राहुल सोडणार पंजाबची साथ !

मालक प्रीती झिंटाला मोठा धक्का

|
12th October 2021, 11:30 Hrs
राहुल सोडणार पंजाबची साथ !

केएल राहुल

दुबई : आयपीएल २०१८ पासून सगळ्यात सातत्यपूर्ण धावा करणारा केएल राहुल पंजाब किंग्सची साथ सोडणार असल्याचे वृत्त आहे. लागोपाठ चार मोसम पंजाबकडून खेळल्यानंतर केएल राहुल आता प्रिती झिंटाच्या टीमला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल २०१७ साली दुखापतीमुळे राहुल खेळू शकला नाही, यानंतर २०१८ साली पंजाबने राहुलला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर प्रत्येक मोसमात राहुलने चमकदार कामगिरी केली.
२०२० साली राहुलला पंजाब किंग्सचे कर्णधारपद देण्यात आले, पण राहुलला टीममध्ये घेऊनही पंजाब किंग्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार राहुल पंजाबसोबतची चार वर्षांची साथ सोडणार आहे. काही आयपीएल संघांनी २०२२ सालच्या लिलावात राहुलला कर्णधार करण्यात रस दाखवला आहे. तसेच तो ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी खेळाडू कायम ठेवण्याबाबतच्या नियमांची घोषणा केलेली नाही. राहुलने टीमसोबतच असावे, असा पंजाब टीमचा आग्रह आहे‍. पण, त्याने टीम सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पंजाबची टीम त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. याआधीही अश्विन, रहाणे आणि शिखर धवन एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये गेले, त्यामुळे राहुलची इच्छा नसेल तर पंजाबची टीमही त्याला सोडून देईल.
२०१४ नंतर पंजाबच्या टीमला आयपीएल प्ले-ऑफ गाठता आलेली नाही. २०१८ साली अश्विनच्या नेतृत्वात ते प्ले-ऑफमध्ये पोहोचायच्या जवळ आले होते, पण दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांची कामगिरी खालावली. राहुलच्या नेतृत्वात २०२० आणि २०२१ साली पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, पंजाब किंग्सची साथ सोडल्यानंतर राहुल पुढच्या मोसमात नव्या टीमचा कर्णधार बनू शकतो. याआधी राहुल आयपीएलमध्ये आरसीबी आणि हैदराबादकडून खेळला होता.

२०१८च्या मोसमात राहुलने ६५९ धावा केल्या, यानंतर २०१९ साली ५९३ धावा, २०२० साली ६७० धावा आणि यावर्षी २०२१ मध्ये ६२६ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला मिळणारी ऑरेंज कॅपही सध्या राहुलकडेच आहे.