मराठी साहित्यात प्रादेशिकतेचा प्रवाह सुरु करणारे कथाकार : वि.स.सुखठणकर

‘आंतर्भेदी प्रतिभेचे वरदान असल्याखेरीज प्रादेशिक चित्रणाला वैशिष्ट्यपूर्ण साहित्यरुप येत नाही’ असे सांगून ‘माती आणि माणूस’ यांच्या अतूट अनुबंधाचे सा-या चैतन्य कळांसह चित्रण करण्याची क्षमता सुखठणकरांमध्ये होती म्हणून आजही ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या संग्रहातील कथांमधून रसरशीत परिसर चित्रणाचा प्रत्यय येतो

Story: लोकमुद्रा । डॉ. विद्या प्रभुदेसाई |
16th October 2021, 10:45 pm
मराठी साहित्यात प्रादेशिकतेचा प्रवाह सुरु करणारे कथाकार : वि.स.सुखठणकर

गोमंतकातील ऐतिहासिक आणि राजकीय घटनांचा परिणाम अपरिहार्यपणे गोमंतकाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर झाला. गोमंतकीय साहित्यातून अशा जीवनाचे संदर्भ जागोजागी पाहता येतात. मराठी कथनात्मक साहित्यात ह.ना. आपटेंच्या प्रभावातून पुढे आलेली एक साहित्यिकांची  पिढी वास्तव जीवनातील संदर्भ घेऊन सामाजिक प्रश्न आपल्या साहित्यातून अधोरेखित करु लागली होती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोमंतकीय कथाकार वि.स. सुखठणकरांनी तर हे सामाजिक प्रश्न प्रादेशिक परिप्रेक्ष्यात मांडून मराठी साहित्याला एक नवी दिशा दिली. गोमंतकीय कथाकार वि.स.सुखठणकर यांनी ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ हा गोमंतकाची सामाजिक सांस्कृतिक ओळख करुन देणारा एकच कथासंग्रह प्रसिद्ध करुन मराठी साहित्यात एक नवा प्रवाह आणला.  

वास्तविक सुखठणकरांनी ‘कटु कर्तव्य’ ही पहिली कथा इ.स.१९२६ मध्ये लिहिली असली तरी त्यानंतर लिहिलेल्या आठ कथा एकत्रित करुन इ.स.१९३१मध्ये त्यांनी ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या नावाने मराठीतील पहिला प्रादेशिक  कथांचा संग्रह प्रकाशित केला. मुंबई येथील धृव प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर अगदी ठळक अक्षरात ‘आठ स्वतंत्र प्रादेशिक कथा’ असेही छापले आहे. स्वत: सुखठणकरांनी या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीला ‘आजचे आणि कालचे गोमंतक’ असे यथार्थ उपशीर्षकही दिले होते.  एकुणच मराठी कथासाहित्यात यापूर्वी प्रादेशिक चित्रणे आली असली तरी कथावस्तू अशा ‘प्रादेशिकतेच्या’ संकल्पनेतून अवतरली नव्हती. त्यामुळेच मराठी प्रादेशिक कथेचे निर्माते म्हणून गोमंतकीय लेखक वि.स. सुखठणकर यांचे नाव केंद्रवर्ती मराठी साहित्यात नोंदविले गेले. गोमंतकीय चित्रकार दिनानाथ दलाल यांनी तयार केलेले या कथासंग्रहाचे मुखपृष्ठही गोमंतकाचे प्रदेश दर्शन घडविणारे असे अत्यंत बोलके  आणि आकर्षक झाले आहे. इ. स. १९९३ मध्ये साहित्य अकादमीने या संग्रहाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित केली. 

या संग्रहात त्यांनी लिहिलेल्या एकूण आठ कथांचा समावेश आहे. जाई-जुई, कटु कर्तव्य, ताम्रपट, महापुराची शिकवण, वरंडा, दुबळी श्रीमंती, पाद्र्यांची पुण्याई! आणि वंदे मातरम् अशी बोलकी शीर्षके असलेल्या या कथा आहेत. सुखठणकरांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कथांच्या आशय रचनेविषयी त्या काळात बरीच चर्चा झाली. आधुनिक मराठी कथेच्या इतिहासात अनेक लेखकांनी, अभ्यासकांनी आणि समीक्षकांनी त्यांच्या या कथांविषयीच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. सर्वांनीच त्यांच्या कथांतील प्रदेशाला अधोरेखित केले. भूमीप्रेमातूनच या कथांची निर्मिती झाल्याचे त्र्यं. श. शेजवलकरांनी म्हटले आहे तर गोमंतकाच्या सामाजिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर गोमंतकीय प्रादेशिक वातावरण आणि वृत्ती-प्रवृत्तीचे दर्शन सुखठणकर कथेच्या माध्यमातून अत्यंत प्रत्ययपूर्णतेने घडवतात  असे डॉ. इंदुमती शेवडे म्हणतात. डॉ. वडेरांनी   सुखठणकरांच्या कथेतील भाषिक वैशिष्ट्ये अधोरेखित करुन त्यांच्या कथेत आढळणारे विविध प्रादेशिक शब्दप्रयोग, म्हणी-वाक्प्रचार, संकेत हे एका अर्थी मराठी कथेत नवीन प्रवाह  निर्माण करुन गेले असे म्हटले आहे.‘आंतर्भेदी प्रतिभेचे वरदान असल्याखेरीज प्रादेशिक चित्रणाला वैशिष्ट्यपूर्ण साहित्यरुप येत नाही’ असे सांगून ‘माती आणि माणूस’ यांच्या अतूट अनुबंधाचे सा-या चैतन्य कळांसह चित्रण करण्याची क्षमता सुखठणकरांमध्ये होती म्हणून आजही ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या संग्रहातील कथांमधून रसरशीत परिसर चित्रणाचा प्रत्यय येतो असे डॉ. सोमनाथ कोमारपंत म्हणतात. ‘श्रीयुत सुखठणकरांनी प्रादेशिक वैशिष्ट्य सफाईदार रीतीने आणि यथार्थ स्वरुपात व्यक्त केले आहे.’ असे श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय म्हणतात. एकुणच या आणि अशा अनेक गोमंतकीय आणि गोमंतकाबाहेरील  समीक्षकांनी त्यांच्या कथांतील  वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रादेशिक म्हणजेच स्थानिक कथावस्तू आणि वातावरणाची जातीने दखल घेतली आहे. 

लेखकाने केलेल्या तत्कालिन गोमंतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या  सूक्ष्म निरीक्षणातूनच यातील कथांचा अवकाश तयार झाला आहे. त्यामुळेच स्थानिक लोकजीवन आणि लोकसमजुती, सहज आणि योग्य अशी केलेली म्हणी वाक्प्रचारांची पेरणी वा पोर्तुगीज शब्दप्रयोग  ही वैशिष्ट्ये कथेचे प्रादेशिकत्व अधोरेखित करतात. आपल्या कथांतील हे स्थानिक संदर्भ गोव्याबाहेरील मराठी वाचकांना अनाकलनीय होतील याची जाणीव ठेवूनच त्यांनी या संग्रहात २० पृष्ठांच्या टिपा दिल्या आहेत. अकारविल्ह्याने दिलेल्या या टिपांमध्ये पोर्तुगीज, फ्रेंच शब्दांसोबतच स्थानिक बोलीत वापरात असलेल्या प्रादेशिक शब्दांचे अर्थही संदर्भासह दिले आहेत. आपल्या कथांमध्ये गोमंतकाशी संबंधित स्थानिक स्थळांचे जे संदर्भ आले आहेत त्या स्थळांची माहितीही त्यांनी या टिपांमध्ये दिली आहे. उदा. अघनाशिनी नदी, लोष्ठावली म्हणजे लोटली, कर्दली म्हणजे केळोशी आणि कुशस्थळी म्हणजे कुठ्ठाळी (कटू कर्तव्य) इत्यादी. या ग्रामनामांबरोबरच कोंकणाख्यानमधील ओव्याही यात आल्या आहेत.  पोर्तुगीज राजवटीच्या परिणामातून तयार झालेल्या गोमंतकातील सामाजिक वर्गांचे संदर्भही या कथांमध्ये आले आहेत. उदा. गावडा हा कुणबी समाजातील एक वर्ग असून या समाजातील बाटवले गेलेले लोक ‘किरिस्तांव गावडा’ या वर्गात पडतात. असेच क्षत्रिय समाजातील बाटवले गेलेले लोक ‘चाड्डो’ या नावाने ओळखले जातात. जाई-जुई या कथेत गोमंतकातील तत्कालिन कलावंत समाजातील प्रश्नाला  हात घातला आहे. त्यांच्या ‘शेंसविधी’ या विधीचा संदर्भही या कथेत आला आहे. सुखठणकरांनी या सर्व संदर्भाचे यथोचित विश्लेषण टिपांमध्ये केले आहे. महाजन, भागेली, गावकरी, कुळवाडी, कोंकणो, सारस्वत, खाप्री, किरिस्तांव, पाखलो अशा सर्वच संदर्भांचे अर्थ लेखकाने दिले आहेत. गुन्याव भोगोसा (गुन्हा पोटात घाला)किंवा पाड  पडो( तळपट होवो), गोव्हर्नादोर(गव्हर्नर),जुवीज(न्यायाधीश), देमांद(कोर्टातील दावा), वरंडा( कोणत्याही कार्यासाठी जीव गमावणा-या व्यक्तीच्या कार्याचा  आठवण म्हणून वाटसरुनी त्याठिकाणी टाकलेल्या दगडांचा ढीग), देलेगाद (अधिकारी वा सरकारी  वकील),नासियोनालिश्त (राष्ट्रीय बाण्याची व्यक्ती),नेर्व्होस(घाबराघुबरा), पालासियु(राजवाडा), प्रोप्रियोतार्यु(जमिनीचा मालक) हे आणि असे कितीतरी पोर्तुगीज शब्द अपरिहार्यपणे आले आहेत. ‘पाद्री पडला बोवाळांत , इंगर्ज लुटली’, ‘हळद लागो’ सारख्या म्हणी-उक्ती या कथांमध्ये खचाखच भरल्या आहेत. अर्थात लेखकाने स्थानिक शब्दांच्या आकलनासाठी केलेली टिपांची योजना कथेच्या आस्वादनास उपयुक्त अशीच आहे. गोमंतकाशी संबंधित विषय गोमंतकाच्या परिप्रेक्षात मांडताना अपरिहार्य म्हणून आलेले तत्कालिन पोर्तुगीजमिश्रित स्थानिक शब्दप्रयोग समजून घेतल्यास या संग्रहातील  कथांचा आस्वाद घेण्याचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल.