जमिनींसंदर्भातील उतारे आता मिळणार कॉम्प्युटर जनरेटेड

सही केलेल्या दस्तावेजाइतकेच अधिकृत; परिपत्रक जारी

|
15th October 2021, 01:31 Hrs
जमिनींसंदर्भातील उतारे आता मिळणार कॉम्प्युटर जनरेटेड

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जमिनींसंदर्भातील १/१४ चा उतारा, फॉर्म १५, फॉर्म डी, फॉर्म जे, सर्व्हे प्लान यांसारखे उतारे यापुढे कॉम्प्युटर जनरेटेड मिळतील. ते सही केलेल्या इतर दस्तावेजासोबतच डिजिटली प्रिंट काढलेल्या दस्तावेजाएवढेच अधिकृत असतील, असे परिपत्रक महसूल खात्याने गुरुवारी जारी केले आहे.
जमिनींसंदर्भातील उताऱ्यांवर सह्या, स्टँप मिळवण्यासाठी याआधी नागरिकांना प्रचंड धावपळ करावी लागत होती. त्यात त्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होत होता. पण आता महसूल खात्याने ई-गव्हर्नन्सच्या दिशेने पुढील पाऊल टाकत नागरिकांना आवश्यक १/१४ चा उतारा, फॉर्म १५, फॉर्म डी, फॉर्म जे, सर्व्हे प्लान यांसारखे उतारे कॉम्प्युटर जनरेटेड देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जमिनींसंदर्भातील उतारे अधिकृत व्यक्तीची सही तसेच स्टँप असल्यानंतरच ग्राह्य धरले जायचे. पण आता कॉम्प्युटर जनरेेटेड उतारे सही केलेल्या इतर दस्तावेजासोबतच डिजिटली प्रिंट काढलेल्या दस्तावेजाएवढेच अधिकृत असतील, असे महसूल खात्याने म्हटल्याने नागरिकांना अधिकृत उताऱ्यांसाठी करावी लागणारी धावपळ थांबणार आहे.
दरम्यान, महसूल खात्याने नवीन जमिनी नोंदणी https://egov.goa.nic.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या असून, नागरिकांना कायदेशीर कामांसाठी त्याचा वापर करता येणार आहे, असे महसूल खात्याचे संयुक्त सचिव परेश फळदेसाई यांनी जारी केलेल्या प​रिपत्रकात म्हटले आहे.