विजयाचा षटकार मारण्यास टीम इंडिया उत्सुक

टी-२० वर्ल्डकप : भारत विरुद्ध पाकिस्तान आज हाय व्होलटेज सामना

|
23rd October 2021, 11:15 Hrs
विजयाचा षटकार मारण्यास टीम इंडिया उत्सुक

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपमधील लढतीची प्रतीक्षा आता संपत आली आहे. रविवार, २४ ऑक्टोबर रोजी ही हाय व्होलटेज लढत होणार आहे. एका बाजूला भारताचा कर्णधार विराट कोहली तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या दोघांत नेतृत्वाची लढाई असेल. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने याआधी पाचही लढतीत पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता यावर्षी विजयाचा षटकार मारण्यात भारतीय संघ उत्सुक असेल आणि चाहत्यांची देखील तशीच इच्छा असेल.
दरम्यान, भारत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीच पराभूत झालेला नाही. टी-२० वर्ल्डकपमध्ये तर पाच वेळा त्यांना पराभूत केले आहे. अशात विराटला हा इतिहास कायम ठेवण्याचे आव्हान असेल तर बाबरला आजवर जे शक्य झाले नाही ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. या दोन्ही संघांत फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये लढत होत असल्याने या लढतीची उत्सुकता देखील वाढली आहे.
विराटचे पाकिस्तान संघाबाबत मत
या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच दाखवू. विराटने पाकिस्तान संघ आणि त्यांच्या काही खेळाडूंना मजबूत मानले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी संघाची घोषणा करण्यास असहमती दर्शवली आहे. या संदर्भात तो म्हणाला, मी सध्या माझ्या प्लेइंग इलेव्हनबद्दल खुलासा करणार नाही. पण आमचा संघ खूप संतुलित आहे.
पाकिस्तानच्या प्लेईंग-११ची घोषणा
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यासाठी १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान भारताविरुद्ध सलामीला येतील. फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यानंतर अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज चौथ्या क्रमांकावर आणि शोएब मलिक पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील. स्फोटक फलंदाज आसिफ अली, अष्टपैलू इमाद वसीम आणि शादाब खान फिनिशरची भूमिका साकारतील. दुसरीकडे, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी वेगवान गोलंदाजी विभागात दिसतील.
पाकिस्तान संघ : बाबर आझम ( कर्णधार), असिफ अली, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
...........
टी-२० मधील रेकॉर्ड
विराट कोहली
सामने - ४५
विजय - २७
पराभव - १४
टाय - २
निकाल नाही - २
विजयाची टक्केवारी - ६५.११
बाबर आझम
सामने - २८
विजय - १५
पराभव - ८
टाय - ०
निकाल नाही - ०
विजयाची टक्केवारी- ६५.२१
...............
आजचा सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान
स्थळ : दुबई अंतरराष्ट्रीय स्टेडियम
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क