विंडीजचे शेर पहिल्याच सामन्यात ढेर

इंग्लंडचा ६ गडी राखून विजय


23rd October 2021, 11:14 pm
विंडीजचे शेर पहिल्याच सामन्यात ढेर


दुबई : इंग्लंडने गतविजेत्या वेस्ट इंडीजचा ६ गडी राखून पराभव करत टी-२० विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. वेस्ट इंडीजने इंग्लंडसमोर ५६ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, ते पार करतानाही इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. अखेर जोस बटलरने २२ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी करत ९ व्या षटकात सामना जिंकून दिला. विंडीजकडून डावखुरा फिरकी गोलंदाज हुसैनने २४ धावांत २ विकेट घेत इंग्लंडला सहजासहजी सामना जिंकू दिला नाही.
वेस्ट इंडीजने ठेवलेल्या ५६ धावांचे माफक आव्हान पार करतानाही इंग्लंडला घाम फुटला. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ३ षटकांत २१ धावा करून चांगली सुरुवात केली. ही जोडी बिनबाद ५६ धावा करले असे वाटत असतानाच रामपालने जेसन रॉयला ११ धावांवर बाद केले.
सलामी जोडी फुटल्यानंतर इंग्लंडच्या पुढच्या फलंदाजांची अकायल हुसैनच्या डावखुरी फिरकी गोलंदाजीवर पुरती धांदल उडाली. त्याने जोनी बेअरस्टोला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला मोईन अली ३ धावांवर धावबाद झाला. तर लिम लिव्हिंगस्टोनचा हुसैनने आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेत त्याला १ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे बिनबाद २१ धावांवरून इंग्लंडची अवस्था ४ बाद ३९ अशी झाली. दरम्यान, जोस बटलर एका बाजूने तग धरून होता.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सने इव्हिन लुईसला बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. मॉर्गनने विकेटचा नूर पाहून पॉवर प्लेमध्येच मोईन अलीकडे चेंडू सोपवला. त्यानेही लिंडन सिमन्सला ३ धावांवर बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर ख्रिस गेल आणि शिमरोन हेटमायरने सावध फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोईन अलीने हेटमायरला ९ धावांवर बाद करत विंडीजच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. पॉवर प्ले संपायच्या आतच टायमल मिल्सने विंडीजचा स्टार टी २० फलंदाज ख्रिस गेलला १३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ड्वेन ब्रोव्होही अवघ्या ५ धावांची भर घालून जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
७ षटकांत ५ बाद ३७ धावा अशी दयनीय अवस्था झालेल्या विंडीजला सावरण्यासाठी कर्णधार कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी सुरुवात केली. मात्र, टायमल मिल्सने पूरनला १ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाठोपाठ आदिल रशीदने आंद्रे रसेल (०), कायरन पोलार्ड (६) आणि ओबेड मॅकोयला (०) यांना आल्या पावली माघारी पाठवले. यामुळे विंडीजची अवस्था १३ व्या षटकातच ९ बाद ४९ अशी झाली. अखेर हुसैन आणि रवी रामपाल या अखेरच्या जोडीने विंडीजचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र, या दोघांनाही संघाच्या धावसंख्येत ६ धावांपेक्षा अधिक धावा जोडता आल्या नाहीत. विंडीजचा संपूर्ण डाव १४.२ षटकांत ५५ धावांत संपुष्टात आला.

टी-२० सामन्यात विंडीजच्या पाचव्यांदा कमी धावा
४५ वि इंग्लंड (मार्च २०१९)
५५ वि इंग्लंड (ऑक्टोबर २०२१)
६० वि पाकिस्तान (एप्रिल २०१८)
७१ वि इंग्लंड (मार्च २०१९)
७९/७ वि झिम्बाब्वे (फेब्रुवारी २०१०)

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : १४.२ षटकांत सर्वबाद ५५ धावा
इंग्लंड : ८.२ षटकांत ४ बाद ५६ धावा