटिकल पार्ट्यांचे झालेय. सकाळी अमुक पार्टीत असलेला माणूस रात्री त्याच पार्टीत असेल ह्याची काहीच हमी नाही. जशा निवडणुका जवळ येतात तसे आपण पक्ष बदलणाऱ्यांना म्हणू शकतो - 'अभी तो 'पार्टी' शुरू हुई है।' पण 'पार्टी अभी बाक़ी है ' म्हणू शकत नाही, हळूहळू सर्वजण सोडून गेलेत तर? काही पक्षांची शोले फिल्मसारखी स्थिती झालीय - "आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाक़ी मेरे पीछे आओ!" तर कधी कधी यांना सांगावसं वाटतं, 'इतनी बार भी पार्टी न बदलें कि आप ख़ुद भूल जाएँ कि फ़िलहाल किस पार्टी में हैं!"

व्हॉट्सएपवर एक मॅसेज आला होता - कार्यकर्त्यांनो सकाळी उठल्यावर प्रचार करण्यापूर्वी आपला नेता त्याच पक्षात आहे का याची खात्री करून मगच प्रचाराला सुरुवात करावी. जो कुणी इतक्या वर्षे एखाद्या नेत्याचा जवळचा व विश्वासू होता, तोच कधी 'कट्टप्पा' बनणार माहीत नाही. कधी-कधी उमेदवाराला असे वाटते की माझ्यासोबत जास्त लोक आलेयत म्हणून मीच जिंकणार. पण त्याला कुठे ठाऊक, ते लोक एकच असतात म्हणून? माझ्या घरी एकजण आला होता प्रचाराला, त्याच्यासोबत खूप लोक. मग तीन दिवसांनी तेच लोक दुसऱ्या उमेदवारासोबत आले होते. आता हे लोक कुठल्या पक्षात आहेत ते विचारू नका. कारण इकडे उमेदवाराच्याच पक्षाची काही गॅरंटी नाही की तो कुठल्या पक्षात आहे. मग सामान्य माणसांचे काय सांगणार!!?? सामान्य माणसांचे असे असते - "वारें येता तशें सुप धरप " किंवा "जिथे खोबरं तिथे उदो उदो " काही वर्षांपूर्वी माझ्या घरी एक नेता आला व म्हणाला मी राहिलोय, मत मलाच द्या. नाव काय तुझे? विकास. काम काय करणार? विकास करणार. विकास म्हणजे Development व Development म्हणजे विकास. ह्या शिवाय त्याला काहीच बोलता आलं नाही.

काही मतदार फार हुशार असतात. ते पैसे सर्वांकडून घेणार पण मत मात्र पाहिजे त्यालाच देणार. ते म्हणतात आमचेच पैसे आहेत, मी का नको घेऊ? काही लोक चिकन-मटण, व्हिस्कीचा आनंद घेतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी 'भानावर' येऊनच मतदान करतात.

आधी शाळेत आम्ही तळ्यात-मळ्यात खेळायचो. मला वाटत होते शाळेत जे शिकविले जाते त्याचे प्रॅक्टिकल फक्त फुंसुक वांगडू करतो, आमचे नेते तर रोज करतात. मोती साबणाच्या जाहिरातीप्रमाणे म्हणायचे तर - "चला चला संध्याकाळ झाली, पक्ष बदलण्याची वेळ आली". तसे पक्ष बदलणे सोपे काम नव्हे. घरातील कॅलेंडर, फोटो, घरा बाहेरील झेंडे बदलायला पडतात. खिडक्यांची ग्रिल जर पार्टी चिन्हाची केलेली आहेत तर मग ते 'रिनोव्हेट' करावे लागते. टी शर्ट, टोपी (त्यांचीच नव्हे, सर्व पार्टींची) व खूप काही बदलावे लागते. सोशल मीडियावर टाकलेले प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो बदलावे लागतात, कुणासोबत टॅग केलेले फोटो आहेत तर ते काढावे लागतात. वेळ मिळाला तर आधीचे स्तुती करणारे पोस्ट काढावे लागतात. मग नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना खूश करावे लागते. एक समस्या आहे, जर कोणत्याही पार्टीचा कायमस्वरूपी टॅटू बनवलेला आहे तर तो काढायला मिळत नाही! म्हणून आजकाल सगळे वरच्यावर आहे. कॉलेजमध्ये 'सॅमिस्टर चेंज सिलेबस चेंज' प्रमाणे कधी-कधी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड पण बदलतात. पण पक्षांतर त्याच्यापेक्षा जलद गतीने होते. मोबाईल नंबर पोर्टिंगप्रमाणे हे पक्षांतर चालते. म्हणजे लिमिट नसते. ह्याचा रिकॉर्डे ठेवायला एक हजेरीसाठी पान ठेवलेले बरे, पार्टीचे नाव नमूद न करता. प्रत्येक दिवशी कुठल्या पार्टीत आहोत ते स्वतः त्या नेत्याने लिहावे. (जर त्याला स्वतः माहीत असेल तर)

काही लोकांचे, कुणी नेत्याने कितीही जरी फसवणूक केली, चोप दिलाय, त्रास केलाय तरी ते त्यांनाच मत देणार, असे असते. गोव्यातसुद्धा काही ठरावीक ठिकाणे अशी आहेत जिकडे कितीही मोठा उमेदवार विरोधात उभा केला, तरी तो निवडून येणार नाही. जेव्हा कुणी उमेदवार स्वतःच्याच पार्टीशी निष्ठावंत नाही, तेव्हा तो तुमच्याशी निष्ठावंत राहणार हे कसे तुम्ही निश्चित करू शकता?

परीक्षेत करंट पॉलिटिक्सवर प्रश्न विचारायलासुद्धा भीती वाटते आता. कारण पेपर सेट करताना अमुक नेता अमुक पक्षात. मग विद्यार्थी पेपर लिहिताना दुसऱ्या पक्षात. पेपर तपासला जात असताना तिसऱ्या पक्षात व जेव्हा परीक्षेचा निकाल येणार तेव्हा चौथ्याच पक्षात. एकाद्या फिल्मच्या गाण्यामध्ये जसे अभिनेता-अभिनेत्री कपडे बदलतात तसे आजकालचे नेते पक्ष बदलतात. पक्षांतर न केलेला नेता शोधण्यास खूप कठीण आहे. मोजून काही जे फॅक्टरी डिफॉल्ट नेते असतात तेच पक्षांतर करत नाहीतर अन्यथा सर्व नेत्यांचे व्हर्जन बदलत असतात.

अलीकडेच गोव्याच्या एका प्रसिद्ध व्यक्तीने म्हटलेय की पुढच्यावेळी अमुक व्यक्तीच प्रधानमंत्री होणार. हे ऐकून एक तर तो झोपेत होता किंवा 'कौन-सा नशा करते हो भाई' असं म्हणायची पाळी येते. काही नेते फक्त ५ वर्षातून एकदा मतदारांच्या घरी येतात अन्यथा ते कधीही दिसत नाहीत. काही पार्ट्या अशा प्रकारे आपला बॅनर लावतात की ते प्रचार करतात की स्वतःचीच बदनामी करतात हे समजत नाही. एका पार्टीच्या नेत्याने आपल्या ब्रोशरवर लिहिले होते – I am married with 2 school going children. काही पार्टी असा बॅनर लावतात की तो पाहून ते हॉटेलमध्ये रूमात काला जादू करणाऱ्या बाबांची आठवण येते. हम कहते नहीं करके दिखाते हैं!

दर वर्षी निवडणुकांपूर्वी अचानक चमकणारा विकास पाहून असे वाटतेय की दरवर्षी निवडणुका घेतलेल्या बऱ्या. रस्त्यांच्या बाबतीत तरी हे खरेच आहे. दरवर्षी निवडणुका घेतल्या तरच आम्हाला चकाचक रस्ते मिळणार. काही नेत्यांना कामापूर्वीच आपल्या नावाचा फलक लावायची सवय असते. मग फलक वर्षानुवर्षे तिथेच घाण होतात पण प्रकल्पाचा पहिला चिरासुद्धा कुठे दिसत नाही. नंतर असे फोटो हमखास वर्तमानपत्रात येतात. तर काही नेते काम करून जातात पण त्यांचे नाव कुठेच दिसत नाही. काही प्रकल्प अशा स्थानी बनविले जातात की मग त्याचा कुणीच वापर करत नाहीत व मग तो पांढरा हत्ती बनतो. कदाचित एकही नेता असा नाही जो आधी लठ्ठ होता मग बारीक झालाय. सर्व बारीक नेते जिंकून आल्यावर लठ्ठच होतात. कारण ते खूप ‘काम’ करतात व ‘खातात’ ना! एकाच दिवशी अनेक ठिकाणी त्यांना बोलवले जाते मग सगळीकडे थोडे-थोडे खावेच लागते ना! जाऊन काय सांगणार की माझा दीक्षित डायट चाललाय?

तसं आता मतदान केल्यानंतर शाईसुद्धा पूर्वी इतकी शक्तिशाली राहिली नाही. ती सुद्धा लगेच जायला लागते. तसे जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत गोवा विधानसभेत ३५०+ सीटे आहेत असे आपण म्हणू शकतो. कारण उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार म्हणतो की मीच जिंकणार. मग निकाल लागल्यानंतर कळतो २१ सुद्धा येणे मुश्किल झालंय म्हणून. तसा काहीच विकल्प नाही तर लोक आता नोटा दाबून येतात. चला आता निवडणुका जवळ येतायत . तुम्ही विचार करून मतदान करा. नाहीतर तुमचे ‘मत’ कुठे ‘दान’ होतील याचा काहीच भरवसा नाही!