विलास मेथर खूनप्रकरणी खय्याद शेखला जामीन


15th October 2021, 08:24 am
विलास मेथर खूनप्रकरणी खय्याद शेखला जामीन

विलास मेथर खूनप्रकरणी खय्याद शेखला जामीन
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :
पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खय्याद शेख याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ५० हजार रुपये व इतर अटीवर जामीन मंजूर केला आहे.
तोर्डा-पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी पेट्रोल मिश्रित द्रव टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी प्रथम संशयित बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी आणि खय्याद शेख या दोघांना १८ ऑक्टोबर २०२० रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी इतर संशयितांना अटक केली आहे.
या प्रकरणी संशयित खय्याद शेख यांनी दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, न्यायालयाने ३ जानेवारी २०२१ रोजी तो फेटाळून लावला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दि. १४ जानेवारी २०२१ रोजी सातही संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३०२ व १२० ब कलमांखाली म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयात ५०९ पानी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ७१ साक्षी नोंद केल्या आहेत. त्यानंतर संशयित खय्याद शेख  याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. दरम्यान, खंडपीठाने या प्रकरणातील आणखी एका संशयिताला जामीन मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर करण्याची मागणी केली. या प्रकरणी खंडपीठाने गुरुवारी संशयित खय्याद शेखला ५० हजार रुपये, त्याच रकमेचे दोन हमीदार तसेच इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.