तृणमूल नेते दोन मंत्र्यांच्या संपर्कात!

तीन पक्षांच्या आघाडीची मोर्चेबांधणी सुरू; ममता आल्यानंतर घडामोडींना वेग

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd October 2021, 11:58 pm
तृणमूल नेते दोन मंत्र्यांच्या संपर्कात!

पणजी : राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केलेल्या तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजप सरकारातील दोन मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. या दोन्ही मंत्र्यांसह त्यांच्या विश्वासू आमदारांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणून पक्षाला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न तृणमूलच्या नेत्यांकडून सुरू आहे. यासंदर्भात या दोन्हीही मंत्र्यांशी त्यांनी नुकतीच बैठक घेतल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या दोन मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे, ते दोन्ही मंत्री मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा बाळगून आहेत. आपल्यासोबत भाजपच्या सहा ते सात आमदारांना घेऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. आपला पक्ष तसा ठेवून इतर दोन आमदारांना घेऊन तृणमूलमध्ये जाणार असलेल्या एका प्रादेशिक पक्षाचा अध्यक्ष आणि मगोपच्या नेत्यांसोबतही या मंत्र्यांची चर्चा सुरू आहे. तृणमूल, मगो आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करून भाजपविरोधात उतरण्याची मोहीम या सर्वांनी मिळून आखलेली आहे. तृणमूलच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात आल्यानंतर यासंदर्भातील घडामोडींना वेग येईल, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे.
ममता बॅनर्जी २७ किंवा २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात येत आहेत. तत्पूर्वी २५ रोजी तृणमूल काँग्रेसतर्फे एका स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात एका प्रादेशिक पक्षाचे तीन आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी गोव्यात आल्यानंतर पुढील रणनितीसंदर्भात दोन मंत्री आणि त्यांच्या विश्वासू आमदारांची त्यांच्याशी बैठक होईल. त्यानंतर संबंधित मंत्री, आमदारांचा तृणमूलमध्ये कधी प्रवेश होईल, यासंदर्भातील स्पष्टता मिळेल.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसने सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना गळाला लावल्यानंतर इतर मंत्री आणि आमदारांना पक्षात आणण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छूक मंत्री तसेच भाजपला कंटाळलेल्या आणि येत्या विधानसभा ​निवडणुकीत उमेदवारी मिळू न शकणाऱ्या भाजप आमदारांना तृणमूलमध्ये आणून पक्षाला बळकटी देण्यासोबतच उमेदवारांची निश्चिती करण्यावर तृणमूलचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन आणि लुईझिन फालेरो भर देत आहेत. तर तृणमूलच्या निवडणूक रणनितीची जबाबदारी खांद्यावर असलेले प्रशांत किशोर कोणालाही सुगावा लागू न देता गोव्यात येऊन नाराज मंत्री, आमदारांशी चर्चा करीत आहेत.
दरम्यान, प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन विविध मतदारसंघांतील काँग्रेस कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणण्याची योजना लुईझिन फालेरो यांनी आखली आहे. वाळपई गट काँग्रेस समिती फोडून आणि तेथील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांना तृणमूलमध्ये आणून फालेरो यांनी सुरुवातही केली आहे. पुढील दोन महिन्यांत दोन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदारसंघांतील काँग्रेस गटसमित्यांचे नेते आणि कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती काँग्रेसमधीलच सूत्रांकडून मिळाली आहे.

पारडे जड करण्यासाठी प्रयत्न सुरू
- गेल्या काही महिन्यांत भाजप सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांवरून जनतेत नाराजी पसरली आहे. त्यातच पक्षाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने भाजपतर्फे मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छुक असलेल्या दोन मंत्र्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये येऊन आपले स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तृणमूल काँग्रेसने याआधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपच्या अधिकाधिक आमदारांना फोडून आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न या दोन्ही मंत्र्यांकडून सुरू असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

काँग्रेसला तृणमूल पर्याय बनवण्याचे प्रयत्न
पुढील काही दिवसांत तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले बहुतांशी नेते मूळ काँग्रेसचे आहेत. २०१७ मध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेत आलेल्या अपयशाचा दावा करीत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने या फुटीरांपैकी एकाही​ आमदाराला पुन्हा पक्षात घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फुटीर आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसला पर्याय असल्याचा संदेश मतदारांना देण्याच्या प्रयत्नांत आहेत, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.